राष्ट्रसमर्पित मातृहृदयी जीवनाची अखेर...

    दिनांक :01-Aug-2025
Total Views |
 अग्रलेख 
 
pramiltai-medhe राष्ट्र सेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे यांच्या निधनामुळे एका राष्ट्रसमर्पित मातृहृदयी जीवनाचा आज अंत झाला आहे. आपले राष्ट्र, आपली माणसे व समिती यांचाच विचार करीत जवळजवळ सात दशके समितीच्या सेविका म्हणून त्या जगल्या. अखेरचा श्वासही त्यांनी अशा दिवशी घेतला, ज्यादिवशी भारतीय राजकारणात ‘भगवा आतंकवाद’ हा शब्दप्रयोग निष्प्रभ झाला. ज्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने ‘भगवा आतंकवाद’ शब्द भारतीय राजकारणात रुजविला गेला, त्या बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना न्यायालयाने मुक्त केले आणि एकप्रकारे या अनुचित अस्तित्वहीन संकल्पनेवर संपूर्णपणे फुली मारली. प्रमिलताई यांनी शेवटचा श्वास घेतला, त्याच दिवशी अंतराळ क्षेत्रातही भारताने नवीन इतिहास प्रस्थापित करून आपला झेंडा संपूर्ण जगभर फडकता ठेवला आहे.
 
 
 

Pramiltai  
 
 
एकुणात आपले प्रस्थान त्यांनी ऐतिहासिक दिवशी निश्चित केले, असे म्हणता येईल. बालपणापासून प्रमिलताई या सेविका होत्या. सेविका म्हणून मिळतील त्या जबाबदाऱ्या स्वीकारीत होत्या. सेविका म्हणून कार्यरत असतानाच त्या बी.ए. बी.टी. झाल्या आणि नागपूरच्या सी. पी. अ‍ॅण्ड बेरार विद्यालयात शिक्षिका झाल्या. दोन वर्षे शिक्षिका म्हणून काम केल्यावर त्यांनी केंद्र सरकारच्या डीएजीपीटी कार्यालयात सीनियर ऑडिटर म्हणून नोकरी पत्करली. या कार्यालयातील कामात कोटा पद्धती असल्यामुळे निर्धारित काम पूर्ण केल्यावर ऑफिसबाहेर पडता येत असे. त्याचा फायदा घेत प्रमिलताईंनी समितीचे काम नागपूरमध्ये वाढविले होते. या संपूर्ण कालखंडात त्यांचा मुक्काम त्यांचे बंधू बापू महाशब्दे यांच्या घरी असे. एका टप्प्यावर त्यांनी ठरविले की, आता घरी न राहता आपल्याला प्रचारकी जीवनाचा अंगीकार करायचा आहे. त्यामुळे प्रमिलताई 1965 साली अहिल्या मंदिरात म्हणजेच समितीच्या मुख्यालयात राहायला आल्या. त्यांची कर्मस्थळी असलेल्या याच भवनात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रमिलताईंनी प्रचारक जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा बापूंच्या घरातून निघणे हा कठोर आणि कठीण निर्णय होता. बापूंच्या आई या निर्णयाविरुद्ध होत्या. बापूंनी अतिशय स्पष्टपणे सांगितले होते की ही अहिल्या मंदिरात जाणारच असेल तर तिने तुझ्या मृत्यूनंतर जावे असा तुझा आग्रह का?...तसे झाले तर लोक म्हणतील की, आई गेल्यावर भावाने आणि वहिनीने तिला घालविले. असे होऊ नये म्हणून तुझ्या समोरच तिला राष्ट्रकार्यासाठी जाऊ दे. ती राहील अहिल्या मंदिरात आणि ऑफिस संपल्यानंतर तुला भेटायला येत जाईल. यानंतर 1965 साली प्रमिलताई अहिल्या मंदिराच्या रहिवासी झाल्या आणि मग सुरू झाला वंदनीय मावशी म्हणजेच मावशी केळकर यांच्यासोबतचा त्यांचा प्रवास. वं. मावशींची पत्रेही प्रमिलताई तयार करीत. अत्यंत वळणदार व सुरेख अक्षर आणि नेमकेपणा याबद्दल ती पत्रे ओळखली जात. त्याच्या मागे प्रमिलताई होत्या हे मात्र अन्य कुणालाही ज्ञात नव्हते. अहिल्या मंदिरात त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या आल्यात. 1978 पासून म्हणजे आणिबाणी संपल्यानंतर जवळजवळ 25 वर्षे 2003 पावेतो त्या अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहिका होत्या. या जबाबदारीसह त्यांनी संपूर्ण भारतभर सतत प्रवास केला. उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या भागावर त्यांचे विशेष लक्ष होते. त्याचे विशेष दायित्व प्रमिलताईंवर होते. त्या साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रवासाला निघत आणि फेब्रुवारीमध्ये समितीच्या अखिल भारतीय बैठकीसाठीच नागपूरला परत येत. बैठक संपली की पुन्हा प्रवासाला निघत. पण, या संपूर्ण प्रवासात त्या इतके नेमके सामान घेऊन जात, की कधीही कोणतेही सामान त्यांना अन्य गावाला पाठवावे लागले नाही. वातावरणातील कोणताही बदल त्या सहजतेने स्वीकारीत. 2003 च्या फेब्रुवारीत त्यांच्यावर सहप्रमुख संचालिका ही जबाबदारी आली आणि 22 जुलै 2006 रोजी त्या प्रमुख संचालिका झाल्या. समितीच्या कामासाठी त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या देशांचाही प्रवास केला. या सर्व प्रवासांत त्यांनी नऊवारी पातळ हा आपला भारतीय आणि महाराष्ट्रीय पोशाख कधीच बदलला नाही.
प्रमिलताईंचे वैशिष्ट्य असे की, त्या हजारो स्वयंसेवक आणि समितीच्या सेविकांचे मातृस्थान होत्या. मनातील सर्व गोष्टी बोलून टाकण्याचे आणि दिलाशाचे शब्द ऐकण्याचे ते हक्काचे स्थान होते. म्हणतात ना की ‘माय मरो पण मावशी जगो’; ते प्रमिलताईंसाठी शंभर टक्के लागू होते. मातृत्वाला आपल्या चिंतनातून त्या सर्वश्रेष्ठ स्थान देत असत. घरोघरी आदर्श माता झाल्या तरच राष्ट्राचा विकास होईल हे त्या आवर्जून सांगत. जननी, जन्मभूमी, गंगामाता, गीतामाता, गोमाता, तुलसी माता, भारत माता अशा अनेक मातांची संकल्पना आपल्या देशात व संस्कृतीत आहे, हे त्या आवर्जून प्रत्येक भाषणातून सांगायच्या. स्त्री म्हणजे देशाची व घराची प्राणशक्ती आहे, असे प्रतिपादन त्या करीत असत. त्यामुळेच महिलांनी कसे वागावे, कसे दिसावे, समाजात कसे वावरावे याबाबतही त्या अत्यंत आग्रही होत्या. भारतीय श्रीनिकेतन नागपूर व जबलपूर या शैक्षणिक प्रकल्पांच्या त्या प्रमुख मार्गदर्शक होत्या. त्यातूनही स्त्रीची प्रतिमा तेवढीच उज्ज्वल आणि उत्तम, शालीन राहील याकडे त्यांचा कटाक्ष होता. पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांच्या कारवाया सुरू असताना मोगा येथील संघ शाखेवर गोळीबार करून अतिरेक्यांनी स्वयंसेवकांचे प्राण घेतले. त्यामुळे वातावरण खूपच तणावपूर्ण झाले होते. पंजाबमध्ये जाणे आव्हानात्मक असतानाही प्रमिलताईंनी नागपूरच्या पाच सेविकांना मोगा येथे पाठविले. त्या तेथे स्वयंसेवकांच्या परिवारात राहिल्या आणि संपूर्ण देशातील मातृशक्ती तुमच्यासोबत असल्याचा विश्वास त्या सेविकांनी तिथल्या कुटुंबांना दिला. त्यांच्या मातृहृदयाची याशिवाय आणखी कोणती साक्ष द्यायला हवी?
वं. मावशी या त्यांच्या प्रेरणास्रोत. वं. मावशींच्या जीवनावरील प्रदर्शनी घेऊन त्यांनी 266 दिवसांची भारत परिक्रमा केली. देशभरातील 32 प्रांतांत 28 हजार किलोमीटर्स प्रवास करून 107 जागांवर त्यांनी ही प्रदर्शनी लावली. या प्रवासात त्यांनी अनेक सार्वजनिक सभांमध्ये भाषणे दिलीत. अनेक शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. शैक्षणिक परिसंवादांत भाग घेऊन वं. मावशींच्या कर्तृत्वाची जाणीव जगाला करून दिली. 22 जुलै 2006 या दिवशी त्या राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका झाल्या. ‘माननीय प्रमिलताईं’च्या त्या ‘वंदनीय प्रमिलताई’ झाल्या. त्या दिवशीही त्यांच्या मनात खूप उल्हास होता असे नाही. तशीच स्थितप्रज्ञता 20 जुलै 2012 रोजीही होती. जेवढ्या सहजतेने त्यांनी दायित्व स्वीकारले होते, तेवढ्याच सहजतेने त्या दायित्वमुक्त झाल्या. त्यानंतरही जिथे काही कमी तेथे आम्ही अशाच पद्धतीने त्या समितीच्या सेविका म्हणून जगत राहिल्या. प्रकृती साथ देईनाशी झाल्यावर त्यांनी प्रवास थांबविला.pramiltai-medhe अहिल्या मंदिरात पूर्वांचलातील बालिकांसाठी आणि मुलींसाठी जे वसतिगृह चालविले जाते, त्याची त्या काळजी घेऊ लागल्या. तिथल्या मुलीही अगदी सहजतेने मातृहदयी प्रमिलताईंना बिलगत असत व मनातील विविध स्पंदने त्यांना सांगत असत. त्या लहान मुलींना कुटुंबाची, आई-वडिलांची आठवण येऊ देऊ नये याची पूर्ण दक्षता प्रमिलताई घेत असत. वसतिगृहातील पूर्वांचलातील या बालिकांना आणि मुलींना एखाद्या पालकासोबत सुटीच्या काळात घरी पाठविले जात असे आणि तेच पालक सुटी संपल्यावर त्यांना घेऊन नागपुरात येत असत. या मुलींना व पालकांना रेल्वेच्या चाईल्ड हेल्पलाईनने उतरवून घेतले, त्यावेळी प्रमिलताई खूप अस्वस्थ झाल्या होत्या. अशाप्रकारच्या कायद्यांतून रचनात्मक कार्य करणाèया संस्थांना त्रास दिला जाऊ नये, अशी व्यथा त्यांनी तरुण भारतच्या माध्यमातून सरकारसमोर मांडायला सांगितले होते. त्यासाठी त्यांनी तरुण भारतने लिहिलेल्या अग्रलेखाची सरकार दरबारी नोंद घ्यायला लावली. या प्रसंगानंतर कधीही वसतिगृहाच्या मुलींना अशाप्रकारे गाडीमधून उतरविले गेले असे झाले नाही.
वयोमानाप्रमाणे प्रमिलताईंची प्रकृती खालावू लागली होती. दोनदा पडल्यामुळे शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. त्याचा परिणाम त्यांच्या घरगुती भेटीगाठी व सार्वजनिक कार्यातील उपस्थितीवर झाला होता. मात्र, त्यांच्या बौद्धिक जागरूकतेवर आणि प्रखर सामाजिक जाणिवांवर शेवटपर्यंत कुठलाही परिणाम झाला नव्हता.pramiltai-medhe गेल्या तीन महिन्यांपासून त्या बिछान्याला खिळल्या होत्या; पण त्याही अवस्थेत त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, की मला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किंवा जीवन वाढविणाèया प्रणालीवर कधीही ठेवू नका. मृत्यूच्या दिवशीही सकाळी समितीची प्रार्थना वगैरे आटोपून त्यांनी अतिशय शांतपणे शेवटचा श्वास घेतला आणि एका राष्ट्रसमर्पित जीवनाचा अंत झाला. जीवन देशाला अर्पण करणे म्हणजे काय असते याचा आदर्श प्रमिलताईंनी जीवनातून आणि मृत्यूतही घालून दिला. त्यांची शेवटची इच्छा देहदान करण्याची होती. त्यानुसार त्यांनी आपल्या कुडीचा पुढील पिढीला ज्ञानासाठी उपयोग व्हावा असा मार्ग स्वीकारला. अशा राष्ट्रसमर्पित जीवनाला दै. तरुण भारत व तरुण भारतचे प्रकाशन करणाèया श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.