नागपूर,
madhav-nethralaya : माधव नेत्रालयातर्फे राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडानिमित्ताने जनजागृती व नेत्र तपासणी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती महासचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
भारतात दरवर्षी सुमारे 1 कोटी मृत्यू होत असताना नेत्रदान केवळ सुमारे 30 हजारच करतात. दुसरीकडे विविध कारणांनी दृष्ठिहिनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नेत्रदानाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही माधव नेत्रालयातर्फे 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने जनजागृती व नेत्र तपासणीवर भर देण्यात आला आहे. विविध शाळांमध्ये ‘नेत्रदान श्रेष्ठदान’ विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी 7 सप्टेंबरला गजानन नगरातील माधव नेत्रालय संकल्प केंद्रातून सकाळी 9 वाजता दुचाकी रॅली निघेल. छत्रपती चौकातून रिंग रोडने थेट हिंगणा रोडवरील वासुदेेव नगरातील माधव नेत्रालय सिद्धी केंद्रात पोहोचेल. माधव नेत्रालय, सक्षम, एम्स, सेवांकूर आदी संस्थेचे कर्मचारी व कार्यकर्ते सहभागी होतील.
सोमवारी 25 ऑगस्टला दुपारी 4 वाजता गजानन नगरातील माधव नेत्रालय संकल्प केंद्रात उद््घाटन होणार असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, रा.स्व. संघाचे मोहिते भाग संघचालक रमेश पसारी उपस्थित राहतील. सोमवारी 9 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता गजानन नगरातील माधव नेत्रालय संकल्प केंद्रात समारोप होणार असून महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, रा.स्व. संघाचे अजनी भाग संघचालक डॉ. राजू कापरे उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला व्यवस्थापकीय संचालक मेजर जनरल (निवृत्त) अनिल बाम, माध्यम समन्वयक अनिल गडेकर उपस्थित होते.
विविध प्रकल्प
माधव नेत्रालयाची स्थापना 18 मार्च 2018 रोजी झाली. 25 ऑगस्ट 2020 रोजी गजानन नगरात माधव नेत्रालयाचे स्थानांतरण झाले. आतापर्यंत 4 हजारांवर नेत्रदान प्राप्त झाले असून प्रत्यक्ष रुग्णालय तयार झाल्यानंतर 2020 ते 634 नेत्रदान प्राप्त झाले. मोतिबिंदू शस्त्रक्रिये बरोबरच माधव नेत्रपेढी, रॅटिनोपॅथी ऑफ प्रमॅच्युरिटी (आरओपी), लो व्हिजन हे तीन प्रकल्पही चालतात. डागा, म्युर मेमोरिअल व मातृसेवा संघ या तीन रुग्णांसोबत सामंजस्य करार झाला असून दर महिन्याला दोन पथके तेथे जातात. अकाली जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यांची विशेषतः तपासणी केली जाते. अशा शंभरावर बालकांच्या दृष्टीवर उपचार करण्यात आले आहेत, असे विश्वस्त संदीप धर्माधिकारी यांनी सांगितले.