नागपूर,
Divya Deshmukh दिव्या एकतर भारतीय व त्यातल्या त्यात नागपूरकर असल्याने मला तिचा अभिमान वाटत आहे. तिने कमी वयातच आपली प्रतिभा दाखवून नागपूरचे नाव विश्वपटलावर नेल्याने तिचा गौरव करणे आपले आद्यकर्तव्य मी समजतो, असे उद्गार बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात काढले.
ते पुढे म्हणाले, आतापर्यंत बुद्धिबळ खेळात चिनचे वर्चस्व होते, पण आता अंतिम सामन्यात दोन्ही महिला भारतीय असल्याने भारतीयांची मान उंचावली आहे. माझा आवडता खेळ क्रिकेट असून मोजकेच देश क्रिकेट खेळतात. पण, बुद्धिबळ हा खेळ १०० देश खेळत असल्याने दिव्याने सर्वांमधून आपले वर्चस्व गाजवले, हे ही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य नागरी सोहळा घेण्यात आला. महाराष्ट्रृ शासनाकडून दिव्याला ३ कोटी तसेच महाराष्ट्र चेस असोसिएशनकडून ११ लाखांचा चेक प्रदान करण्यात आला.
सत्कारमूर्ती Divya Deshmukh दिव्या देशमुख म्हणाली, सत्कार नागपूरकरांचा आहे, त्यांचे आभार मानते. मला आई-वडील व प्रशिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन तसेच देवाच्या आशीर्वादानेच हे यश मिळाले, त्याचा मला फार अभिमान आहे. असोसिएशनने मला याआधी वाईल्ड एन्ट्रीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी दिल्याने मला त्याचाही खूप फायदा झाल्याचे तिने सांगितले.
आ. परिणय फुके म्हणाले, राज्याने अशाप्रकारे सोहळा आयोजित करून क्रीडाप्रेमींना अभिमान वाटावा असा दिव्याचा गौरव सोहळा क्रीडाप्रेमी व नवोदितांसाठी प्रेरणा ठरणारा राहणार आहे.क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या या मंत्री पदाच्या पहिल्याच भाषणात हा दिवस दिव्याच्या कष्टाचा व संकल्पनेचा गौरव करण्याचा दिवस असून आतापर्यंतची तिची वाटचाल खरोखर कौतुकास्पद असून पुढेही चांगली कामगिरी तिच्याकडून होईल, अशी आशा व्यक्त करत क्षेत्रात जे काही करता येईल, त्यासाठी आम्ही खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन दिले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत क्रीडा शिक्षक, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मंचावर क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आ. संदीप जोशी, आ. प्रवीण आ. कृष्णा खोपडे, आ. अभिजित वंजारी, डॉ. परिणय फुके, क्रीडा विभाग अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा विभागाच्या आयुक्त शितल उगले, माजी आ. गिरीश व्यास, मेजर ध्यानचंद पुरस्कर्ता ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांची उपस्थिती
प्रतिभा ओळखण्याची गरज
कविवर्य सुरेश भट सभागृह शालेय विद्यार्थ्यांनी खचाखच भरले होते. दिव्याच्या प्रेक्षकांकडून झालेल्या ‘एन्ट्री’च्या वेळी मुलांनी दिव्या.. दिव्या.. असा मोठ्याने आवाज करत स्वागत केले. विद्यार्थ्यांसमोर निवेदिका श्वेता शेलगावकर यांनी बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची एक प्रेरक मुलाखत घेतली. त्यात दिव्याने ‘प्रतिभा सर्वांमध्ये असते ती ओळखण्याची गरज आहे’, असेे तिला टेनिस व भारतीय संगीत, आवडता खाद्य पदार्थ ‘पाणीपुरी’ असल्याचे तिने सांगितले.
प्रेरणादायी प्रवास
- वयाच्या १२व्या वर्षी ‘राष्ट्रीय विजेती’
- १५व्या वर्षी आशियाई ‘कांस्यपदक’
- २०२४च्या कॉमनवेल्थ खेळात ‘९ पैकी ८ सामन्या’त विजय
- फाईड रेटिंगमध्ये पहिली ‘महिला ग्रँडमास्टर’