बदलत्या भारताची बदलती समीकरणे

    दिनांक :11-Aug-2025
Total Views |
वेध
पुंडलिक आंबटकर
India : भारताने शेकडो-हजारो वर्षे अन्याय-अत्याचार सहन केला. तेव्हाचा भारत संघटित नव्हता या एकाच कारणामुळे देशावर परकीयांनी राज्य करून अमाप लूट केली. समृद्ध असा सामाजिक, सांस्कृतिक वारसा नासवला. भारत उपखंडातील बहुतांश नागरिक मूळ हिंदूच आहेत. हे सर्व केवळ असंघटितपणा आणि विनाकामाची उदारता यामुळेच घडून आलेले आहे. परंतु, आधुनिक भारताचा नागरिक संघटित होऊ लागल्याने देशाने प्रत्येकच क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे. कधीकाळी बैलगाडीवरून रॉकेट वाहून नेणाऱ्या भारताच्या आवाक्यात आता संपूर्ण सौरमंडळ आले आहे. भारताने विविध देशांचे तब्बल 104 उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करून इतिहास घडविला आहे.
 
 
 
bharat mata
 
 
 
मंगळावर पहिल्याच प्रयत्नात यान पाठविणारा भारत एकमेव आहे. एक दशकापूर्वीपर्यंत शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत एक प्रमुख देश होता. परंतु, भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर समीकरणे झपाट्याने बदलली. संरक्षण सामुग्री निर्यात करणारा एक प्रमुख देश म्हणून भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. आज जवळपास 32 देश भारताकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी रांगेत आहेत. नेमकी हीच बाब अमेरिकेला खुपत आहे आणि त्यामुळेच भारतावर विविध प्रकारे निर्बंध लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतावर 50 टक्के आयात शुल्क लादून अमेरिकेने भारताबद्दल असलेल्या आपल्या मनातील द्वेषाची पुनरावृत्ती केली आहे. यापूर्वीही या देशाने भारतावर अनेकदा आघात केलेला आहे. अमेरिकेला शस्त्रास्त्र स्पर्धेत नवा दावेदार नको आहे. कारण, शस्त्रास्त्रे विकूनच हा देश श्रीमंत बनला आहे.
 
 
वास्तविक अमेरिका प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्यांपैकी नाही. नेहमी इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच या देशाने आपल्या अस्त्रांचे प्रदर्शन केलेले आहे. आता भारत शस्त्रास्त्र स्पर्धेत उतरल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. परंतु, नव्या भारताची समीकरणेसुद्धा बदलली असून आता कोणी कितीही दबाव आणला तरी भारत डगमगणारा देश राहिलेला नाही. अमेरिका भारताकडून 40 टक्के औषधे खरेदी करतो. अशा परिस्थितीत 50 टक्के आयात शुल्क लादून ट्रम्प यांनी आपल्याच जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. भारत कधीकाळी सोनियाची चिडिया म्हणून ओळखला जायचा. नंतरच्या काळात आपसी मतभेद आणि असंघटित समाजामुळे देश परकीयांच्या तावडीत गेला. तब्बल दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले. आज मात्र सर्वच बाबतीत इंग्लंड भारताच्या स्पर्धेतून बाद झाला आहे. इंग्लंड हा एक श्रीमंत देश म्हणून गणला जातो. कारण, त्यांची लोकसंख्या कमी असल्याने भारताच्या तुलनेत दरडोई उत्पन्न अधिक आहे. परंतु, एकूण संपत्ती व शक्तीचा विचार केला तर इंग्लंड भारतापुढे तग धरू शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती, संघटना अथवा देश आपले उद्दिष्ट साधण्याच्या मार्गावर असतो तेव्हा असंतुष्ट वृत्ती त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. सध्या भारताला याच स्थितीतून जावे लागत आहे. नाटो आणि अमेरिकेसारखी महासत्ता भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
 
त्यामुळे नवे पर्याय शोधूनच आपल्याला आपली वाटचाल कायम ठेवावी लागणार आहे. पाकिस्तानशी झालेल्या प्रत्येक युद्धात संपूर्ण जग भारताच्या विरोधात असताना केवळ रशिया आणि इस्रायल हे दोनच देश भारताच्या बाजूने होते. यहुदी लोकांवर भारताचे अनेक उपकार आहेत. त्यामुळे इस्रायलला भारताबद्दल सहानुभूती आहे. रशियाने संकट काळात सदैव भारताची पाठराखण केलेली आहे. युक्रेन युद्धात भारताने रशियाला थेट पाठिंबा न देता कूटनीतिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रस्ताव वारंवार ठेवला. परंतु, कच्चे तेल खरेदी करून भारताने रशियाची आर्थिक बाजू सावरली. अनेक युरोपियन देशसुद्धा रशियाकडूनच तेल खरेदी करतात. मग केवळ भारतावरच रोष का? स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही भारताला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
 
 
1950 च्या दशकात अमेरिकेतून गव्हासोबत गाजर गवत अर्थातच काँग्रेसचे बीसुद्धा पाठविण्यात आले. याचा भारतासारख्या कृषिप्रधान देशाला मोठा फटका बसला. या गवतामुळे कृषी उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आणि आजही होतच आहे. हे षडयंत्र नव्हते का? हा सर्व इतिहास ज्ञात असतानाही देशाचे विरोधी पक्षनेते ट्रम्प यांच्या सुरात सूर मिसळतात, ही बाब देशासाठी खूपच घातक आहे. ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धामध्ये प्रतिस्पर्धी चीनसारखा देश भारताच्या बाजूने उतरला आहे. या प्रकरणात ब्राझीलसह 27 देशांनी भारताची बाजू घेतली आहे. यातून आधुनिक भारताचे सामर्थ्य सिद्ध होते. भविष्यातही अशी संकटे येणारच आहेत. त्यामुळे अशा संकटांवर मात करूनच आपल्याला आपले उद्दिष्ट गाठायचे आहे.
 
9881716027