वर्धा,
Panchsheel in Wardha गेल्या काही दिवसांपासुन वर्धेत चोरट्यांचा धंदा बंद झाला होता. दरम्यान, तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या पंचशील या कपड्याच्या दुकानात चोरी केली. चोरट्यांनी ११ लाख रोख, महागड्या साड्या, सुट, शेरवाणी लंपास केली. ही घटना आज बुधवार ९ रोजी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सर्वात मोठे कपड्याचे पंचशील दुकानातील कर्मचार्यांना वेतन देण्यासाठी मालकांनी १० लाख रुपये दुकानात आणून ठेवले होते. ८ रोजी दुकानातील कर्मचार्यांना वेतन देण्यात येणार होते. मात्र, पाऊस असल्याने कर्मचार्यांनाही घरी जाण्याची घाई असल्याने वेतन देण्यात आले नाही. त्या वेतनाचे १० ते ११ लाख तसेच प्रती साडी १० ते १५ हजार रुपये किमतीच्या १२ साड्या, सुट, शेरवाणी व अन्य कपडे असे साडे चार ते पाच लाख रुपयांचे कपडेही लंपास केले.
पावसाळ्यात ग्राहकी नसल्याने विक्री कमी होते. गुरुवार ते सोमवारपर्यंत झालेल्या विक्रीचे पैसे घरी ठेऊन होते. काल ८ रोजी वेतन असल्याने घरी ठेवलेले १० ते ११ लाख दुकानात आणले होते. रात्री दुकानाच्या मागच्या भाग फोडून दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली. या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे या बाजाराच्या परिसरात पोलिस चौकीची निर्मिती केली आहे. परंतु, पोलिस चौकी कायम बंद असते, हे उल्लेखनिय!