ट्रम्प अमेरिकेचे गोर्बाचेव्ह ठरणार?

    दिनांक :11-Aug-2025
Total Views |
दिल्ली दिनांक / रवींद्र दाणी

Donald Trump : ग्लासनॉस्त आणि पेरिस्त्रायका! या दोन शब्दांनी बलाढ्य सोवियत युनियनचे विखंडन केले. आता ट्रेड आणि टेरिफ हे दोन शब्द बलाढ्य अमेरिकेचा घात करणार काय? राष्ट्रपती ट्रम्प यांनी आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या सहा महिन्यात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतल्यानंतर असा प्रश्न विचारला जात आहे.
 
 
trump
 
 
सोवियत युनियन ही जगातील एक महासत्ता होती. अनेक देश सोवियत युनियनच्या गोटात होते. पण, मिखाईल गोर्बाचेव्ह सोवियत युनियनचे राष्ट्रपती झाले. त्यांनी दोन शब्दांचा धडाका लावला. ग्लासनॉस्त आणि पेरिस्त्रायका. ग्लासनॉस्त म्हणजे खुलेपणा आणि पेरिस्त्रायका म्हणजे आर्थिक सुधारणा! सोवियत युनियनमध्ये नवे युग येणार, आर्थिक प्रगती झपाट्याने होणार असे सारे वातावरण देशात तयार झाले.
 
 
साऱ्या जगात गोर्बाचेव्ह यांचा उदोउदो सुरू झाला आणि याची परिणती झाली सोवियत युनियन व स्वत: गोर्बाचेव्ह यांच्या पतनात. सोवियत युनियनचे मित्र देश त्याला सोडून गेले. एवढेच नाही तर अनेक देश फुटून बाहेर पडले. युक्रेन, जॉर्जिया, अझरबेजान, तुर्कमेनिस्तान हे त्यातील काही देश. जगात सोवियत युनियन नावाचे प्रकरण इतिहासजमा झाले. स्वत: गोर्बाचेव्ह यांचेही पतन झाले. त्यांना अनेक वर्ष दुसèया देशात आश्रय घ्यावा लागला.
 
ट्रेड आणि टेरिफ : राष्ट्रपती ट्रम्प आल्यानंतर ते काय काय करणार याची एक धास्ती होती आणि दुर्दैवाने ती खरी ठरू लागली आहे. मागील सहा महिन्यात ट्रम्प हे ट्रेड आणि टेरिफ या दोन शब्दांशिवाय काही बोलण्यास तयार नाहीत असे म्हणता येईल. यातच अमेरिका व स्वत: ट्रम्प यांचे पतन होईल काय असा प्रश्न आत्ताच विचारला जाऊ लागला आहे. त्यांची पहिल्या सहा महिन्यांची कारकीर्द साèया जगाला धास्ती वाटावी अशी राहिली आहे. केवळ जगासाठी नाही तर अमेरिकेसाठीही ती धोकादायक ठरू लागली आहे असे ताज्या आकडेवारीवरून दिसते.
 
 
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे. बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे आणि दुसरीकडे राष्ट्रपती ट्रम्प लोकसंख्या वाढविण्याचा सल्ला आपल्या नागरिकांना देत आहेत. वास्तविक त्यांना आपल्या देशातील परिस्थितीची कल्पना यावयास हवी होती. कारण, अमेरिकन राजकारणात- रेटिंग नावाची एक पद्धत आहे. यात एका ठरावीक कालांतराने राष्ट्रपतींच्या लोकप्रियतेचे मूल्यांकन केले जाते. ताज्या रेटिंगनुसार ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. पण, तरीही ट्रम्प यांना परिस्थितीची कल्पना आलेली नाही असे दिसते. उलट राष्ट्रपतिपदाला काळिमा फासणारे वर्तन ते करीत असून, यात आता सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
 
भारताची चिंता : भारतासाठी सर्वांत चिंतेची बाब म्हणजे ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले असून, भारतावर एकीकडे 25 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली असताना, पाकिस्तानवरील आयात शुल्क मात्र 29 टक्क्यांवरून घटवून 19 टक्के केले आहे. भारतावरील आयात शुल्क काही दिवसांनी 50 टक्के करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. म्हणजे सर्वच बाबतीत त्यांनी पाकिस्तानला प्राधान्य देणे सुरू केले आहे.
 
भारताला धक्का : राष्ट्रपती ट्रम्प यांनी लावलेल्या या आयात शुल्काचा भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसेल असे मानले जाते. भारतातून केली जाणारी निर्यात कमी होईल. ज्या वस्तूंची निर्यात कमी होईल त्यांचे उत्पादन करणाèया उद्योगांमध्ये नोकरी कपात सुरू होईल. याने भारताचा जीडीपी 2 टक्के कमी होईल असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे. यात भर म्हणजे अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या- नोकरीत असणाèया युवकांवर अमेरिका सोडण्याची एक टांगती तलवार राहणार आहे.
 
तेलाचा ताळेबंद : भारत रशियाकडून स्वस्त दराने तेलाची आयात करीत आहे, याचा भारताला एका वर्षात 34 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. पण, या कारणासाठी अमेरिकेने भारताविरोधात जी पावले उचलली आहेत त्यामुळे देशाला वर्षभरात 7 लाख 83 हजार कोटींचा फटका बसणार आहे. यावरून स्वस्त तेलाचा सौदा भारताला कसा महागात पडत आहे याची कल्पना करता येईल.
 
पाकिस्तानला बळ : पाकिस्तानजवळ स्वत:चे काही नसताना त्याला अचानक बळ मिळत आहे. एकीकडे अमेरिका व दुसरीकडे चीन दोन्ही महासत्ता पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत करीत आहेत. चीनने पाकिस्तानला अर्थपुरवठा चालविला आहे तर पाकिस्तानला अमेरिकेत जणू राजमान्यता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय जगतात पाकिस्तानला कधी नव्हते असे महत्त्व मिळत आहे. मधल्या काळात त्याला संयुक्त राष्ट्रात दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद मिळाले होते. दाऊद इब्राहिमने दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख व्हावे असा हा प्रकार होता.
 
युद्धबंदीतील भूमिका : भारत-पाकिस्तान यांच्यात आपण युद्धबंदी घडवून आणली याचा ट्रम्प वारंवार उल्लेख करीत आहेत. विशेष म्हणजे यासाठी आपण ‘ट्रेड डील’चा वापर केला असे ते सांगत आहेत. याचा अर्थ अनाकलनीय आहे. दुसरीकडे पाकिस्तान त्यांचा उदोउदो करीत आहे. याने ट्रम्प सुखावले आहेत. पाकिस्तानने शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. याने तर ट्रम्प यांचा अहंकार जणू आभाळाला भिडला आहे.
 
 
राष्ट्रपती ट्रम्प यांना एखाद्या मानसिक आजाराने पछाडले असावे असे त्यांचे वर्तन होत आहे. आता त्यांनी पाकिस्तानातील तेलसाठे विकसित करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. युक्रेन, ग्रीनलॅण्ड यांच्याबाबतही त्यांनी काही खनिज साठे विकसित करण्याचा करार केला आहे. याने अमेरिका बळकट होईल असा त्यांचा विश्वास आहे, जो खुळा आहे असे आता दिसून येते. अमेरिका सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर जात आहे.
 
 
धक्का तंत्र : मिखाईल गोर्बाचेव्ह आपल्या धोरणांचा उल्लेख ‘शॉक थेरपी’ - धक्का तंत्र असा करीत होते. याचा धक्का त्यांनाच केव्हा बसला हे त्यांनाही कळले नाही. तशीच अवस्था ट्रम्प यांची होण्याची चिन्हे आहेत.
 
अराजकाकडे? : राष्ट्रपती ट्रम्प अमेरिकन प्रशासन ज्या पद्धतीने चालवीत आहेत ती दिशा अराजकाकडे जाणारी आहे असे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे. प्रत्येक महत्त्वाच्या संस्थेशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. मग, ती अमेरिकेची रिझर्व्ह बँक असो वा एफबीआयसारखी महत्त्वाची सरकारी संस्था. प्रत्येकाशी ट्रम्प यांचा वाद सुरू आहे.
 
आण्विक युद्धाची भीती : राष्ट्रपती ट्रम्प यांचे ताजे कृत्य म्हणजे त्यांनी रशियाला शह देण्यासाठी आपल्या दोन आण्विक पाणबुड्या तैनात केल्या आहेत. याने रशियाही संतापला आहे. आता या दोघांमधील वाद जगाला आण्विक युद्धाच्या खाईत लोटेल काय अशी भीती तयार झाली आहे.
 
 
ट्रम्प-पुतिन भेट : युक्रेनच्या मुद्यावर राष्ट्रपती ट्रम्प व राष्ट्रपती पुतिन यांनी परस्परांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती पुतिन या युद्धाला कंटाळले आहेत. रशियाची अर्थव्यवस्था जर्जर झाली आहे. त्यांनाही युद्ध संपविण्याचा मार्ग हवा आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत होत असलेली ही भेट त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. पण, युक्रेनला पराभूत करण्याचा पुतिन यांचा उन्माद त्यांना तसे करू देईल काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 
 
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी आता गाझातील युद्ध थांबवावे असे काही देशांना वाटते. त्यांनी हे युद्ध न थांबविल्यास आम्ही स्वतंत्र पॅलेस्टिन देशाला मान्यता देऊ असा विचार या देशांनी सुरू केला आहे. असाच विचार युक्रेन युद्धाबाबत काही देश करू शकतात. भारतही करू शकतो. पुतिन याची दखल घेतील काय याचे उत्तर ट्रम्प-पुतिन भेटीनंतरच मिळू शकेल.