गाव ते गावच राव...

01 Aug 2025 11:24:13
 
 
वेध
 
save-the-environment शहरांनी स्पर्धा सुरू केली. गावांनीही कूस बदलली असली तरी गावाने आपल्या सीमा मात्र बदलल्या नाहीत. माणुसकीचे दर्शन शहराच्या तुलनेत आजही गावखेड्यात झाल्याशिवाय राहत नाही. गोष्ट तशी फारच छोटी असली तरी गावात मनाचा मोठेपणा नांदत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचा अमृत महोत्सव व दै. तरुण भारतच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध पर्यावरणविषय अभियान राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बीज अंकुरे अंकुरे अंतर्गत वृक्षांच्या बिया जमा केल्या आणि त्या वाटल्याही. त्या बिया सहज फेकून दिल्या तरी कुठे ना कुठे उगवेलच. दुसरे अभियान वट सावित्रीनिमित्त वट रोपटे वाटप तेवढ्याच ताकदीने विदर्भात रावबण्यात आले. या वट रोपटे वाटप अभियानातून जमलेल्या मैत्रीनेच आज हा लेखनप्रपंच.
 
 
तुलसी
 
 
वर्धेनजीक असलेल्या आंजी मोठी येथील सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी बावने यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी शासकीय नर्सरीतील वडाचे रोपटे उपलब्ध करून दिले. आता तरुण भारतच्या अभियानातील तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मंदिर स्वच्छता अभियान आणि तुळस लावा पर्यावरण वाचवा हे अभियान. तरुण भारत तुळशी रोपटे जमा करून त्याचे वाटप करणार आहे. या अभियानात तरुण भारतली मिळालेली तुळशीची रोपटे आम्ही दोन दिवसांपूर्वी आंजी येथील वनविभागाच्या नर्सरीत नेऊन दिली. वेळ साधारण सकाळी 9.30 वाजताची. आम्ही दाम्पत्य नर्सरीत पोहोचलो. जवळचे तुळशीचे रोपटे तेथील कर्मचाèयाकडे देत होतो. नर्सरीत काम करीत असलेल्या महिला एकत्र बसून न्याहारी करीत होत्या. काही वेळात त्यापैकी एका महिलेने, ‘या ना मॅडम जेवाले’ एवढेच वाक्य उच्चारले आणि गावातील माणुसकीचे दर्शन झाले. प्रसंग छोटा असला तरी रोजीने काम करणाऱ्या अनोळखी महिलांनी या जेवाले म्हणण्याची दानत दाखवली जी शहरात क्वचितच पाहायला मिळते. शहर स्वप्ने विकते, गाव झोप देतं हे वाक्य ऐकताना वाटते, खरेच का? पण जरा खोलवर विचार केला की लक्षात येते. शहर आणि गाव यांच्यात फक्त भौगोलिक अंतर नाही, तर जीवनशैली, संस्कृती, मानसिकता आणि अर्थकारण यांचाही संघर्ष दडलेला आहे. भारतातील जवळपास निम्मी लोकसंख्या सुमारे 66 कोटी शहरांत राहते आणि दरवर्षी जवळपास एक कोटी लोक गावातून शहरात स्थलांतर करतात. शहर ही बाजारपेठ आहे ती स्वप्न विकते. फक्त स्वप्न विकत नाही तर स्पर्धाही विकते. तिथे प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. पण गाव वेगळे असते. अजूनही भारताच्या सुमारे 52 टक्के लोकसंख्या गावात राहते. महाराष्ट्रात सुमारे 6 ते 6.5 कोटी लोक अजूनही शेत, नदी, ओसरी, वाडा अशा गावांच्या घट्ट विणीत राहतात. तिथे संध्याकाळी सूर्यास्त झाला की घराच्या ओट्यावर, ओसरीवर माणसे जमतात. वाऱ्याच्या गार झुळकीत दिवसभराच्या कामाची चर्चा, किस्से, गप्पा चालतात. रात्री अंगणात पडले की गाढ झोप लागते. हेच तर गाव देतं नीट, खोलवर झोप. गावातही चिंता असतात. शेती, नापिकीचा धोका, शिक्षण आणि आरोग्याच्या मर्यादा. हिंगणघाट तालुक्यात सावली (वाघ) येथे एका माय- लेकाला राहायला घर नव्हते तर त्याच गावातील रायपुरे नामक व्यक्तीने त्यांना राहायला छोटे का होईना पण छत दिले होते. गावात कुणी आजारी पडले तर विचारायला शेजारच्या घरातील लोक येतात. शहरात अनेकदा शेजाऱ्याचे नाव सुद्धा माहीत नसते. शहरात जास्त पगार मिळतो. पण, त्याच्याशी जुळवून घेताना मनावरचा भारही वाढतो. आरोग्याच्या दृष्टीनेही गाव जास्त समृद्ध आहे. शहरात माणूस एकटा पडतो; गावात एकटेपणा येत नाही. मानसिक ताण वाढतो, तेव्हा माणसाला गरज असते बोलण्याची, ऐकवण्याची आणि गावात ती ऐकणारी माणसे असतात. गावात अजूनही शुद्ध हवा, मोकळे आकाश, हिरवा शिवार दिसतो. हीच हवा शरीराला आणि मनाला निवांत झोप देते. शहर आणि गाव यातले अंतर फक्त पगाराचे नाही. गाव देतं झोप, कारण गावाकडे अजूनही वेलकम होम म्हणणारी दारं सताड उघडी असतात. ओळखीचे वडाचे झाड असते, देवघर असते, शेणाने सारवलेली ओसरी असते जिथे शांत बसता येते. गावाचे जगणे साधे आहे. पण, त्यात समाधान दडले आहे.save-the-environment शहर माणसाला उंच उडायला शिकवते, गाव त्या उंच झेपेनंतर घरी परत आल्यावर ऊबदार कुशीत घेते. आणि म्हणूनच, शहर स्वप्ने विकते, गाव झोप देतं... तिथे उपाशी कोणाला पाहिले जात नाही... या जेवाले म्हटल्याशिवाय घास घेतला जात नाही आणि घ्या देवाचं नाव म्हटल्याशिवाय राहत नाही. गाव ते गावच राव...
 
प्रफुल्ल क. व्यास
9881903765
Powered By Sangraha 9.0