conspiracy-to-defame-hindu नुकताच मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे व त्यामध्ये न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. जवळपास 17 वर्षांनंतर त्यांना न्याय मिळालेला आहे. एखाद्याला न्याय मिळण्यात उशीर होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे असते असे म्हटले आहे. जीवनातली सतरा वर्षे या सर्व लोकांनी दहशतवादी या ठपक्याखाली घालवलेली आहेत. या सतरा वर्षांमध्ये त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक सर्व प्रकारचे नुकसान झालेले आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी संन्यास घेतलेला होता. त्यांना त्या विशिष्ट मार्गाने जीवन जगायचे होते तर रमेश उपाध्याय व कर्नल पुरोहित हे लष्करातील मोठे अधिकारी होते. ते आज आणखी मोठ्या पदावर कदाचित राहिले असते. या खटल्यात अडकवल्यामुळे त्यांचे करीअर, भविष्य समाप्त झालेले आहे. या सतरा वर्षांमध्ये समाज व हिंदू संघटना यापैकी अनेक लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले व अनेक उभे राहिले नाही अशा दोन्ही बाजू आहे. कारण आपल्या समाजामध्ये कोणावर जर एखादा आरोप झाला तर त्याची कुठलीही शहानिशा न करता समाज त्याला त्याच प्रतिमेत बंदिस्त करायला लागतो. सर्व लोक त्यांचे आमच्याशी काहीही संबंध नव्हते हे सांगण्यामध्ये चढाओढीने पुढे येतात.
त्यांचे व्यक्तिगत नुकसान जे झाले असेल त्याबद्दल आता आपण केवळ दुःख व्यक्त करू शकतो. परंतु यामध्ये सगळ्यत दुःखद आणि निंदनीय गोष्ट ही आहे की त्यांना अडकवल्यानंतर सुशीलकुमार शिंदे, दिग्विजयसिंह, काँग्रेसचे बडे नेते यांनी सर्वत्र आपल्या भाषणांमध्ये भगवा आतंकवाद नावाचा शब्दप्रयोग प्रचारित केला व मुसलमानांना तुम्ही का दहशतवादी म्हणता, बघा तुमच्यामध्ये असलेले हिंदुत्ववादी हे दहशतवादी आहेत अशा पद्धतीचा खोटा प्रचार त्यांनी केला. वास्तविक पाहता सर्वसामान्य मुसलमानाला कोणीही दहशतवादी संबोधत नाही, परंतु दहशतवादामध्ये लिप्त असलेले नाव बघितले तर सर्वसामान्य समाजाला हे नेहमीच कळून येते की हे कोण आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, यांचा धर्म जागतिक स्तरावर अशा दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असतो. हे समाज ओळखून असतो. परंतु संपूर्ण जगभरामध्ये हिंदूंची अशा पद्धतीची ओळख नाही. भगवा रंग हा त्यागाचा रंग आहे. ऋषिमुनींनी, साधू, संन्यासींनी संन्यास स्वीकारल्यानंतर आपल्या शरीरावर जे वस्त्र धारण केले त्याचा रंग भगवा आहे. भगवा रंग हा सनातन धर्माला मानणाऱ्या, परंपरेला मानणाऱ्या सर्वांसाठीच अतिशय आदरणीय आणि पूजनीय रंग आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि त्याच्या नेत्यांनी भगवा आतंकवाद हा शब्द प्रचलित केला. या प्रकरणामध्ये अडकवल्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आणि रमेश उपाध्याय यांच्यासारख्यांचे व्यक्तिगत फार मोठे नुकसान झाले पण त्याहीपेक्षा मोठे नुकसान भगवा आतंकवाद या शब्दाने झाले. एक खोटे कथानक या निमित्ताने सादर करण्यात आले, घडवण्यात आले आणि त्याचा देशामध्येच नाही तर विदेशामध्ये सुद्धा प्रचार करण्यात आला. भारताची प्रतिमा डागाळण्यात आली. एक शांत, सर्व सभ्यता आणि संस्कृतींना सामावून घेणारा धर्म अशा पद्धतीची ज्या हिंदू धर्माची ख्याती आहे, तो धर्म यामुळे बदनाम झाला.
दहशतवादविरोधी पथकाचे सदस्य व अधिकारी मेहबूब मुजावर यांनी आपल्या मुलाखतीमध्ये त्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना यामध्ये अडकविण्याचा निर्देश देण्यात आला होता असे सांगितले. खोटा तपास करायला त्यांना प्रेरित केले गेले, असेही त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता एक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला मुद्दामच अशा पद्धतीचे कार्य देण्यात आले की ज्यामुळे ती तिच्या जन्मजात, स्वाभाविक, हिंदूंबद्दल किंवा हिंदू संघटनांबद्दल असलेल्या पूर्वग्रहामुळे हे काम सहजपणे आणि निश्चित करेल. परंतु मुजावर यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचे व प्रामाणिकतेचे प्रदर्शन केले व त्यांनी असे काहीही करण्यास नकार दिला. आज त्यांनी दिलेली साक्ष यामुळे काँग्रेस, काँग्रेसचे सरकार, त्यांचे नेते यांचा हिंदूविरोधी चेहरा उघड झालेला आहे.
अफजलखानाने तुळजापूरच्या भवानीची मूर्ती खंडित केली व तेथे त्याने एक गाय मंदिरामध्येच कापली. या घटनेचे साक्षीदार त्याच्यासोबत असलेले अनेक हिंदू सरदार सुद्धा होते परंतु ते हिंदू असूनही अफजलखानाच्या विरोधात काही बोलू शकले नाहीत. अत्याचारावर मौन बाळगणे म्हणजे अत्याचारांना पाठिंबा देण्यासारखेच असते. तसेच काँग्रेसमध्ये असलेल्या हिंदू नेत्यांचे सुद्धा आहे. हे सर्व नेते आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी कधीही या खोट्या भगव्या आतंकवादाच्या विरोधात बोलले नाही. त्यांना असे कधीही वाटले नाही की भगव्याची त्यागाची हजारो वर्षांची परंपरा त्यांचेच लोक कलंकित करीत आहेत त्या विरोधात त्यांनी बोलले पाहिजे.conspiracy-to-defame-hindu नागपूरचे त्यावेळेसचे खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला ते स्वत: काँग्रेसचे खासदार असताना सुद्धा आपल्या रामभक्तीचा परिचय देत खासदारकीचा राजीनामा दिला व ते रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले. भगव्या आतंकवादावर काँग्रेसच्या नेत्यांनी उधळलेली मुक्ताफळे हे त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत, पक्षाशी याचा काहीही संबंध नाही अशा पद्धतीचे वक्तव्य काँग्रेस पक्ष करू शकला असता, परंतु पक्षाने स्वत:ची हिंदुत्वविरोधी ही प्रतिमा कायम ठेवली.
स्वामी असिमानंद यांना सुद्धा अजमेर बॉम्बस्फोट, मक्का मशीद बॉम्बस्फोट व समझोता एक्सप्रेसमधील स्फोट याकरिता आरोपी म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्यावर सुद्धा अनेक वर्ष खटला चालला. शेवटी न्यायालयाने सुद्धा त्यांना निर्दोष मुक्त केले. आज अनेक वृत्तपत्रे, समाज माध्यमांवरील लोक सत्तेच्या गैरवापराबद्दल बोलत असतात. इंदिरा गांधींनी लादलेली आणिबाणी व हिंदुत्ववादी लोकांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवून भगव्याला दहशतवादाशी जोडणारे काँग्रेसचे नेते व काँग्रेस यांना जनतेने माफ केले नाही. म्हणूनच ते सत्तेवरून दूर झाले. परंतु भविष्यात असे होऊ नये यासाठी जनतेने हिंदू म्हणून संघटित राहणे, हिंदुत्व भावना जागृत ठेवणे आवश्यक आहे. कारण काँग्रेसला निवडून देणारे लोक हिंदूच आहेत. काँग्रेसमधले नेते सुद्धा हिंदू आहेत. त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी अशा शीर्षस्थ नेतृत्वाला आम्ही भगव्याचा, हिंदुत्वाचा, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले पाहिजे. जनता त्यांच्याही मागे उभी राहील. परंतु केवळ सत्तेसाठी लाचारी पत्करत आपल्या स्वार्थांना सिद्ध करण्यासाठी त्यांचे नेते जसे बोलतील त्याच्या विरोधात मूग गिळून बसणे म्हणजे हिंदुत्वाच्या अपमानाला समर्थन देण्यासारखेच आहे.
एकीकडे हिंदुत्वाचा अपमान सहन करायचा आणि दुसरीकडे विविध तीर्थस्थळांची यात्रा करायची, जीवनामध्ये निष्ठेने विविध कर्मकांड करायचे हा विरोधाभास नको.conspiracy-to-defame-hindu पक्ष कोणताही असो परंतु जनतेने राजकारणामध्ये यशाची इच्छा करणाऱ्या प्रत्येकालाच ‘‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’’ हे ठणकावून सांगितले पाहिजे. तरच भगव्याला बदनाम करण्याचे प्रयत्न व भविष्यकालीन संकटे टाळता येऊ शकतील.
अमोल पुसदकर
9552535813