अणे महिला महाविद्यालयात ‘तुळस लावा : तुळस जगवा’

12 Aug 2025 21:49:05
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Ane Mahila Mahavidyalaya : येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात दैनिक तरुण भारत शताब्दी वर्ष तसेच श्री नरकेसरी प्रकाशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्वच्छता व पर्यावरण पूरक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे ‘तुळस लावा : पर्यावरण जगवा’ हा उपक्रम पार पडला.
 

y12Aug-Ane-Mahila 
 
रासेयो स्वयंसेवकांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून तरुण भारतचे क्रीडा प्रतिनिधी प्रा. अनंत पांडे उपस्थित होते.
 
 
प्रमुख मार्गदर्शक प्रा. अनंत पांडे यांनी तुळशीचे प्राचीन काळापासून असलेले महत्व विशद केले. पर्यावरण शुद्ध राखण्याकरिता तसेच तुळशीतील औषधी गुणधर्म याबाबत सविस्तर माहिती दिली आणि विद्यार्थिनींना तुळशीचे रोप लावून त्याचे जतन आणि संगोपन करण्याचा संदेश दिला.
 
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी, युवाशक्ती ही देशाची संपत्ती असून त्यांनी आपल्यातील ऊर्जेचा राष्ट्रविकासासाठी सकारात्मक वापर करावा. तसेच सामाजिक पर्यावरण निरोगी आणि निकोप ठेवण्याकरिता युवकांचे योगदान महत्त्वाचे ठरते, असे मत व्यक्त केले.
 
 
याप्रसंगी पर्यावरण संवर्धन आणि वैद्यकीयदृष्ट्या तुळशीचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थिनींना तुळस रोपट्यांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘सामाजिक स्थळांची स्वच्छता’ या उपक्रमांतर्गत स्थानिक दत्त चौक येथील श्री दत्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
 
 
या उपक्रमाकरिता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. ममता दयणे, प्रा. ज्ञानेश्वर गटकर, डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, प्रा. मोनाली सलामे, डॉ. सरिता देशमुख, प्रा. सुबोध मेश्राम तसेच सर्व रासेयो स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.
Powered By Sangraha 9.0