तिरोडा,
Gajanan Temple-Tiroda : तिरोडा शहरातील राम मंदिर प्रांगणातील श्री गजानन मंदिर येथे तरुण भारतच्या वतीने तुळस रोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हिरवाईचा संदेश आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन यासाठी आयोजित या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी प्राचार्य संजीव कोलते यांनी तुळशीचे पौराणिक महत्व, धार्मिक परंपरा आणि दैनंदिन आरोग्यासाठी तिचे औषधी गुण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, "तुळस ही केवळ धार्मिक पूजेसाठीच नव्हे तर दैनंदिन आरोग्य संवर्धनासाठीही अत्यंत आवश्यक आहे." तसेच डॉ. अविनाश जैसवाल यांनी तुळशीचे पर्यावरणीय व वैद्यकीय महत्व स्पष्ट केले.
कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन आगाशे, लक्ष्मीनारायण दुबे, देवेंद्र तिवारी, स्वप्निल शहारे, विहीपचे राजेंद्र लिल्हारे, पी.पी. पटले सर, जानकी पटले, रत्नाकर लांजेवार, पंडित त्रिपाठी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहीद मिश्रा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी "तुळस लावा – पर्यावरण वाचवा" अशी घोषणांसह रॅली काढून परिसरात जनजागृती केली. विद्यालयाचे प्राचार्य बारापत्रे यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन मुकेश अग्रवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन पोमेश रहांगडाले यांनी केले.