मुंबई,
Actress Priya Marathe Death प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाची दुःखद वार्ता समोर आली आहे. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. या आजारामुळे त्यांनी गेल्या काही काळापासून अभिनय विश्वापासून अंतर घेतलं होतं. मात्र इतक्या कमी वयात त्यांचं जाणं हे मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. पहाटे चार वाजता मीरा रोड, मुंबई येथे प्रियाचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रियाच्या जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकलाकार तसेच चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात जन्मलेल्या प्रियाने 2006 मध्ये ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील भूमिकेमुळे प्रिया घराघरात पोहोचल्या. हिंदी मालिकांमध्ये ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ तर मराठीत ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘कॉमेडी सर्कस’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका केल्या.
टीव्हीबरोबरच त्यांनी चित्रपटसृष्टीतही कामगिरी केली. 2016 मध्ये आलेल्या ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास जरी लांबचा नसला तरी प्रभावी ठसा उमटवणारा ठरला. वैयक्तिक आयुष्यात प्रियाने 2012 मध्ये अभिनेता शंतनू मोघेसोबत विवाह केला होता. शंतनू हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुत्र आहेत. Actress Priya Marathe Death प्रियाच्या जाण्याने शंतनू आणि संपूर्ण मोघे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पती आणि आई असा परिवार आहे. अभिनयाची आवड, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनयामुळे प्रिया मराठे प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्राने एक प्रतिभावान अभिनेत्री गमावली आहे. चाहत्यांच्या आठवणीत आणि पडद्यावरील त्यांच्या भूमिका मात्र सदैव जिवंत राहतील.