Satyanarayan Nuwal of Solar Industries यशाचा प्रवास हा कधीच सरळसोट नसतो. तो अनेकदा काट्यांनी, अडथळ्यांनी, अपयशांनी आणि संघर्षांनी भरलेला असतो. पण जो व्यक्ती या परिस्थितीपुढे हार न मानता चालत राहतो, पराभवाच्या क्षणातसुद्धा जिद्दीने स्वतःला उभे करतो, त्याचे नाव अखेर यशाच्या सुवर्णपानांवर कोरले जातेच. अशीच एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी जीवनकहाणी आहे सत्यनारायण नंदलाल नुवाल यांची. राजस्थानातील भीलवाड्यासारख्या छोट्याशा गावातून प्रवास सुरू करून रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्री घालवत संघर्ष करत त्यांनी आज सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या अब्जावधी रुपयांच्या जागतिक साम्राज्य उद्योगविश्वात उभे केले आहे. भीलवाड्यातील एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील सरकारी पटवारी तर आजोबा एका लहानशा दुकानाचे मालक- अशी अत्यंत साधी त्यांनी पार्श्वभूमी होती. घरात पैसा कमी होता, पण मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची परंपरा होती. वडिलांच्या निवृत्तीनंतर आर्थिक ताण अधिक वाढला. त्या काळात उच्च शिक्षण घेण्याची सोयही नव्हती. त्यामुळे सत्यनारायण यांनी दहावीनंतर शिक्षण थांबविले. इतर मुले जिथे पदवी आणि करिअरच्या स्वप्नांमध्ये रमली होती, तिथे हा तरुण वेगळा विचार करत होता. शिक्षणापेक्षा व्यवसायाकडे त्याचे मन खेचले गेले होते. मथुरेत गुरुदेवांच्या सान्निध्यात राहून त्यांनी संयम, कष्ट आणि चिकाटी यांचे धडे आत्मसात केले. त्या काळातच त्यांच्या मनात ठसाव असा विचार रुजला आणि तो म्हणजे 'माझा मार्ग शिक्षणाचा नाही, माझा मार्ग व्यवसायाचा आहे.

अर्थातच हा मार्ग सोपा नव्हता. फक्त १८ वर्षांचे असतानाच त्यांनी शाई उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला. पण हा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर भाडेपट्टा, वाहतूक सेवा अशा अनेक उपक्रमांत त्यांनी हात आजमावला, परंतु प्रत्येक वेळी त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. तरी सत्यनारायण खचले नाहीत. विवाहानंतर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल आणि रोजगाराच्या शोधात ते महाराष्ट्रात आले. चंद्रपूर आणि बल्हारशहा येथे राहताना त्यांना प्रचंड हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. काही वेळा तर दोन वेळच्या अन्नाचीही गैरसोय नव्हती. अनेक रात्री रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून त्यांनी दिवस काढले. पण या सर्व संकटांतून त्यांची एकच जिद्द त्यांना आधार देत होती हरायचे नाही.
१९७७ मध्ये बल्हारशहामध्ये त्यांच्या आयुष्यात एक निर्णायक वळण आले. अब्दुल सत्तार अल्लाहभाई या व्यक्तीकडे औद्योगिक विस्फोटकांचा मासिक परवाना होता, पण वयामुळे ते व्यवसाय पुढे नेऊ इच्छित नव्हते. सत्यनारायण यांनी ही संधी ओळखली आणि केवळ एक हजार रुपयांत तो परवाना भाड्याने घेतला. (Satyanarayan Nuwal of Solar Industries) अशा प्रकारे त्यांच्या विस्फोटक व्यवसायातील प्रवासाची सुरुवात झाली. सुरुवातीला हा फक्त व्यापारी उपक्रम होता, पण कोळसा खाणींमध्ये विस्फोटकांची वाढती मागणी त्यांच्यासाठी वरदान ठरली. थोड्याच दिवसांत ब्रिटिश कंपनी इम्पिरियल केमिकल इंडस्ट्रीजने त्यांना अधिकृत वितरक म्हणून मान्यता दिली. त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळाली, आत्मविश्वास वाढला आणि हळूहळू त्यांचे आर्थिक पाय मजबूत होऊ लागले.
१९९५ हे वर्ष त्यांच्या आयुष्यात सोन्याचे अक्षर ठरले. स्टेट बँकेकडून ६० लाखांचे कर्ज घेऊन त्यांनी नागपूरमध्ये सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडची स्थापना केली. सुरुवातीला कोल इंडिया लिमिटेडसारख्या सरकारी खाणींना विस्फोटके पुरवण्यापासून प्रवास सुरू झाला. लवकरच कंपनीने उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले. १९९६ मध्ये त्यांना वार्षिक सहा हजार टन विस्फोटके निर्माण करण्याचा परवाना मिळाला आणि त्यानंतर मागे वळून पाहावे लागले नाही. व्यापारी व्यवसायापासून उत्पादन व्यवसायाकडे झालेला हा बदलच त्यांच्या साम्राज्याची खरी सुरुवात ठरली.
सोलर इंडस्ट्रीजच्या उत्पादनात विलक्षण वैविध्य आहे. औद्योगिक खाणकामासाठी वापरली जाणारी विस्फोटके, कार्ट्रिज स्वरूपातील पॅकेज्ड विस्फोटके, डेटोनेटर्स, डेटोनेशन कॉर्ड, कास्ट बूस्टर्स अशा विविध प्रकारच्या उच्च तांत्रिक उत्पादने कंपनी तयार करू लागली. केवळ औद्योगिक क्षेत्रापुरतीच मर्यादा न ठेवता कंपनीने लष्करी क्षेत्रातही पाऊल टाकले. भारतीय लष्कराच्या अग्नि आणि पिनाका सारख्या अत्याधुनिक मिसाईल प्रकल्पांसाठी लागणारे प्रोपेलेंट, बूस्टर्स आणि युद्धसामग्री सोलर इंडस्ट्रीजने तयार केली. त्यामुळे आज या कंपनीचे नाव केवळ औद्योगिक विस्फोटक क्षेत्रातच नव्हे, तर संरक्षण उद्योगातसुद्धा अग्रगण्य ठरले आहे.
सोलर इंडस्ट्रीजचा विस्तार वेगाने वाढत गेला. आज कंपनीची उपस्थिती भारतापुरती मर्यादित नाही. झांबिया, नायजेरिया, टर्की, दक्षिण आफ्रिका, घाना, ऑस्ट्रेलिया, तंजानिया यांसारख्या देशांत कंपनीने आपली केंद्रे उभारली आहेत. एकूण ६५ पेक्षा जास्त देशांमध्ये सोलर इंडस्ट्रीजची उत्पादने पोहोचतात. भारतात आठ राज्यांमध्ये २५ पेक्षा जास्त युनिट्स कार्यरत आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये ही कंपनी आपली भक्कम छाप सोडत आहे. आज अब्जावधी रुपयांच्या उंचीवर पोहोचलेले सत्यनारायण नुवाल हे केवळ उद्योजक नाहीत, तर एक जिवंत प्रेरणा आहेत. उच्च शिक्षण न घेता, इंग्रजी भाषेची ताकद नसतानाही, त्यांनी जिद्दीच्या बळावर आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आपले साम्राज्य उभारले. त्यांच्या प्रवासातून एकच संदेश समोर येतो अपयश आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवते. प्रत्येक छोट्या सुरुवातीचं बीजच मोठ्या यशाच्या वृक्षाला जन्म देते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्री काढणारा तो तरुण आज जागतिक उद्योगविश्वात भारताचा झेंडा उंचावत आहे. सत्यनारायण नंदलाल नुवाल यांचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी आशेचा किरण आहे, प्रत्येक स्वप्नवेड्या मनासाठी जिद्दीचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी आदर्श आहे.
दीप्ती राखुंडे
9503910822