शेगाव,
Shailesh Pandey : वेद, पुराण, विविध ग्रंथ आणि आयुर्वेदामध्ये तुळशीचे अन्य साधारण महत्त्व सांगितले आहे. तरुण भारतच्या शताब्दी आणि श्री नरकेसरी प्रकाशन लि. च्या अमृत महोत्सवी वर्षात आम्ही पर्यावरण संवर्धन हा विषय हाती घेतला आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत मंदिर स्वच्छता व तुळस दान व रोपण हा उपक्रम आम्ही लोकांच्या सहकार्याने राबवित आहोत. तुळस रोपण ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशी तरूण भारतची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन तरूण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे यांनी केले. ते येथील श्री बडा बालाजी मंदिरात आयोजित तळस दान व रोपण कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघचालक श्रीराम पुंडे होते. तर, कार्यक्रमाला श्री बडा बालाजी मंदिरचे अध्यक्ष सुरेश जयपुरिया, जगदिश नारनोलिया, खंडेलवाल, डॉ. अभय गोयनका, माजी नगरसेवक किरणबाप्पू देशमुख, विजय यादव, कमलाकर चव्हाण, भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वरआप्पा साखरे, शिवसेना शहरप्रमुख संतोष लिप्ते, खामगाव अर्बन बँकेच्या शेगाव शाखेचे सल्लागार अनिल उंबरकर, रोहित देशमुख, मंगेश पाटील, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष अंजली जोशी, मंजुषा कुलकर्णी, अंजुषा देशपांडे, चेतना खेते, आरती वैद्य, अंजू पांडे व मातृशक्ती मोठ्या संख्येत उपस्थित होती.

अभियानाबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, विदर्भात कालपर्यंत जवळपास हजारो तुळस रोपांची देवाण घेवाण झाली आहे. तरूण भारतच्या शताब्दी वर्षात मंदिर स्वच्छता व पर्यावरण संवर्धनावर विशेष भर दिण्यात आला आहे. जागोजागी तुळस दान देऊन रोपण करण्याचे कार्य सुरू असून तुळस रोपण ही लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे यांनी व्यक्त केली.
तुळस रोपण व संगोपन पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक : श्रीराम पुंडे
तुळस ही प्रत्येक घराच्या अंगाणात असलीच पाहिजे. तुळशीमुळे घरात शुध्द हवा येते. कारण, तुळस ही चोवीस तास प्राणवायू देणारे झाड आहे. तिचे औषधी गुणधर्म देखील आहे. तेव्हा, प्रदुषण कमी करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने तुळस लावावी, असे आवाहन तालुका संघचालक श्रीराम पुंडे यांनी केले.
त.भा.ने राबविला प्राणवायू देणारा उपक्रम : डॉ. गोयनका
हिंदू संस्कृती व आयुर्वेदात तुळस अतिशय महत्त्वाची मानली आहे. तरुण भारतने राबवलेली ही संकल्पना सर्वांना प्राणवायू देणारी असून या पावसाळ्यात माझ्या वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार होत असलेल्या ओंकार वन येथील 5 हजार स्क्वेअर फूटमध्ये गो ग्रीन फाउंडेशनच्या सहभागातून 1 हजार तुळस रोपण व त्याची जोपासना करणार आहे, असे येथील दंतरोगतज्ज्ञ डॉ. अभय गोयनका यांनी सांगितले.
तुळस रोपण हे प्रत्येक खुल्या जागेत व्हावे : किरणबापू देशमुख
तरुण भारत ने शताब्दी वर्षानिमित्त तुळस रोपणाचे सुरू केलेले कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मी सोमेश्वर धाम स्मशानभूमीमध्ये आजपर्यंत 200 तुळशीचे रोपण केले आहे. त्याचे संगोपनसुध्दा करीत आहे. तुळस ही प्रत्येक घरातच न राहता नगर परिषद व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रत्येक वस्तीतील न. प. च्या खुल्या जागेत तुळस रोपण व्हावे, अशी अपेक्षा माजी नगरसेवक किरणबाप्पू देशमुख यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. तर, त्यांची संकल्पना ज्ञानेश्वर साखरे यांनी राबवण्याचा संकल्पसुध्दा या वेळी केला.
याप्रसंगी तरूण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे व तालुका संघचालक श्रीराम पुंडे यांच्या हस्ते श्री बडा बालाजी मंदिरचे अध्यक्ष सुरेश जयपुरिया व संचालक जगदिश नारनोलिया यांना संस्थानसाठी तुळस दान करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेगाव शहर प्रतिनिधी नाना पाटील व संजय त्रिवेदी यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन खामगाव जिल्हा प्रतिनिधी विजय कुळकर्णी यांनी केले.