नागपूर,
Nagpur News : ‘तुळस लावा पर्यावरण वाचवा’ हा सामाजिक उपक्रम आहे. प्रत्येकाने हा उपक्रम राबवावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले. सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या तुळशीच्या रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. त्यामुळे पर्यावरण शुद्ध राहण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.
‘तुळस लावा पर्यावरण वाचवा’ उपक्रम लोहमार्ग पोलिस मुख्यालय, अजनी येथे राबविण्यात आला. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी उपक्रमाची प्रशंसा केली. शिंदे यांच्या हस्ते तुळशीचे रोपण करण्यात आले. मुख्यालय परिसरात अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही तुळशी रोपांचे रोपण केले. घर तिथे तुळशी असा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी राखीव पोलिस निरीक्षक संजय पऱ्हाड, उपनिरीक्षक सतीश रनीत, सोमजी बेठेकर, संतोष (मुन्ना) चौबे, भोलाशंकर उपरीकर, प्रशांत भांडारकर, सुनील शुक्ला यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.