वेध
रेवती जोशी-अंधारे
9850339240
india-pak-cricket येत्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेट मालिकेत भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान 14 सप्टेंबरला सामना खेळला जाणार आहे. सोबतच दोन्ही संघादरम्यान आणखी दोन सामने खेळले जाण्याचीही शक्यता आहे. क्रिकेट ही राष्ट्रभावना समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा सामना खेळण्यास नकार द्यावा, असा मतप्रवाह आहे. मात्र, पैसा बोलता है या न्यायाने बीसीसीआयने या सामन्याला नकार देता येणार नाही, असं उत्तर दिलं आहे. याच पाकिस्तानच्या हॉकी संघाने, भारत सुरक्षित नसल्याचे कारण सांगून आशिया चषक खेळण्यास नकार दिला होता, हे आपल्या गजनी स्मरणशक्तीला कोण सांगणार? सी-व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, 51 टक्के भारतीयांनी भारत-पाकिस्तान सामना खेळण्यास विरोध केला आहे तर 45 टक्के नागरिकांच्या मते, हा सामना खेळला जायला हवा. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेटचे संबंध ठेवणे हा आपल्या जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे, असं मानणाऱ्या भारतीयांची संख्या 75 टक्के आहे.
1984 मध्ये सुरु झालेल्या आशिया चषकाच्या दुसऱ्याच सिझनमध्ये श्रीलंकेकडे यजमानपद असताना, भारतीय संघानं खेळण्यास नकार दिला. 1990-91 मध्ये राजकीय संबंध बिघडल्याचे कारण सांगून, पाकिस्तानने भारतात येऊन खेळण्यास नकार दिला. हरभजन सिंग, शिखर धवन, युवराज सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनी देश सबसे पहले अशी भूमिका सोशल मिडीयावर स्पष्ट केली आहे.
एकीकडे भारतीय क्रिकेटपटू ठाम मत मांडत असताना, पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मात्र पुन्हा विकृत मानसिकतेचं प्रदर्शन मांडलं. तसे तर पाकिस्तानी इनफ्लुएन्सर्सचे इन्स्टाग्राम खाते भारतात बंद आहेत. पण, पाकचा क्रिकेटपटू राणा फहीम अश्रफ याची चिथावणीखोर पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात पाकिस्तानी आर्मीच्या गणवेशातील व्यक्ती तिरंग्याची साडी नेसलेल्या स्त्रीचा हात पकडून, तिच्या भांगात सिंदूर भरतो आहे. मागे एक बॅनर लागले असून, त्यावर न्यू चॅप्टर बिगिन्स असे लिहिले आहे. पाकिस्तानला कोणते नवीन चॅप्टर सुरू करायचे आहे? ऑनलाईन पोस्टच्या या लढाईत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे पातळी सोडली आहे. हा अश्रफ आशिया चषकात खेळणार आहे.
भक्कम रेव्हेन्यूचा चष्मा लावलेल्या बीसीसीआयने राष्ट्रसन्मान कधीचाच विकला आहे. नागरिकांचा विरोध सहन करू, दुबईचा न्युट्रल व्हेन्यू निवडू आणि पाकड्यांचे भारतमातेवरील घाणेरडे कॉमेंट्सही सहन करू पण, पैसा कमविण्याची संधी सोडणार नाही, अशी लोभी भूमिका घेतलेली बीसीसीआय हा सामना खेळविण्यासाठीच उतावीळ आहे. एकीकडे ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे, त्यावरून राजकारणही रंगलेलं आहे, पहलगाम हत्याकांडातून दुर्दैवी कुटूंबं सावरलेली नाहीत, सिंधूचं पाणी थांबलेलं आहे आणि दुसरीकडे भारतीयांच्या गळ्यातील ताईत असलेला भारतीय संघ दहशतवादी देशासोबत सामना खेळण्यास धडपडतो आहे. पाकिस्तानवर भारतीय परराष्ट्र धोरणामुळे निर्माण झालेला दबाव आणखी वाढविण्याची हीच संधी होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वाधिक शक्तीशाली आणि आर्थिकदृष्ट्या प्रभावी क्रिकेट मंडळ आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डही त्यांच्या अर्थव्यवस्थेप्रमाणेच दिवाळखोर आहे.india-pak-cricket अशात भारत-पाकिस्तानचा सामना होणं म्हणजे पाकिस्तानला आर्थिक उभारी मिळण्यासारखं आहे. जगभरात 1 अब्ज लोक हा सामना बघतील, असा अंदाज आहे. त्यातून, प्रसारक, प्रायोजक आणि क्रिकेट मंडळांना सामान्यांच्या कल्पनेपलिकडे फायदा होतो. ही एक मॅच न खेळून होणारं नुकसान, बीसीसीआय आणि करोडपती खेळाडू सहज उचलू शकतात. आपल्या नियम, अटी, शर्ती लावून अनेक वेळा बीसीसीआयने टूर्नामेंट्समध्ये भाग घेतला आहे. आता राष्ट्राचे धोरण आणि समाजाची धारणा लक्षात ठेवून निर्णय घेण्याची वेळ आली आहे.