सिहोरच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी...दोन ठार!

05 Aug 2025 14:11:23
सिहोर,
Kubereshwar Dham of Sehore मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील प्रसिद्ध कुबेरेश्वर धाम येथे पुन्हा एकदा चेंगराचेंगरीची घटना घडली असून यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत. श्रावण महिन्यातील कावड यात्रेसाठी देशभरातून भाविक सिहोर येथे येत आहेत. रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर भाविक कुबेरेश्वर धाम परिसरात जमले होते. गर्दी वाढत असतानाच अचानक झालेल्या ढकलाढकलीतून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे वय सुमारे ५० वर्षांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 

Kubereshwar Dham of Sehore 
 
गंभीर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक कार्यरत आहे. घटनेनंतर भाविकांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिसर नियंत्रणात आणण्यात आला आहे. Kubereshwar Dham of Sehore श्रावण महिन्याच्या निमित्ताने पंडित प्रदीप मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ६ ऑगस्ट रोजी सिहोर येथे भव्य कावड यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत तब्बल ५ लाखांहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाविकांची सोय लक्षात घेऊन वाहतूक वळवण्याची योजना आखण्यात आली आहे. ही योजना ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेपर्यंत लागू राहील. या काळात प्रमुख ठिकाणी वाहतूक पोलिस, सुरक्षा कर्मचारी आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात येतील.
प्रशासनाने भाविकांना संयम बाळगण्याचे, गर्दीत ढकलाढकली टाळण्याचे आणि वाहनांसाठी ठरवून दिलेले पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे. याआधीही कुबेरेश्वर धाममध्ये अशा घटना घडल्या आहेत. Kubereshwar Dham of Sehore १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रुद्राक्ष वाटप कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील नाशिकच्या ५३ वर्षीय मंगलबाई या भाविक महिलेचा मृत्यू झाला होता. त्याच कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी ३ वर्षीय अमोघा भट्ट नावाच्या बालकाचाही मृत्यू झाला होता. त्या वेळी वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाला रुद्राक्ष महोत्सव थांबवावा लागला होता. पुन्हा एकदा घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखोंच्या संख्येने लोक जमणाऱ्या कुबेरेश्वर धाममध्ये गर्दीचे नियोजन आणि नियंत्रण हा प्रशासनासाठी मोठा आव्हानात्मक मुद्दा ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0