आज आवतन घ्या, उद्या जेवायला या...

*पोळ्यानिमित्त बैलांची खांद शेकणी, वाडबैलाचे पूजन

    दिनांक :21-Aug-2025
Total Views |
वर्धा,
Bailpola 2025 : शेतात यांत्रिकीकरणाने कितीही शिरकाव केला तरी, शेतकर्‍यांचा खरा सखा बैलच आहे. शेतातील काही कामे बैलजोडीशिवाय होतच नाहीत. त्यामुळे वर्षातील एक दिवस का होईना बैलांच्या ऋणातून मुत होण्यासाठी शेतकरी पोळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. गुरुवार २२ रोजी पोळा असल्याने गुरुवारी बैलांची सायंकाळी खांदा शेकणी करून उद्या जेवायला या असे निमंत्रण देण्यात येणार आहे.
 
 
pola
 
शेतकर्‍यांचा आवडता सण बैलपोळा हा अवघ्या एका दिवसावर आला आहे. ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला महत्त्वाचे स्थान आहे. बैलाविषयी कृतज्ञता व्यत करणारा पोळा. त्यानिमित्त गुरुवार २१ रोजी बैलांची तूप आणि हळदीने खांदा शेकणी करून आज आवतन घ्या, उद्या जेवायला या, एक नमन पार्बती हरहर महादेव, अशी साद घालत शेतकरी बैलांना आमंत्रण देणार आहेत.
 
 
पोळ्याच्या पूर्व संध्येला बैलांची तूप व हळदीने खांदा शेकणी करण्यात येते. वर्षभर बैलांच्या खांद्यावर ओझे असते. पोळ्यानिमित्त बैलांच्या खांद्याला पळसाच्या पानांनी तूप आणि हळद लावून शेकण्यात येते. यावेळी कपड्यात सव्वाशेर धान्य टाकूण, ढोली भरो, खोळ भरो, असे म्हणत ते धान्य घराच्या छताला बांधून ठेवण्याची प्रथा आहे.
 
 
पोळ्याचा पहिला दिवस म्हणजे वाडबैलाचा. या दिवशी मातीच्या बैलांची व घरच्या बैलजोडीची खांद शेकून महादेवाचे गाणे म्हणत हरहर महादेवाचा गजर करीत पूजा केली जाते. दुसर्‍या दिवशी बैलपोळ्याचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते.
 
 
बैलजोडींची संख्या कमी झाली आहे. गावात मोजयाच शेतकर्‍यांकडेच बैलजोडी आहे. तरीही सर्व शेतकर्‍यांचा उत्साह कायम असून सर्व शेतकरी बैलपोळ्यात उत्साहाने सहभागी होतात. बैल पोळा एका दिवसावर येऊन ठेपल्याने सर्वत्र तयारीची धामधूम सुरू आहे. तर तिसर्‍या दिवशी तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते.