डॉ. सतीश चाफले
9423402069
shivaji maharaj जगातील प्रत्येक देशाला आपला इतिहास हा प्राणप्रिय राहिलेला आहे. तो असायलाही पाहिजे. कारण प्रत्येकाचा इतिहास संस्कृती, सभ्यता, त्यांची महान परंपरा याचा गौरव बाळगणारा असतो. परिणामी प्रत्येकाला आपल्या इतिहासाचा अभिमान वाटतो. महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाने देदीप्यमान झाला आहे. त्यात थोडा जरी कसूर झाला तरी मराठी माणूस पेटून उठतो आणि महाराजांच्या बाबतीत तर नाहीच नाही. इतिहासाचे विकृतीकरण तर बिलकूलच खपवून घेतले जाणार नाही. सध्या महाराष्ट्रात अशाच एका वादाला तोंड फुटले आहे. निमित्त आहे एका मराठी सिनेमाचे; ज्याचे नाव आहे ‘खालिद का शिवाजी.’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रसारित झाला आणि वाद सुरू झाला.
इयत्ता पाचवीतल्या मुलाला ज्याचे नाव खालिद, त्याला इतिहासाचा अभ्यास करताना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधताना चित्रपट लेखकाला आणि दिग्दर्शकाला महाराजांचा नवीन इतिहास सापडला आणि त्यांनी शिवरायांचा इतिहास बदलवून टाकला. म्हणे तर काय?, छत्रपती शिवरायांच्या सैन्यात 35 टक्के मुस्लिम होते. महाराजांच्या 17 अंगरक्षकांपैकी 11 हे मुस्लिम होते. राजेंनी राज्याभिषेकावेळी मुस्लिमांसाठी रायगडावर मशीद बांधली. छत्रपती शिवारायांचा एकेरी उल्लेख, या वाक्यांना घेऊन खरा वाद आहे आणि तो अपेक्षित आहेच. कारण छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर सर्व अंगाने संशोधन झाले आहे. त्यात वरील बिंदूना घेऊन कुठेही संदर्भ आढळला नाही किंवा वरील बिंदूंना तात्त्विक आधारही चित्रपट निर्माणकर्त्याना देता आला नाही.
हे प्रश्न का पडतात? आणि ते खालिदलाच का पडतात, हा प्रश्न आहे.
वरील प्रश्नाच्या बाबतीत बोलायचे झालेच तर समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न वाटतो. असे प्रयत्न वारंवार होत आले आहे.
तत्कालीन प्राथमिक संदर्भ साधनामध्ये महाराजांचे समकालीन असलेले कृष्णाजी अनंत सभासद यांची ‘सभासद बखर’ तसेच मल्हार रामराव चिटणीस लिखित सप्त प्रकरणात्मक चरित्र ज्याला ‘चिटणीस बखर’ असे म्हणतात. ही शिवकालीन मूळ ग्रंथ मानली जातात. यात कुठेही वरील वाक्यांचा संदर्भ मिळत नाही. शिवरायांच्या सैन्य दलात कधी 35 टक्के तर कधी 50 टक्के मुस्लिम होते, असा विपर्यास केला जातो. मुळात महाराजांच्या सैन्य दलात घोडदळ-पायदळ अशी रचना होती. ती संख्या दोन लक्षच्या घरात असावी. या संख्येत मुस्लिम सैन्य होते का? तर, अनेक इतिहासतज्ज्ञ म्हणतात, ती असेल तर अगदी बोटावर मोजण्याइतपत असावी. या सैन्यात सरनोबत म्हणून नूर खान बेगचा उल्लेख आला आहे. पण तो 1657 च्या पूर्वी आला आहे. नंतर तो उल्लेख कुठेही सापडत नाही. त्या मागचे कारण असे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे 1657 च्या पूर्वी शहाजी राजे यांच्या वतीने स्वराज्यातील राज्य कारभार बघत होते आणि तत्कालीन व्यवस्थेत आदिलशाही राजदरबाराच्या वतीने शहाजी राजांच्या आज्ञानुसार कार्य सुरू असल्यामुळे त्या सर्व व्यवस्थेवर शहाजी राजे यांच्या व्यवस्थेचा प्रभाव होता. म्हणून शिवरायांना दिलेली माणसे ही शहाजी राजेंनी दिलेले होती. पुढे 1657 नंतर शिवारायांनी आदिलशाहीला विरोध सुरू केला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या सैन्य दलातील किरकोळ मुस्लिम संख्या जी होती ती पुढे दिसत नाही. यासोबत काजी हैदर नमक एक फारसी भाषातज्ज्ञाचा उल्लेख आहे. याला फारसी भाषांचे भाषांतर करण्यासाठी वाकयाणवीस म्हणून नियुक्त केले होते. कारण त्यावेळी पत्रव्यव्यहार हा फारसीतून चालायचा व फारसीचे मराठीत भाषांतर करावे लागत असे. काझी हैदरची नियुक्ती दुभाषा म्हणून करणे काळाची गरज होती. यामुळेच महाराजांनी नंतर राज्य व्यवहार कोषाची निर्मिती केली. पण हाच काझी हैदर महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि नंतर त्याने स्वराज्यातील गुप्त बातम्या शत्रूंना देऊन स्वराज्याचे अतोनात नुकसान केले. मदारी मेहतरच्या बाबतीतही कुठलाही समकालीन ठोस पुरावा उपलब्ध नाही. समुद्रावर आपला वचक असावा म्हणून आरमाराच्या निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात दौलतखानाची दर्यासारंग म्हणून नेमणूक केल्याचे दिसते, पण पुढे आग्रे आणि धुळप यांनीच आरमाराचे नेतृत्व केले. हा तुरळक उल्लेख सोडला तर महाराजांच्या सैन्य दलात मुस्लिम होते, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. मग 35 टक्के मुस्लिम महाराजांच्या सेनेत आले कुठून? कवींद्र परमानंदाचे शिवभारत व जयराम पिंडे यांचे पर्णालपर्वतग्रहणाख्यान या समकालीन संदर्भ ग्रंथातही असा कुठलाही पुरावा मिळत नाही.shivaji maharaj छत्रपती शिवाजी महाराजांच्या 17 अंगरक्षकांपैकी 11 अंगरक्षक हे मुस्लिम होते, असं या चित्रपटातून ठामपणे सांगण्यात आले आहे. त्यालाही पुरावा नाही. फक्त त्यात सिद्धी हिलालचे नाव पुढे येते. अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगी सिद्धी हिलालचा उल्लेख काही दुय्यम साधनांमध्ये केलेला दिसून येतो. परंतु सिद्धी हिलाल कोण होता हे आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे. भारतात मध्ययुगीन कालखंडामध्ये गुलाम विकत घेण्याची प्रथा होती. शिवरायांच्या नातेवाईकाने बालपणीच सिद्दी हिलाल यास विकत घेतले होते. त्याला क्रित पुत्र म्हणतात. म्हणून सिद्दी हिलाल जन्माने जरी मुस्लिम असला, तरी त्यावर हिंदू धर्माचेच संस्कार झाले होते. त्यावेळी हिंदू धर्मात धर्मांतरण झाल्यास परत हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था तर होती, परंतु एखाद्या परधर्मातील व्यक्तीला आपल्या धर्मात घेण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे सिद्धी हिलालचे नामकरण किंवा हिंदू धर्मामध्ये धर्मांतरण त्या काळात करता आलं नाही. रायगडावर मुस्लिमांसाठी मशीद बांधली होती, असाही उल्लेख सिनेमांत आहे. पण याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. रायगडाचे बांधकाम हे हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली झाले, याची स्पष्ट नोंद आहे. रायगडावर एक शिलालेख कोरला आहे. त्यात हिरोजींनी रायगडावर कोणकोणते बांधकाम झाले आहे, याचा उल्लेख केला आहे; त्यात कुठेही मशीद बांधल्याची नोंद नाही.
प्रबोधन म्हणून शिवकालीन खोटा इतिहास मांडण्याचा अजेंडा पद्धतशीरपणे राबविला जातो आहे. बाबा याकूतलाही महाराजांच्या गुरुस्थानी बसविण्याचा अट्टाहास किती ठामपणे केला जातो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचा खोटा विमर्श ‘नरेटिव्ह’ प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न दिसतो. सध्याच्या काळात सेक्युलरिझम आणि सर्वधर्मसमभाव यांचा उदो उदो चाललेला दिसतो. विशेषतः वाढत्या हिंदुत्वाच्या ताकदीला कमजोर करण्यासाठी डाव्या विचारसरणीकडून याचा वापर केला जातो. हिंदू समाजाला संभ्रमित करण्यात येते. इतकेच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेले समाजाचे उत्कट प्रेम अशा देशद्रोही डोळ्यांना अडथळा वाटत असल्याने शिवाजी महाराजांवरही सेक्युलर असा शिक्का मारण्यात येतो. त्याचप्रमाणे काही विशिष्ट धर्माचे शिवव्याख्याते छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे कसे असे पटवून देण्यात मागेपुढे बघत नाही. खरं तर इस्लामच्या धर्मग्रंथात इतर धर्मीयांबद्दल असलेले क्रूर विचार आणि त्यांचा हजार वर्षांचा हिंसक इतिहास बघता सर्वधर्मसमभाव हे थोतांड वाटते. नरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा सिनेमाचा आधार घेतला जातो, तोच प्रयत्न ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटातून झालेला दिसतो. सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की, एकीकडे देश 21 व्या शतकात आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहे. विचारांनी प्रगल्भ झालो असतानासुद्धा आम्ही सकारात्मक विचार करीत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एका कलाकृतीचे निर्माण करताना स्वतःची वैयक्तिक अस्मिता निर्माण करण्याच्या नादात राष्ट्रीय अस्मिता आम्ही विसरलो का? आपला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी राष्ट्र-महापुरुषांचा मानसन्मान ही तेवढाच महत्त्वाचा आहे. असा विचार हा सामान्यापासून ते बुद्धिजीवीपर्यंत सर्वांनी विशेषत: चित्रपट निर्माते लेखक, दिगदर्शक यांनी करणे गरजेचे आहे. नाहीतर ‘खालिद का शिवाजी’ ही 21 व्या शतकातील शोकान्तिका बनून राहील. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानातील तमाम हिंदू समाजाचे श्रद्धास्थान आहे. शिवकालीन इतिहासाचे असे सादरीकरण हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. अशा सिनेमावर बंदी घालणे हेच योग्य राहील.
(लेखक हे रातुम नागपूर विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.)