मुंबई,
Sitare Zameen Par अभिनेता व निर्माता आमिर खान याचा 'सितारे जमीन पर' हा बहुप्रतिक्षित चित्रपट अलीकडेच यूट्यूबवर पे-पर-व्ह्यू पर्यायासह प्रदर्शित झाला. यानंतर काही दिवसांतच अॅपल डिव्हाईस वापरकर्त्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी १७९ रुपये भाडे आकारले जात असल्याचे स्पष्ट झाले. यावरून प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, आमिर खान प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर यासंदर्भात स्पष्टीकरण देत हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले आहे.
प्रोडक्शन हाऊसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, “आम्हाला नुकतेच कळले आहे की अॅपल डिव्हाईसवर आमच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे भाडे १७९ रुपये दाखवले जात आहे. आमची टीम ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेक्षकांच्या संयमाबद्दल आणि समजूतदारपणाबद्दल आम्ही आभारी आहोत.”
सोशल मीडियावर सक्रिय नसलेला आमिर खान मात्र आपल्या प्रेक्षकांपर्यंत चित्रपट सहज पोहोचावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यूट्यूबवर चित्रपट रिलीज करण्यामागील हेतू स्पष्ट करताना आमिर म्हणतो, “सध्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणं सर्वसामान्य प्रेक्षकांना परवडत नाही. २००५-०६ पासून मल्टिप्लेक्स संस्कृती सुरु झाली आणि त्यानंतर तिकीट दर व खाद्यपदार्थांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. जसं पंचतारांकित हॉटेलमध्ये सामान्य गोष्टी महाग मिळतात, तसंच मल्टिप्लेक्सचंही झालं आहे. त्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना सहज चित्रपट पाहता यावा, हीच माझी इच्छा आहे.”या चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत असून, १० नवोदित कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. 'सितारे जमीन पर' या चित्रपटाची कथा दिव्या निधी शर्मा यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून, गीतकार म्हणून अमिताभ भट्टाचार्य यांचे शब्द आहेत. आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांची निर्मिती लाभलेल्या या चित्रपटाचे प्रमुख निर्माते रवी भागचंडका आहेत.