भारत-रशिया-चीन युती?

    दिनांक :04-Aug-2025
Total Views |
 
रवींद्र दाणी
india-russia-china अमेरिेकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर भारताच्या विरोधात ‘टेरिफ‘ म्हणजे आयात कर नावाचे हत्यार उपसलेच. त्यात रशिया नावाचा ‘दंड‘ही जोडला. विशेष म्हणजे भारत, रशिया आणि चीन यांच्या युतीची चर्चा केली जात असताना हा घटनाक्रम घडला. भारत, रशिया, चीन यांची युती सध्या तरी अशक्य वाटत असली तरी या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली, ती परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्या चीन भेटीनंतर. चिनी नेत्यांसोबत झालेल्या त्यांच्या चर्चेनंतर भारताने चिनी नागरिकांना पुन्हा व्हिसा देणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-चीन संबंध सामान्य होण्याची प्रक्रिया याने सुरू होईल असे मानले जाते. यातूनच या नव्या युतीची चर्चा सुरू झाली. भारत, रशिया आणि चीन यांनी एकत्र येण्याची चर्चा नवी नाही. मात्र, या चर्चेला बळ मिळत आहे ते अमेरिकेच्या भारतविरोधी भूमिकेनंतर.
 
 

रशिया भारत  
 
बलाढ्य व अजिंक्य! : भारत, रशिया, चीन यांची युती होणे सध्या तरी शक्य वाटत नसले तरी अशी युती झाल्यास ती जगातील सर्वांत बलाढ्य व अजिंक्य युती असेल असे मानले जाते. युरोपियन युनियन वा नाटो या सर्वांना धक्का देण्याची ताकद या युतीत असेल असे मानले जाते.
एक पंचमाश भूभाग : जगात एकूण 195 देश असले तरी भारत, रशिया, चीन या तीनच देशांचा पृथ्वीतलावरील एकूण भूभाग पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या एक पंचमांश आहे. आणि या तीन देशांची लोकसंख्या 36 टक्के म्हणजे एकूण जागतिक लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे. एवढा प्रचंड भूभाग व मनुष्यबळ असलेले तीन देश एकत्र आले तर अमेरिका व युरोपसाठी ते मोठे आव्हान ठरू शकतात. रशियाजवळ नैसर्गिक संपत्तीचा अमाप साठा आहे, तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनने अमेरिकेला केव्हाच मागे टाकले आहे आणि भारत एक झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. भारत, चीन, रशिया यांची एकूण लष्करी ताकद उर्वरित साऱ्या जगापेक्षा जादा असल्याचे मानले जाते.
भारत-रशिया : भारत आणि रशिया यांचे संबंध अतिशय विश्वासाचे राहिले आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् रशियात भारताचे राजदूत असताना या संबंधाचा पाया घातला गेला, तो आजही कायम आहे. तत्कालीन सोवियत युनियनचे राष्ट्रपती लिनोनिद ब्रेझनेव्ह व भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे संबंध बहीण-भावाचे होते. ब्रेझनेव्ह-इंदिरा गांधी यांच्यात झालेला 25 वर्षांचा मैत्री करार भारत-रशिया मैत्रीचा कळस मानला जातो. याच आधारावर इंदिरा गांधींनी 1971 च्या युद्धाचा जुगार खेळला होता. अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने युद्धात उतरला तर सोवियत युनियन गप बसणार नाही असे ठोस आश्वासन ब्रेझनेव्ह यांनी इंदिरा गांधींना दिले होते. त्यामुळे अमेरिकेच्या धमक्यांनी जराही विचलित न होता इंदिरा गांधी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या होत्या. काळाच्या कसोटीवर भारत-रशिया मैत्री अबाधित राहिली.
चीन-रशिया : चीन-रशिया दोन्ही देश साम्यवादी विचारांचे. पण, त्यांचे आपसात पटत नव्हते. दोन्ही देशांमध्ये एक युद्धही झाले. त्यात रशियाने चीनला मार दिला होता. आता परिस्थिती बदलली आहे. रशिया कमजोर तर चीन बलवान झाला आहे. अमेरिकेच्या विरोधात दोन्ही देशांनी ही युती केली आहे. रशियाची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका व युरोपातील देशांनी या देशावर आर्थिक निर्बंध लावले असले तरी रशियाला दिलासा देणारे दोन देश होते भारत व चीन. या दोन देशांच्या सहकार्यामुळेच रशियाला युक्रेनचे युद्ध लढणे शक्य होत आहे अन्यथा रशियाला केव्हाच युद्ध थांबवावे लागले असते. रशिया-चीन यांचे संबंध दिवसेंदिवस घनिष्ठ होत आहेत.
प्रश्न चीनचा : भारत-रशिया यांनी एकत्र येण्यास काहीच समस्या नाही तसेच रशिया-चीन यांनी एकत्र येण्यात समस्या नाही. प्रश्न आहे तो चीनचा. तिबेट-लडाख-अरुणाचल प्रदेश हे प्रश्न दोन्ही देशांनी जवळ येण्यात काही महत्त्वाचे अडथळे आहेत. आणि हे अडथळे सहजासहजी पार करता येतील असे नाहीत. भारत-चीन सीमा विवाद फार जुना आहे. त्यावर तोडगा शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यात कुणालाही यश मिळाले नाही. भारत-चीन यांच्यात आजवर दोन लष्करी चकमकी झडल्या. 1962 चे युद्ध व 2020 चा गलवानमधील संघर्ष.
पाकिस्तानला पाठिंबा : भारत-चीन जवळ येण्यास सर्वांत मोठी अडचण पाकिस्तानची आहे. नुकत्याच झडलेल्या भारत- पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानने वापरलेल्या शस्त्रांंपैकी 81 टक्के शस्त्रास्त्रे चिनी बनावटीची होती ही बाब भारताच्या उपलष्करप्रमुखांनी सांगितली आहे. चीन पाकिस्तानला भारताच्या विरोधात वापरत आला आहे. किंबहुना भारताविरोधात शेजारी देशांना उभे करण्याचे एक अघोषित धोरण चीन मागील काही वर्षांपासून राबवित आहे.
ब्रह्मपुत्रेवर धरण : चीनच्या भारतविरोधी भूमिकेत पडलेली ताजी भर म्हणजे ब्रह्मपुत्रेवर एक महाप्रचंड धरण बांधण्याचा चीनचा निर्णय. भारत-चीन सीमेपासून केवळ 30 किलोमीटरवर बांधण्यात येत असलेले हे धरण जगातील सर्वांत मोठे धरण राहणार आहे. जवळपास 15 लाख कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या या धरणाचा भूमिपूजन समारंभ मागील आठवड्यात पार पडला. दहा वर्षांत हे धरण बांधले जाणार आहे. आणि पायाभूत प्रकल्प बांधण्यात चीनचा वेग पाहता तो हे धरण वेळेपूर्वी पूर्ण करील असे मानले जाते. चीनच्या यावलंग टांसगपो नदीवर हे धरण बांधले जात आहे. भारतात प्रवेश केल्यानंतर या नदीचे नामकरण ब्रह्मपुत्रा होते तर भारतातून बांगलादेशात गेल्यानंतर ती जमुना होते.
तिप्पट मोठे : चीनच्या हुबई प्रांतातील यांगत्सी नदीवर बांधण्यात आलेले थ्री जार्जेस धरण हे जगातील सर्वांत मोठे धरण आहे. त्या धरणापेक्षा हे धरण तिप्पट मोठे राहणार असल्याचे समजते. या प्रकल्पात पाच जलविद्युत प्रकल्प चीन उभारणार आहे. यासाठी अनेक बोगदे तयार केले जाणार असून त्यातून पाण्याचा प्रवाह वळविला जाणार आहे.
पूर आणि दुष्काळ : भारताने यापूर्वीच या प्रकल्पाबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे. पण, चीन भारताच्या भूमिकेचा विचार करण्यास तयार नाही असे दिसते. ब्रह्मपुत्रेवर हे धरण बांधून चीन केव्हाही भारताच्या अरुणाचल भागात महापूर वा दुष्काळ दोन्ही प्रकारची स्थिती निर्माण करू शकतो. बहुधा यामुळेच या धरणाला ‘वॉटर बॉम्ब’ म्हटले जाते.
तिबेट परिसराला वीजपुवठा करण्यासाठी याचा वापर केला जाणार असल्याचे चीनने सांगितले आहे.india-russia-china या धरणामुळे या भागातील पर्यावरण धोक्यात येईल असे जागतिक पर्यावरण तज्ज्ञांना वाटत आहे. चीनची भारत विरोधी भूमिका पाहता सध्या तरी रशिया, भारत, चीन अशी युती होण्याची चिन्हे नाहीत.
अमेरिकेला जोर! : अमेरिकला याची चांगली कल्पना असल्याने त्याने भारताला आपल्यासोबत ठेवण्याऐवजी भारताच्या विरोधात भूमिका घेण्याचे ठरविले आहे. भारत-चीन यांना एकाच पारड्यात ठेवण्याचे नवे धोरण ट्रम्प यांनी घेतले आहे. वास्तविक राष्ट्रपती ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात भारताशी चांगले संबंध ठेवले होते. पण, दुसऱ्या कार्यकाळात त्यांची भूमिका एकदम बदलली असल्याचे दिसते. रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याचा परिणाम म्हणून अमेरिका व युरोप यांनी भारताच्या विरोधात आर्थिक निर्बंध लावण्याची भाषा उच्चारली आहे. अमेरिका या टोकाला जाणार नाही अशी आशा केली जात असतानाच, ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून आयात केलेल्या तेलाबाबत भारतावर ‘दंड’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प भारताच्या विरोधात आणखी काय काय करतात हे येणाऱ्या दिवसांत दिसणार आहे.