सिरेगावबांध,
cleanliness-and-tulsi-plantation-program : ग्रामपंचायत सिरेगावबांध येथे १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी दैनिक तरुण भारतच्या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम आणि तुळशी वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. ग्रामपंचायत सिरेगावबांधच्या वतीने आणि गावातील नागरिकांच्या तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने मंदिर, मठ, विहार आणि समाजभवनांमध्ये स्वच्छता केली गेली व तुळशीची लागवड करण्यात आली.
उपक्रमाची सुरुवात १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून झाली. स्वच्छता मोहीम नंतर ग्रामपंचायत परिसर, शालेय परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात आली. त्यानंतर हनुमान मंदिर परिसर व ग्रामपंचायत परिसरात तुळशी रोपण करण्यात आले. अपेक्षित २०१ रोपे लावण्याचा उद्देश असून, गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे एकूण ५०१ रोपे लावण्यात आली.
सदर उपक्रमाचा उद्देश प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करणे आणि माझी वसुंधरा ६.० अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्यावरण रक्षणाची संवेदनशीलता वाढवणे होता. कार्यक्रमात सरपंच सागरताई चिमणकर, उपसरपंच इंजि. हेमकृष्ण संग्रामे, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेविका, शालेय विद्यार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम व तुळशी रोपण कार्यक्रम यशस्वी केला.