मुंबई,
Vash Level 2 जानकी बोदीवाला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिची हिट ठरलेली सुपरनॅचरल फिल्म ‘वश’चा सिक्वेल ‘वश लेव्हल 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. पहिल्या भागाच्या तुलनेत या चित्रपटाला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असून गुजराती प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरभरून दाद दिली आहे.
चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईकडे पाहिले तर त्याने १.३ कोटी रुपये उचलले होते. त्यात गुजराती भाषेतून ८५ लाख रुपये आणि हिंदी भाषेतून ४५ लाख रुपये कमावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट दिसून आली आणि त्याने १ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. अशा प्रकारे दोन दिवसांत ‘वश लेव्हल 2’ ची एकूण कमाई २.३० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावर नजर टाकली तर गुजराती भाषेत ८.६० टक्के आणि हिंदी भाषेत १३.७३ टक्के प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला. हिंदी शोच्या सकाळच्या वेळेत ९.३० टक्के, दुपारच्या वेळी १५.०५ टक्के, सायंकाळी १४.०७ टक्के आणि रात्रीच्या शोमध्ये १६.४८ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवली गेली. गुजरातीपेक्षा हिंदी भाषेत अधिक प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे ‘वश लेव्हल 2’ अशा काळात प्रदर्शित झाला आहे, जेव्हा सिनेमागृहात ‘वॉर 2’ आणि ‘कुली’सारखे मोठ्या बजेटचे, मोठ्या कलाकारांचे चित्रपट लागले आहेत. त्यांच्याही पुढे जाऊन ‘वश लेव्हल 2’ कोटींचा व्यवसाय करत आहे, ही बाब नक्कीच लक्षवेधी ठरत आहे. निर्मात्यांना आशा आहे की विकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल.
‘वश लेव्हल 2’ या चित्रपटाचा बजेट ५ ते १० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. यात जानकी बोदीवाला, हितु कनोडिया, हितेन कुमार आणि मोनल गज्जर यांच्या मुख्य भूमिका आहेत. कथा अशी आहे की आर्या अजूनही त्या काली शक्तीच्या प्रभावाखाली आहे, जी बारा वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात आली होती. तिच्या वडिलांना तिच्या अवस्थेची जाणीव होते आणि त्यानंतर अनेक अजब घटनांची मालिका सुरू होते. पुन्हा एकदा तिच्या वडिलांना आपल्या मुलीला वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
हा चित्रपट कृष्णदेव याग्निक यांनी दिग्दर्शित केला असून के.एस. एंटरटेनमेंट स्टुडिओज, अनंता बिझनेसकॉर्प, पटेल प्रोसेसिंग स्टुडिओज आणि बिग बॉक्स सीरीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी निर्मिती केली आहे.