वेध.....
सोनाली पवन ठेंगडी
frendeship-day ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा जगभरात मैत्री दिन (नव्हे फ्रेंडशिप डे) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तरुणाई एकमेकांना फ्रेंडशिप बॅण्ड बांधतात, चॉकलेट देतात, पार्टी करतात. आपापल्या पद्धतीने ते हा दिवस साजरा करतात. आपण यात पाश्चिमात्य पद्धती वगैरे वादात न पडता फक्त मैत्रीचा विचार केला तर एखादा दिवस आपल्या अशा जीवलगांना दिला पाहिजे, हे मनाला नक्कीच पटेल. मुळात, मैत्रीचे नाते असेच असते की जिथे कोणतीही मर्यादा राहत नाही. एकमेकांसाठी धावून येणे, मित्राच्या सुखात आणि दु:खात पहिले हजेरी लावणे, एकमेकांसाठी करताना कोणताही व्यावहारिक विचार न करणे हा सर्व मैत्रीच्या नात्याचा आयाम आहे. त्याला स्थळ, काळाचे बंधन नाही आणि एकमेकांविषयी असूया, ईर्ष्या तर दूरदूरपर्यंत नसते. असे निकोप मैत्रीचे नाते जगण्याचा आधार होते. एवढेच नाही तर आपले जगणेही अधिक सुंदर करते.
मैत्रीच्या नात्याचा विचार करताना एक मुद्दा सहजच मनाला स्पर्श करून गेला की मैत्रीचे नाते असते पण, मग नात्यांमध्ये मैत्री का नसावी? आज नात्यांविषयी नको तितकी उदासीनता आलेली दिसते. अगदी स्पष्ट सांगायचे तर आता नात्यांमध्ये व्यवहार हावी झाला आहे. पैशाच्या तराजूत नाते मोजले जाते. मग जे नातेवाईक सधन, संपन्न आहेत त्यांच्याशी सगळेच गोड वागतात. पण, ज्यांच्याकडे पैसा नसेल किंवा जे प्रतिकूलतेत जगत असतील, ते कितीही जवळचे नातेवाईक असले तरी त्यांच्याविषयी बेपर्वाईचे धोरण असते. त्यांच्याविषयी विचार करण्याची कोणाला गरजही वाटत नाही. ही भावना केवळ जवळच्या नात्यातच नव्हे तर अगदी सख्ख्यांमध्ये सुद्धा शिरली आहे. दोन दिवसांपूर्वी न्यायालयातील एका प्रकरणाची बातमी समोर आली की, एका मुलाने वृद्ध आईला महिन्याकाठी दोन हजार रुपये देण्यास नकार दिला. दुसरा भाऊ तिला सांभाळतो आहे तर मग मी कशाला तिला पैसे देऊ, असा त्याचा युक्तिवाद होता. त्यासाठी तो न्यायालयात पोहोचला होता. त्याला न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. न्यायाधीश म्हणाले, आईविषयी जो मुलगा असा विचार करत असेल तो माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. न्यायालयाचा मुद्दा अगदी योग्य आहे. दुसèया एका प्रकरणात तीन मुले असतानाही त्यांनी आईला सांभाळण्यास नकार दिला. शेवटी पोलिसांनी तीन भावांना आईची काळजी घेण्यासाठी चार-चार महिने वाटून दिले. जी आई तीन मुले एकाच वेळी लहानाचे मोठे करते, तिला तीन मुले मिळूनही सांभाळू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे.
बहीण-भावांचे नातेही असेच कुठेतरी गढूळ झाले आहे. लग्न झालेल्या बहिणीसाठी भावाने काही केले तर ते त्याचे तिच्यावर उपकार ठरतात. भाऊ सधन असेल आणि बहिणीवर प्रतिकूल स्थिती आली तर तो तिच्याकडे पाहतही नाही, तिची वास्तपुस्तही करत नाही. उलट, पूर्वी काहीतरी केलेले उपकार जाणवून देईल, असे वागतो. घरातील भावजयीला नणंदेचे घरात येणेही मान्य नसते. कुठे नणंदेला भावजयी पसंत नसते. जावांच्या बाबतीत तर ‘जावा तिथे हेवा’ असे म्हटलेच जाते. आज न्यायालयात बहुतांश खटले नात्यांमधलेच आहेत, ही अतिशय भयानक स्थिती आहे.frendeship-day नात्यांमध्ये आलेला हा कोरडेपणा कुठेतरी प्रत्येकाच्या अहंपणामुळेच दिसतो आहे. नात्यांमध्ये प्रेमापेक्षा ‘पैसा झाला मोठा’ सोबतच ‘इगो झाला मोठा’ असे म्हणावे लागेल. पण, इतके निराशाजनक चित्रही रेखाटण्यात अर्थ नाही. कारण शेवटी रक्त हे पाण्यापेक्षा घट्टच असतं, म्हणतात ना तेच खरं. आजही अनेक कुटुंबे अशी आहेत जिथे नात्यांनी एकमेकांना सावरले आहे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या कठीण काळात खंबीरपणे साथ दिली आहे. मग ते भाऊ-भाऊ असो, बहीण-भाऊ असो किंवा मुलगी-जावई, सुना असो... जिथे सासू-सुना, जावा-जावा, नणंद-भावजय, बहीण-भाऊ, भाऊ-भाऊ, मुलगा-वडील यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले तिथे वादाला फारसा थारा राहणार नाही. वाद हे केवळ मतभेदाच्या मर्यादेत राहतील आणि त्यामुळे संवादात विघ्न येणार नाही. नाते सुंदर करायचे तर त्याला मैत्रीचा आयाम द्यायला काय हरकत आहे? जसे आपण मैत्रीत आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला समजून घेतो तीच भावना नात्यात निर्माण झाली तर आगामी काळात निकोप, सुंदर, देखणी कुटुंबव्यवस्था अस्तित्वात येईल. आता सणांचे दिवस आहेत. या शुभ दिवसांमध्येच याची सुरुवात करायला काय हरकत आहे...शुभस्य शीघ्रम्...!
7755938822