गरीबांचा ‘देवदूत’ हरपला...केवळ २ रुपयांत करायचे रुग्णांवर उपचार

04 Aug 2025 11:17:58
तिरुवनंतपुरम,
Dr. A. K. Rairu Gopal passes away गरीब रुग्णांचा आधारवड ठरलेले, ‘दोन रुपयांचे डॉक्टर’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. के. रायरू गोपाल यांचे निधन झाले आहे. तब्बल अर्धशतक रुग्णांची सेवा करणाऱ्या या समाजसेवी डॉक्टरांचा वृद्धापकाळातील आजाराने ८० व्या वर्षी मृत्यू झाला. गेली ५० वर्षे केवळ दोन रुपयांत उपचार करणाऱ्या या डॉक्टरांच्या निधनाने गरीब रुग्णांचा खरा ‘देव’च हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. कन्नूरमधील ‘लक्ष्मी’ या स्वतःच्या घरात डॉ. गोपाल यांनी छोटंसे दवाखाने सुरू केले होते. पहाटे चार वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत ते रुग्णांवर उपचार करत असत. सुरुवातीला दिवसभर रुग्णांवर उपचार करणारे हे डॉक्टर, प्रकृती खालावल्यामुळे नंतर सकाळी सहा ते दुपारी चारपर्यंतच सेवा देऊ लागले. त्यांच्या क्लिनिकमध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असत. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांची तब्येत खालावत गेली आणि मे २०२४ मध्ये त्यांना क्लिनिक बंद करावे लागले. आता तेही या जगातून निघून गेले आहेत.
 

Dr. A. K. Rairu Gopal passes away 
डॉ. गोपाल यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर हजारो गरीब रुग्णांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण आणणारा हा ‘जनतेचा डॉक्टर’ आज नाही, ही बाब अनेकांसाठी असह्य आहे. Dr. A. K. Rairu Gopal passes away त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. “डॉ. गोपाल यांनी अर्धशतक गरीब रुग्णांची केवळ दोन रुपयांत सेवा केली. त्यांच्या इच्छाशक्तीमुळे आणि समर्पणामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळत होता. त्यांचे जाणे म्हणजे समाजाची मोठी हानी आहे,” असे मुख्यमंत्री विजयन म्हणाले.
Powered By Sangraha 9.0