देवाला पोलिस गणवेश परिधान करण्यामागची अनोखी परंपरा

11 Aug 2025 12:53:41
वाराणसी,
Kaal Bhairav temple भारतभर अनेक मंदिरे आहेत ज्यांची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि श्रद्धा आहे. प्रत्येक मंदिरामागे एक इतिहास, धार्मिक महत्त्व आणि स्थानिक परंपरा जोडलेली असते. परंतु वाराणसीतील बाबा कालभैरव मंदिर या सर्वांत वेगळे ठरते. येथे भगवान कालभैरवांना, ज्यांना काशीचे कोतवाल म्हटले जाते, विशेष प्रसंगी पोलिसांचा गणवेश परिधान केला जातो.
 
 

Kaal Bhairav temple Varanasi 

काशीचे रक्षक बाबा कालभैरव
वाराणसी (काशी) हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते आणि हिंदू धर्मात त्याला विशेष स्थान आहे. भगवान शिवाला समर्पित काशी विश्वनाथ मंदिर येथे स्थित असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शहरातील आणखी एक महत्वाचे धार्मिक स्थळ म्हणजे बाबा कालभैरव मंदिर. लोकमान्यतेनुसार, बाबा कालभैरव हे काशीचे रक्षक व पोलीस प्रमुख आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या ‘परवानगी’शिवाय प्रवेश नसतो, असा श्रद्धेचा समज आहे.
 
 
पोलिस गणवेश परिधान करण्यामागील कथा
या मंदिरातील Kaal Bhairav temple एक अनोखी परंपरा म्हणजे भगवान कालभैरवांची मूर्ती पोलिसांच्या गणवेशात सजवणे. यात पोलिस टोपी, छातीवर बिल्ला, डाव्या हातात चांदीची काठी आणि संपूर्ण गणवेशाचा समावेश असतो. या परंपरेची सुरुवात कोरोना महामारीच्या काळात झाली.त्या वेळी, जग संकटाशी लढत असताना वाराणसीतील लोकांनी बाबांकडे शहराच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली. मंदिराचे पुजारी आणि स्थानिक प्रशासन यांनी मिळून बाबांना पोलिसांचा गणवेश परिधान करून शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि महामारीपासून मुक्ततेसाठी प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम श्रद्धेचे प्रतीक तर होता, पण त्याचबरोबर शहराचे रक्षण करणाऱ्या पोलिस दलाबद्दल आदर व्यक्त करण्याचाही हेतू होता.
 
 
भाविकांची मोठी गर्दी
बाबा कालभैरवांच्या या अनोख्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. स्थानिकांच्या मते, बाबांचे हे रूप काशीचे रक्षण करण्याचा आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा संदेश देते. असेही मानले जाते की बाबा लोकांच्या पापांचा हिशोब ठेवतात आणि त्यांच्या कर्मानुसार शिक्षा किंवा समाधान देतात.
Powered By Sangraha 9.0