मुंबई,
Salman Khan मुंबईत काल वर्ल्ड पॅडल लीग (WPL) सीझन 3 च्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान उपस्थित होता. या वेळी त्याने धाकटा भाऊ सोहेल खानला पाठिंबा दिला. सोहेल खान हा ‘खान टायगर्स’ या नवीन टीमचा मालक आहे. टेनिस स्टार महेश भूपती यांनी सह-स्थापना केलेली ही लीग १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान गोरेगाव, मुंबई येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान सलमानला विचारले गेले की त्याला कधी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये टीम खरेदी करण्याची इच्छा होती का? यावर त्याने सांगितले, “आम्हाला खूप दिवसांपूर्वी एक संघ ऑफर करण्यात आला होता, पण आम्ही तो स्वीकारला नाही आणि त्याचा पश्चात्ताप नाही. आम्ही ISL वर आनंदी आहोत. मोठ्या लीग आमच्यासाठी नाहीत, आम्ही गली क्रिकेटमध्येच चांगले आहोत.”
सोहेल खानची अपेक्षा
पॅडल स्पोर्ट्समध्ये ‘खान टायगर्स’सह प्रवेश केलेल्या सोहेल खानने लीगच्या भविष्यासंदर्भात सांगितले, “माझी इच्छा आहे की एक दिवस ही लीग IPL इतकी मोठी व्हावी. पण तेव्हाच शक्य आहे जेव्हा भारतीय खेळाडू पॅडल खेळायला सुरुवात करतील.”सलमान खानचा शेवटचा चित्रपट ‘सिकंदर’ होता, जो बॉक्स ऑफिसवर विशेष यशस्वी ठरला नाही. आता तो ‘बॅटल ऑफ गलवान’ या युद्ध-नाट्य चित्रपटात दिसणार असून, सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.