तुळजापूर,
Tuljapur temple closed धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी दहा दिवस बंद ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील गाभाऱ्याला तडे गेल्यामुळे मंदिर प्रशासन आणि राज्य तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला. त्यामुळे १ ऑगस्टपासून पुढील दहा दिवस देवीच्या गाभाऱ्याचं दर्शन घेता येणार नाही. या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश बंद राहील, मात्र केवळ मुखदर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून गाभाऱ्याच्या भिंतींना तडे जाण्याची तक्रार नोंदली जात होती. या संदर्भात राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्यात काही मतभेद होते, परंतु अखेर सामंजस्याने दुरुस्तीला मंजुरी मिळाली.

नवरात्र महोत्सव अगदी जवळ आल्याने हे काम वेळेत पूर्ण व्हावं, यावर विशेष भर दिला जात आहे. दुरुस्ती प्रक्रियेत गाभाऱ्याचं प्लास्टरिंग करून त्याची मजबुती केली जाणार आहे. मंदिर प्रशासनाने कळवलं की या दहा दिवसांमध्ये दर्शन बंद असल्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये आणि मंदिर परिसरात अनावश्यक येऊ नये. दररोज लाखो भाविक तुळजापूरला दर्शनासाठी येतात. त्यामुळे दर्शन बंद राहिल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली असली, Tuljapur temple closed तरी देवीच्या गाभाऱ्याच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील दीर्घकाळ टिकावासाठी ही दुरुस्ती आवश्यक असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. दुरुस्तीचं काम कितपत प्रगतीपथावर आहे, यानुसार पुढील दर्शन वेळापत्रकाची माहिती भाविकांना दिली जाणार आहे. दरम्यान, मंदिर परिसरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून, गाभाऱ्यात कुणीही प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी पोलीस आणि मंदिर सुरक्षा रक्षक सतर्क आहेत.