गोंदिया,
Nomadic Community Day : शासन निर्णयानुसार आज, ३१ ऑगस्ट रोजी येथील सामाजिक न्याय भवनात भटके विमुक्त समाज दिवस कार्यक्रमाचे आयोजन शासकीय निधीतून करण्यात आले. परंतु या कार्यक्रमाला समाजबांधवांची उपस्थिती पाहता संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.
भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यलढा व राष्ट्रउभारणीत मोलाचे योगदान आहे. मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित असलेल्या भटक्या विमुक्त समाजाप्रती संवेदनशीलता दाखवत महायुती शासनाने ३१ ऑगस्ट हा भटक्े विमुक्त दिवस साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्य शासनाचा हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे.
जिल्ह्यात अदासी, सौंदड आदी गावांमध्ये भटके विमुक्त समाज बांधव वास्तव्यास राहतात. या समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या दिवशी होणार्या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्ष, योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहचणे, समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी, आधारकार्ड नोंदणी, जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक दस्तऐवजांची माहिती देणार्या शिबिरांचे आयोजन करण्याचे सूचित करण्यात आले होते.
यातंर्गत इतर मागास बहुजन कल्याण, कार्यालय गोंदिया अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आज, ३१ ऑगस्ट रोजी शासकीय निधितून भटके विमुक्त दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परंतु कार्यक्रमाला वसतीगृहातील विद्यार्थी व विभागाचे कर्मचारी तसेच समाजातील दोन चार राजकीय नेते वगळले तर समाज कार्यक्रमातून कोसो दूर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भटके विमुक्त दिवसाच्या माहितीसह शासनातर्फे समाजासाठी राबविण्यात येणार्या योजनांची माहिती पोहचविलीच जात नसल्याची शोकांतिका या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. असेच राहिले तर समाज जागृत होईल काय ? हा खरा संशोधनाचा विषय आहे.
प्रचार-प्रसिद्धी नाही...
शासनाकडून भटके समाज बांधवांच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्याचे निर्देश आहेत. मात्र, संबंधित विभागाकडून व्यापक प्रमाणात कार्यक्रमाची प्रचार-प्रसिद्धीच करण्यात आली नाही. तर केवळ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना घेऊन थातूरमातूर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आरोप काही भटके समाज बांधवांचा आहे.
लावण्यात आलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत.भटके समाज प्रवर्गातील सर्व समाज बांधव कार्यक्रमात उपस्थित होते, कार्यक्रमदरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या, तर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह काही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाची माहिती सर्व समाज बांधवांना व्हावी यासाठी गेल्या आठवड्यात सर्व समाजातील प्रमुख संघटनांची बैठक घेऊन तशी माहितीही देण्यात आली होती.
- किशोर भोयर, समाज कल्याण अधिकारी, गोंदिया