कोण कमावणार, कोण गमावणार?

19 Aug 2025 13:01:49
 
 
Uddhav Raj एखाद्या भांड्यात उकळणारा कोणताही द्रव पदार्थ आगीच्या कमाल धगीमुळे कमाल तापमानाच्या पातळीवर पोहोचल्यावर एक तर तो आटून जाण्यास सुरुवात होते किंवा उकळून ऊतू जाऊन पुन्हा आपल्या पातळीवर स्थिरावतो. उत्साहाचेही तसेच असते. तो एकदा ओसंडून ऊतू गेला की पुन्हा त्याखाली कितीही धग निर्माण केली, तरी तो पुन्हा ऊतू जात नाहीच, उलट आटूनच जातो. कदाचित त्यामुळेच, काही महिन्यांपूर्वी काही मोजक्या वृत्तवाहिन्या आणि माध्यमांच्या नसानसांत ओसंडणारा उत्साह त्या वेळी ऊतू गेल्यानंतर पुन्हा त्याला उकळ्या फुटल्याच नाहीत. आता तो आटतच चालला आहे. त्या दिवशी ज्या क्षणाकडे ही माध्यमे आणि वाहिन्या डोळ्यात प्राण आणून पाहात होत्या, त्या क्षणाचे साक्षीदार झाल्यानंतर त्यांचा उत्साह कमालीचा ओसंडून ऊतू गेला आणि पुढे त्या उत्साहास उकळ्यादेखील फुटेनाशा झाल्या. महाराष्ट्रात मराठीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेस भाषाभिमानाच्या संधीचे आयते सोने हातात गवसल्याचा आनंद झाला आणि मराठी अस्मितेच्या कुबड्या घेऊन तरी दोघे भाऊ एकत्र येतील या एमकेव आशेपायी गेल्या सुमारे दोन दशकांपासून त्यांच्या ऐक्याची आस लागलेल्या माध्यमांचा आनंद ओसंडून वाहू लागला.
 
 

उद्धव ठाकरे  
 
 
महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात या दोघांनी रान उठविल्यास महायुती सरकारची कोंडी होईल आणि उद्धव व राज ठाकरे यांना राजकीय संधीचे आकाश ठेंगणे होईल अशी अटकळ बांधलेल्यांची उमेद जागी झाली आणि त्यांनी उभय भावंडांच्या ऐक्याच्या तुताऱ्या फुंकण्यास सुरुवात केली. आपल्या ऐक्याकडे डोळे लावून बसलेल्या माध्यमांचा वापर करून घेण्याच्या संधीची खात्री पटल्यावर राज व उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या सर्वपक्षीय आंदोलनाचा मुखवटा चढवून आपल्या ऐक्याच्या संधीचे तात्पुरते सोने केले, तेव्हा काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांत ऊतू जाणारा उत्साह महाराष्ट्राने अनुभवला होता. माध्यमांनी तटस्थपणे राजकीय घडामोडींकडे पाहावे असा संकेत असतो. पण काही माध्यमांनीही त्या ऐक्याच्या मुहूर्तावर टाळ्याचा गजर केला आणि संकेतांची ऐसीतैसी करून टाकली. त्या वेळी ओसंडणाèया अभूतपूर्व उत्साहास एवढ्या प्रचंड उकळ्या फुटल्या की तो सारा उत्साह एकाच वेळी अनावरपणे अक्षरश: ओसंडून ऊतू गेला. तो क्षण सरला आणि आता सारे काही पूर्वपदावर आले आहे. त्या दिवशी, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याअखेरीस हिंदी सक्तीच्या निर्णयाविरुद्ध एकत्र येऊन मोर्चा काढण्याच्या निर्णयाची हवा राज्य सरकारने काढून टाकल्यावर मोर्चाऐवजी विजयी मेळावा आयोजित करून उबाठा-मनसेचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या नेत्यांच्या हजेरीत राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या मध्ये वीस वर्षांपासून स्वहस्ते धरलेला दुहीचा अंतरपाट दूर केला, एकमेकांची गळाभेट घेतली, तेव्हा अनेक लेखण्यांनी आणि जिभांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपाची भाकिते वर्तविली होती. आता सुमारे दीड महिन्यांचा काळ लोटल्यानंतर या लेखण्या आणि जिभादेखील शांत झाल्या आहेत आणि त्या दिवशीच्या गळाभेटीनंतर पुन्हा एकदा वातावरण जैसे थे होऊन उबाठा-मनसे ऐक्याच्या वावड्यांना नवी उकळी आणण्यासाठी संजय राऊत यांनी नव्याने कंबर कसली आहे.Uddhav Raj त्या दिवशी ओसंडून ऊतू गेलेला तो उत्साह पुन्हा एकदा अवतरेल आणि राजकारणातील भूकंपाची भाकिते चालविण्यासाठी त्या लेखण्या पुन्हा एकदा सरसावतील ही त्यांची अपेक्षा मात्र आता फारशी फळाला येताना दिसत नाही. म्हणूनच, महापालिका निवडणुकांच्या अगोदर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव ठाकरे गट यांच्या युतीच्या बातमीतून, या नेत्यांचे भविष्यातील कमावणे किंवा गमावणे यांचा हिशेब मांडावा लागणार आहे.
 
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व नाकारून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यावर या पक्षाच्या माथ्यावर महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांचे प्रचंड मोठे ओझे होते, ही बाब नाकारता येणार नाही. कदाचित त्यामुळेच, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळाला नसला तरी शिवसेना-भाजपचा विजय खडतर करून या पक्षाने सुमारे चार टक्के मतांचा जनाधार मिळविला होता, तर त्या विधानसभा निवडणुकीत साडेपाच टक्क्यांहून अधिक मते मिळवून 13 मतदारसंघांतून विधानसभेत प्रवेशही मिळविला होता. ही कामगिरी राज ठाकरे यांना पुढे टिकविता आली नाहीच, उलट पक्षाच्या कामगिरीची झपाट्याने घसरणच सुरू झाली. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर हा पक्ष चाचपडू लागला आणि भाजपसोबत उद्धव ठाकरे यांचे बिनसल्याचे निमित्त करून भाजपशी हातमिळविणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुरावलेल्या उद्धव ठाकरेंची जागा राज ठाकरेंना देण्याचे गाजर भाजपने हातात धरताच मनसेच्या उतरत्या कळेला उजाळा मिळणार अशा अटकळीही बांधल्या जाऊ लागल्या आणि मनसेच्या पाठीवर बसून काठीला बांधलेले गाजर समोर धरलेल्या भाजपने राज ठाकरेंच्या राजकारणाचे पितळ उघडे पाडण्यास सुरुवात केली. राज ठाकरे यांच्याकडे कमावण्यासारखे काही उरलेले नाही, हे भाजपला माहीत होते आणि आपल्याकडे गमावण्यासाठीदेखील काही राहिलेले नाही हे राज ठाकरे यांनाही ठावूक होते. त्यामुळे गाजरामागे धावण्याच्या या खेळात दमछाक झाल्यावर आता स्थैर्यासाठी कोणाच्या तरी आधाराची राज ठाकरेंच्या पक्षाला गरज होतीच आणि तेव्हाच हिंदी सक्तीच्या मुद्याची संधी चालून आली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐक्याचा नवा खेळ महाराष्ट्राला पाहावयास मिळावा यासाठी सत्तेतील चाणक्यांनी हा डाव मुद्दामच घडवून आणला असे तेव्हा बोलले जात होते, पण तो स्वतंत्र चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. या संधीमुळे उद्धव आणि राज यांना एकत्र आणण्याच्या संजय राऊत यांच्या अपेक्षेला नवे धुमारे फुटू लागले. महाविकास आघाडीच्या आधाराने उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या तंबूत नेण्याच्या मोहिमेत संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती. अन्यथा, भाजपची सोबत सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंना सत्तेचे दरवाजे कायमचे बंद झाले असते याची जाणीव झालेल्या संजय राऊत यांनी प्रसंगी स्वत:वर अपमानाचे आणि टीकेचे वार झेलत उद्धव ठाकरे यांच्या इमानी निष्ठावंताचे कर्तव्य बजावत, उद्धव ठाकरे यांच्याकडे कमावण्यासारखे काही राहिले नाही हे स्पष्ट होताच नव्या समीकरणाची आखणी घेण्यासाठी पुढाकार घेतला.Uddhav Raj युती किंवा ऐक्याबाबत राज किंवा उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगलेले असतानाही, संजय राऊत यांचा उत्साह मात्र आता एकतर्फी ऊतू चाललेला दिसत असल्याने, भविष्यात कमावण्यासारखे काही न राहिलेल्या व गमावण्यासाठी काहीच हाती नसलेल्या दोघा पक्षांच्या युतीची नवी समीकरणे महाराष्ट्रात तयार झाली, तर त्यात कोणास फारसे आश्चर्य वाटणार नाही.
 
भाजपसोबतच्या युतीचा कटोरा जाहीरपणे फेकून दिल्यानंतर शरद पवार यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाची संधी मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपेतर विरोधी पक्ष किंवा अन्य संबंधित संघटनांसोबत युती करण्याच्या साऱ्या शक्यतांचे सोने करून पाहिले. हिंदुत्वाचा मुद्दा सत्तेच्या राजकारणाआड येऊ नये यासाठी आपला मुखवटाही बाजूला काढून ठेवला आणि भेटेल त्याला युतीची गळही घातली. पण गटाला लागलेली गळती आता आवरण्यापलीकडे गेल्याची जाणीव ठाकरे यांना झाली आहे. अशा परिस्थितीत, महापालिकेच्या सत्तेची हंडी फोडण्यासाठी पायाखाली नवा थर रचावा लागेल, हे ओळखून सुरू झालेल्या प्रयत्नांना महाविकास आघाडीतून फारसा प्रतिसाद मिळत नाही, वज्रमूठ तर केव्हाच सैल पडली आहे आणि काँग्रेसने स्वबळाचा नारा कधीपासूनच लावला आहे. शरद पवार यांच्या राजकारणावर विसंबून राहणे विश्वासार्ह नाही, अशा परिस्थितीत, गमावण्यासारखे काहीच हाती राहिले नसलेला एकमेव पक्ष तरी सोबत घ्यावा ही त्यांच्या पक्षाची नवी नीती आता प्रत्यक्षात येऊ शकते. तसेही, राज ठाकरे यांच्या पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात फारशा अपेक्षा राहिलेल्या नसाव्यात. निवडणुका ही मनसेकरिता गाजराची पुंगी ठरणार असून उबाठाच्या सोबतीने ती वाजलीच, तर ठीक, अन्यथा तीच पुंगी मोडून वाजवण्याची मनसेची तयारी असेलच! कदाचित, यामुळेच उबाठा-मनसे ऐक्याकडे डोळे लावून बसलेल्यांच्या उत्साहाचा आता ओहोटीचा काळ सुरू झाला असावा.
Powered By Sangraha 9.0