उत्तर प्रदेश,
Ken canal suicide case उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील रिसोडा गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. कौटुंबिक कलह आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त झालेल्या ३० वर्षीय रीना देवी हिने तीन लहान मुलांना स्वतःच्या शरीराजवळ घट्ट बांधून केन कालव्यात उडी मारली. काही तासांच्या शोधमोहीमेनंतर आई-मुलांचे चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि गावभर शोककळा पसरली.
रीना देवीचा पती अखिलेश मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. थोडे अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तो शहरात जाऊन काम करत असे, मात्र गेल्या काही महिन्यांत तो व्यसनांच्या आहारी गेला. त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होऊ लागले, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली. घरातील आवश्यक वस्तू, मुलांसाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी उरली तरी ती पतीकडून पूर्ण होत नव्हती. यामुळे पती-पत्नीमध्ये रोज वाद वाढत गेले.
घरातील सततचा तणाव, आर्थिक टंचाई आणि पतीकडून मिळालेला आधाराचा अभाव या सर्वांनी मिळून रीनाला मानसिकदृष्ट्या कोलमडून टाकले. अखेर तिने अत्यंत टोकाचा निर्णय घेत तीन निष्पाप जीवांसह स्वतःचाही अंत केला. या घटनेने केवळ गावच नव्हे तर संपूर्ण परिसर हदरला आहे,.