भोजपूरमध्ये दुर्दैवी अपघात

रेल्वेखाली ३०० हून अधिक मेंढ्यांचा बळी

    दिनांक :10-Aug-2025
Total Views |
बिहार,
sheep killed by train भोजपूर जिल्ह्यातील सिकरिया बनाही रेल्वे स्थानकाजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. जंगली सियाराच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पळालेल्या मेंढ्यांच्या कळपाला धावत्या रेल्वेने चिरडल्याने ३०० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती पशुपालकांनी दिली आहे.
 

Bhojpur train accident sheep killed by train 
ही घटना पंडित दीनदयाल उपाध्याय – पटना रेल्वेमार्गावर घडली. बनकट गावचे रहिवासी व मेंढपाळ भरत पाल यांनी सांगितले की, ते आपल्या सहकाऱ्यांसह सुमारे ३०० मेंढ्या घेऊन रेल्वेमार्गाजवळ होते. त्या वेळी एका जंगली सियाराने मेंढ्यांवर झडप घातली. घाबरलेल्या मेंढ्या जीव वाचवण्यासाठी रेल्वेमार्ग ओलांडू लागल्या, तेवढ्यात वेगाने येणारी ट्रेन आली आणि कळपाचा मोठा भाग तिच्या चाकाखाली सापडला.अपघातानंतर काही वेळ डाउन लाईनवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाकडे पीडित मेंढपाळांना भरपाई देण्याची मागणी केली. या दुर्दैवी घटनेमुळे भरत पाल यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी असे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.