पुणे,
Pune News : पुण्यात चार वर्षाच्या लहान मुलीला घरात बंद करुन जाणे जिवावर बेतले असते. अग्निशमन दलातील जवानाच्या हुशारीमुळे मुलीचे प्राण वाचले आहेत. पुण्यातील गुजर निंबाळकरवाडी मधील सोनवणे बिल्डींगमधे राहणारी चांदणे नावाची महिला तीच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षांच्या भाविका नावाच्या लहान मुलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करुन बाहेरुन कुलुप लावून गेली होती. मात्र त्यानंतर चार वर्षांची ती मुलगी चालत-चालत खिडकीत पोहचली आणि लोखंडी जाळीतून डोके बाहेर काढून बाहेर सज्ज्यावर आली. मात्र त्यानंतर त्या मुलीला आपण कुठे पोहचलो आहोत हे समजले आणि तीने खीडकीचा गज पकडून ठेवला.
हे सगळे दृष्य पाहून सोसायटीतील लोकांनी आरडाओरड केला. अग्नीशमन दलात तांडेल म्हणून काम करणारे योगेश चव्हाण वीकली ऑफ असल्याने घरीच होते. त्यांनी लगेच तिसऱ्या माळ्यावरती धाव घेतली. मात्र घराला कुलुप होते. त्यामुळे चव्हाण पुन्हा धावत खाली आले आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या चांदणे यांच्याकडून चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला आणि भाविकाला सज्जावरुन ओढून खिडकीतून आतमध्ये घेतले. सकाळी नऊ वाजुन सहा मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेमुळं परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. त्या मुलीला आत घेतल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
जवानाच्या हुशारीने वाचले मुलीचे प्राण
आज सकाळी कोथरूड अग्निशमन केंद्रातील सुट्टी असलेला जवान योगेश चव्हाण प्रसंगावधान दाखवत त्या चिमुकल्या मुलीचा जीव वाचवल्याने त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे.