श्री गीता : कर्मयोग

06 Aug 2025 12:07:51
karma-yoga श्रीमद्भगवद्गीतेचा तिसरा अध्याय कर्मयोग म्हणून परिचित आहे. या अध्यायात अर्जुन अधिकच गोंधळून गेला आहे. दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने संसार हे दुःखाचे मूळ असून त्यातून निवृत्तीचा सल्ला दिला आहे. ज्ञान हेच आत्मतत्त्वासाठी महत्त्वाचे असून मुक्तीसाठीचे ते सर्वयोग्य साधन म्हटले आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन बऱ्यापैकी ज्ञानगूढ गम्य झाला असताना भगवंत म्हणतात ‘तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय:’ म्हणजे ज्ञानाच्या गाडीत बसण्याची तयारी सुरू असताना भगवंत म्हणतात, ‘ऊठ! कर्म कर!’ बरं! करावयाचे कर्म काही भोजन कर, अंघोळ कर, देवपूजा कर! असे नव्हते तर भगवान सांगतात ‘युद्ध कर, तेही आप्तस्वकीयांशी!’ महाभयंकर कर्म; ज्यातून रक्तपात, कुलसंहार, महापाप ज्यायोगे नरकप्राप्तीचीच शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत भगवंतांनी त्याला ज्ञान मार्गावर जाऊ द्यायला हवे होते, पण भगवंत त्याला ‘कर्म कर’ म्हणतात!
 
 

कर्मयोग  
 
 
अर्जुन पार गोंधळून गेला आणि भगवंताला म्हणतो-‘व्यामिश्रेणेव वाक्येन, बुद्धिम् मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम् ।’ भगवंता! परस्पर विरोधी विचारांनी तू माझ्या बुद्धीला मोहित करीत आहेस. कोणता तरी एक ठाम मार्ग मला सांग!
‘लोकेस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ।।’ येथे भगवान त्याच्या शंकेचे निरसन करताना अर्जुनाला ‘अनघ’ म्हणतात. अनघ म्हणजे निर्मळ, निष्पाप, शुद्ध मनाचा. कारण अर्जुन पूर्ण समर्पित भावाने आपला झालेला गोंधळ मांडतात. म्हणून भगवंतही त्याला अनघ म्हणतात आणि विशद करतात की, अर्जुना, मी ज्ञानियांसाठी ज्ञानयोग आणि योगियांसाठी कर्मयोग सांगितला असून ते परस्परांना पूरक आहेत. पण मनुष्यमात्रात दोन प्रकारचे कर्ममार्गी आहेत. अधिकांश लोक कामना मनात ठेवून कर्म करतात. त्यांना कर्मफळाची कामना असते. काही मात्र कर्मफळाच्या उपभोगातून बाहेर पडून ब्रह्मजिज्ञासू बनतात. कर्मत्याग आणि कर्मशून्यता यामधील सम्यक मार्ग जिवासाठी मार्गसोपान असेल. कर्म तर करावेच लागते. कर्मत्यागाने मानवी उत्कर्ष होणे कठीण आहे. त्यासाठी कर्मयोगाचे अनुष्ठानच नैष्कर्म स्थितीपर्यंत नेते.
जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य
बोधाची खाणी! जे भूकेलिया धनी, साधनाची!!’
खरं तर आपण एक क्षणही कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही. कारण आपण आपल्या निसर्गदत्त गुणांमुळे अगतिक आहोत. कर्मासाठी हतबलही आहोत. ‘नियतं कुरु कर्म त्वं,कर्म ज्यायो ह्यकर्मण: । शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मण: ।।’
कर्म न केल्याने आपला शरीर व्यवहार शक्य नाही त्यामुळे कर्म न करण्यापेक्षा केव्हाही कर्म करणे निश्चित चांगले. पण हे कर्म करताना आसक्ती सोडून सतत कर्तव्यकर्म केले पाहिजे. तरच आपण परमात्म स्वरूप प्राप्त करू शकतो. यासाठी भगवान स्वत:चेच उदाहरण देतात.‘न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिशू लोकेशू किंचन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ।।’
हे अर्जुन! जरी मला तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही तसेच मला प्राप्त करण्यायोग्य कोणतीही वस्तू नाही तरीही मी निरंतर कर्म करीतच असतो. त्यातून भगवान कर्ममार्गाचे महत्त्व सांगतात. ते अर्जुनाला महत्त्वाचे तत्त्व सांगतात की, आपण करीत असलेली सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी केली जातात; पण आपण मूर्ख अहंकाराने मोहित होऊन ‘मी’च कर्ता आहे असे समजतो. जर कर्ता करविता तो परब्रह्म परमात्मा आहे तर मी कशाला ‘मी’ आणि ‘माझं’ यात गुंतून राहतो. स्थूल देहाचा विचार केला तर आपल्याला इंद्रिय श्रेष्ठ वाटतात. इंद्रियाच्या पुढे मन श्रेष्ठ आहे आणि मनाच्या पुढे बुद्धी श्रेष्ठ आहे.karma-yoga पण बुद्धीच्याही पुढे आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. ही विकासात्मक उकल समजली की, ‘मी कर्ता’ हा अहंगंड समूळ मिटेल. भगवंत कर्मयोग सांगताना स्पष्टच सांगतात की, प्रजापती ब्रह्मदेवाने यज्ञासह प्रजा उत्पन्न केली आणि सर्वांना यज्ञकर्म हे उत्कर्षाचे साधन आहे हे स्पष्ट केले. म्हणून हे अर्जुना! यज्ञकर्म म्हणजे भगवद्कर्म असून ते सोडून अन्य कर्मात गुंतलेला मनुष्य कर्मबंधनात अडकतो. त्यामुळे यज्ञकर्म म्हणजे ईश्वराला अनुकूल कर्म तू कर! ‘कर्मे दासपणे करोनी निपूणे, नारायणा अर्पणे!’ हे हवे कर्माप्रती भावसमर्पण.
भगवान पुढे सांगतात-
‘अन्नाद्भवंति भुतानि पर्जन्याद्अन्नसंभव: ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव: ।।’
सर्व प्राणिमात्र अन्नातून जन्माला येतात. अन्न पर्जन्यामुळे निर्माण होते. पर्जन्य यज्ञकर्मातून उत्पन्न होतो. हाच यज्ञ कर्मापासून निर्माण होतो. एका अर्थाने जीवसृष्टीचे हे विश्वचक्र आहे. विश्वचक्राचे कारक हे कर्मच आहे. म्हणून कर्म कर! त्यातही कोणत्याही फळाची अपेक्षा न करता; ईश्वराला समर्पित केलेले कर्म चित्त शुद्ध करते. शुद्ध चित्त जीवनमुक्तीचे साधन आहे. म्हणून निष्काम कर्म महत्त्वाचे आहे. कारण इंद्रियामध्ये विषय, विषयामध्ये रागद्वेष मुक्कामी असतात. ते मोक्षमार्गाचे अडथळे आहेत म्हणून त्यांच्या आहारी न जाता सद्भावनेने कर्म केले पाहिजे. हे पार्थ! जो पुरुष या सृष्टिचक्राचे अनुसरण करीत नाही तो इंद्रिय सुखात रत होऊन पापी बनतो आणि व्यर्थ जीवन जगतो. याच अध्यायात प्रसिद्ध असे भगवंताचे मत आहे.
‘श्रेयांस्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ।।’
इथे सोप्या भाषेत लक्षात घेऊ की, स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य किंवा स्वकर्म आणि परधर्म म्हणजे जे आपले कर्तव्य नाही ते कर्म. म्हणजे माझे नसलेले कर्तव्य कितीही गोड वाटत असले तरी ते माझ्यासाठी कल्याणकारी नाही. त्याचा त्याग केला पाहिजे. उलट स्वधर्माचे म्हणजे स्व कर्तव्याचे आचरण करणे महत्त्वाचे आहे. स्वकर्म करताना मृत्यू आला तरी तोच कल्याणकारी ठरेल. म्हणून परधर्म अर्थात परकर्तव्य भीतिदायक असे भगवंत अर्जुनाला स्पष्ट करतात. भगवान त्याही पुढे जाऊन म्हणतात की, ‘हे धनंजया ! जर परमात्मस्वरूपामध्ये दृढ होऊन ब्रह्मज्ञानी झालास तर तुला कोणतेच कर्म करण्याचे कोणतेच प्रयोजन राहणार नाही. त्या अवस्थेत तुझ्या कर्म न करण्याने तुझे कोणतेही नुकसान होणार नाही आणि ब्रह्मज्ञानी अवस्थेत तू कोणत्याच बाबीसाठी भूतमात्रावर अवलंबून देखील राहणार नाही; पण त्यासाठी स्वकर्म महत्त्वाचे आहे.karma-yoga जनकादी पुरुषसुद्धा स्वकर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झालेत.
लक्षात ठेव ! ‘येथ वडील जे जे करिती, तया नाम धर्मू ठेवीती ।।’ श्रेष्ठ ज्याप्रमाणे आचरण करतात त्यांचेच अनुकरण अन्य लोक करतात. ते ज्याला प्रमाण मानतात. अन्य लोकही त्याचेच अनुसरण करतात. थोडक्यात श्रेष्ठ पुरुषाने कर्मत्याग न करता लोककल्याणासाठी कर्तव्य कर्म करीत जीवन जगावे. म्हणून तू युद्धासाठी तयार हो.
‘मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीनिर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वर: ।।’
हे अर्जुना! आता तू अध्यात्म बुद्धीने सर्व कर्मे माझ्यामध्ये समर्पण करून आशारहित, ममत्वरहित होऊन निश्चिंत मनाने युद्ध कर!
तिसèया अध्यायात भगवंताने ब्रह्मविद्या प्रतिपादित करतानाच कर्मयोग महिमा आणि कर्मयोगाचे प्रयोजन विशेषत्वाने स्पष्ट केले आहे. म्हणूनच तिसèया अध्यायाला ‘कर्मयोग’ असे नामाभिधान केले आहे.
 
प्रा. दिलीप जोशी
9822262735
Powered By Sangraha 9.0