मद्यधुंद युवक रेल्वे ट्रॅकवर झोपला; गँगमनने वाचवले प्राण

09 Jul 2025 21:54:52
पुलगाव,
Pulgaon Railway Bridge येथे वर्धा नदीवर बांधलेल्या रेल्वे पुलावर मद्यधुंद तरुण रेल्वे ट्रॅकवर झोपला. झोपलेल्या तरुणाला पाहून तिथे काम करणार्‍या गँगमन रविकुमार पासवानने त्याला तात्काळ रुळावरून बाहेर काढले. ललित शर्मा रा. वल्लभनगर असे तरुणाचे नाव आहे. ही घटना आज बुधवार ९ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
 
 
Pulgaon Railway Bridge
 
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास दारू पिऊन तरुण रेल्वे पुलावर चढला. काही वेळातच हा तरुण रेल्वे ट्रॅकवर झोपला. रुळावर झोपलेल्या तरुणाला पाहून तिथे काम करणार्‍या गँगमन रविकुमार पासवानने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, तो तरुण उठण्यास तयार नव्हता. समोरून रेल्वे येत असल्याचे पाहून गँगमनने त्याला तेथून उचलण्यासाठी सर्व शक्ती वापरली. गँगमनने वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. तरुणाच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर त्याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. गँगमनने वेळीच माहिती दिल्यामुळे तरुणाचा जीव वाचला. रेल्वे उड्डाणपुलासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले. पुलगाव हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. नागपूरहून मुंबईला जाणारी प्रत्येक ट्रेन पुलगावमधून जाते. पुलगावमधील वर्धा नदीवरील रेल्वे पुलावरून मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. या मार्गावर या उड्डाणपुलावर चढण्यासाठी एक मार्ग आहे. परंतु, त्यावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही. ज्यामुळे लोक थेट उड्डाणपुलावर चढतात.
Powered By Sangraha 9.0