अग्रलेख
International diplomacy आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये असे काही क्षण येतातच जेव्हा एखाद्या राष्ट्राला स्पष्ट रेषा आखून म्हणावे लागते - पुरे झाले...! आता आमचे आम्ही पाहून घेऊ!! भारतासाठी तो क्षण आला आहे आणि त्या क्षणी जसे वागले पाहिजे, तसेच भारत वागला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर वाढवण्याच्या धमक्या दिल्या आणि कारण सांगितले की, भारताने रशियाकडून तेलाची आयात केली आहे आणि तो इतर देशांना हे तेल विकून नफा देखील कमावत आहे. हा आरोप म्हणजे अमेरिकेचे ढोंग आहे आणि ते भारताने उघडे पाडले आहे- पुराव्यासकट. युक्रेनमध्ये लोकांचे जीव जात असताना भारत रशियाकडून तेलाची आयात करीत असल्याचे सांगून भारताला खलनायकी प्रतिमेत अडकविण्याचा ट्रम्प यांचा डाव होता. तो त्यांच्याच अंगलट आला आहे. आकडेवारी जी कहाणी सांगते ती लक्षात घेतली पाहिजे. युद्धापूर्वी, रशियाचे तेल भारताच्या आयातीत जेमतेम 2.5 टक्के होते. 2023 पर्यंत हा आकडा जवळजवळ 39 टक्क्यांपर्यंत वाढला आणि रशिया भारताचा मोठा पुरवठादार बनला. 2024 मध्ये युरोपियन युनियन आणि रशिया यांच्यातील व्यापार हा भारत आणि रशिया यांच्यातील व्यापाराच्या तुलनेत तब्बल चौपट होता.
युरोपही तेव्हा रशियाकडून तेल विकत घेतल्याबद्दल भारताला दोष देत होता. अमेरिकेचेही तेच. अमेरिका आपल्या अणुउद्योगासाठी रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लोराईड, ईव्ही बॅटरीसाठी पॅलेडियम आणि विविध रसायने आणि खते आयात करीत असतो. मोती, मौल्यवान रस्ते, धातू, आयसोटोप्स, लाकूड व लाकडी फर्निचर, विमाने व सुटे भाग, पोलाद, तेलबिया, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे, भाज्या इत्यादी अनेक वस्तू अमेरिका हा देश रशियाकडून आयात करतो. अमेरिकेसाठी रशियाकडून ही आयात केली जाते तेव्हा युक्रेनची ताकद कमी होत नाही आणि रशियाच्या युद्धखोरीला बळ मिळत नाही. भारताने काहीही केले तरी युक्रेनवर अन्याय होतो. अमेरिका स्वतःच्या पुरवठा साखळ्यांवर कधीही ताण येऊ देत नाही. परंतु जेव्हा 1.4 अब्ज लोकसंख्या असलेला भारत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी परवडणारे कच्चे तेल विकत घेतो तेव्हा त्याच्यावर नफाखोरीचा आरोप अमेरिकेला करावासा वाटतो, यातच त्याचे ढोंग स्पष्ट होते. अमेरिकेची ही डबल ढोलकी भारताने उघडी पाडली आहे की, त्याबद्दल अधिक काही सांगण्याची गरजच नाही. यासंदर्भात एक साधा प्रश्न आहे की, अमेरिकेला त्यांचे नागरिक, तेथील उद्योग, तेथील रोजगार यांचे संरक्षण करण्याचा अधिकार असेल तर भारताने स्वत:च्या हितासाठी अशी आयात केली तर अमेरिकेच्या पोटात दुखण्याचे कारण काय? संपूर्ण जगाला नैतिकतेची शिकवण द्यायची आणि दुसरीकडे सतत अनैतिक वागायचे हे अमेरिकेचे जुनेच धोरण आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांत मात्र अशाप्रकारचा विचार करून सोबत किंवा विरोध करता येत नाही. त्यामुळे भारताकडून अमेरिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सतत होत आला. तरीही भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी अमेरिका आसुसलेला असेल तर त्याचे मूळ अमेरिकेच्या हुकूमशाही स्वभावात आहे.
आम्ही म्हणू तो लोकतांत्रिक आणि आम्ही सांगू तो हुकूमशहा, अशाच पद्धतीने अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय राजकारण चालत आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या त्याच परंपरेचा भाग आहेत. निर्बंध लादणे, आरोप करणे, शुल्क वाढविणे असे सारे अमेरिका सतत करीत असतो. ते त्या देशाने यापूर्वी चीनसोबत करून पाहिले. पण, चीन आणि भारत यांच्या अर्थव्यवस्थेत फरक आहे. ट्रम्प यांनी म्हटले म्हणून भारताची अर्थव्यवस्था मृतप्राय नाही. ती जिवंत, गतिशील आणि वर्धिष्णू अर्थव्यवस्था आहे. चीनची अर्थव्यवस्था सरकारकेंद्रित व सरकारच्या हुकूमावर चालणारी आहे. त्यामुळे तिकडे सरकारची गचांडी पकडली की उद्योगविश्व लायनीवर येते. तसे भारतात घडत नाही. घडणार नाही. याचे कारण भारतात औद्योगिक विश्वातदेखील लोकतांत्रिक व्यवस्था आहे. मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. सरकारवरील अवलंबित्व मर्यादित आहे. भारताची स्वतःचीच बाजारपेठ एवढी मोठी आहे की, त्याने ठरविले तर तो स्वबळावर उत्पादन व उपभोग दोन्हींचे व्यवस्थापन करू शकतो. परंतु, नव्या जागतिक व्यवस्थेत अर्थव्यवस्था एककल्ली किंवा देशकेंद्रित करून चालत नाही. त्यामुळे भारत संयमाने वाटचाल करीत असतो.
भारतीय वस्तूंवर वाढीव शुल्क लादण्याचा अमेरिकेचा पवित्रा हा एकप्रकारे अस्तित्वातच नसलेल्या समस्येचे भांडवल करून भारतीय अर्थकारणाला धक्का पोहोचविण्याचा डाव आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे रत्ने, दागिने, औषधी, वस्त्रोद्योग व आयटी सेवा यासारख्या क्षेत्रांना धक्का बसणार हे उघड आहे. पण, याउलट विचार केला तर भारत देखील अनेक वस्तू अमेरिकेकडून आयात करतो. अमेरिकेतील कंपन्यांच्या नजरेत भारत ही उत्तम क्रयशक्ती असलेली मोठी बाजारपेठ आहे. ट्रम्प यांच्यासारखीच पावले भारताने उचलली तर अमेरिकन उद्योगांचे काय होईल, याची कल्पना ट्रम्प यांना अद्याप आली नसावी. आधीच डॉलरचे आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी करण्यासाठी जगातील अनेक देशांनी कंबर कसलेली आहे. ब्रिक्स राष्ट्रे पर्यायी पेमेंट सिस्टमबद्दल उघडपणे बोलू लागली आहेत.International diplomacy पुरवठा साखळीचे वैविध्यीकरण हाही परवलीचा विषय बनलेला आहे. अशात भारतासारख्या महाकाय देशाला टार्गेट करणे ही ट्रम्प यांची मोठी चूक ठरणार आहे. खरे तर हा विषय डॉलरला पर्याय उभा करण्याच्या प्रयत्नांशीच संबंधित आहे. रशियाकडून तेल घेतले, ते विकले, नफा कमावला ही सारी अमेरिकेची बतावणी आहे. सर्वाधिक उपभोग, सर्वाधिक कार्बन उत्सर्जन, सर्वाधिक प्रदूषण यासाठी अमेरिका कुख्यात आहे. जोपर्यंत इतर देश अमेरिकेच्या धोरणाशी किंवा लहरींशी जुळवून घेतात, तोपर्यंत ते मित्र असतात. त्यापेक्षा वेगळे वागणारा देश लगेच शत्रूंच्या यादीत जातो. जगातील सर्वांत जुनी लोकशाही आणि सर्वांत मोठी लोकशाही हे अमेरिका आणि भारत या दोन देशांचे महत्त्व आहे. हे दोन देश एकत्र राहिले तर चीन किंवा रशिया यांच्याकडून जागतिक अर्थकारणाचा बचाव करण्याचे अर्धे काम आपसूकच होऊन जाते. अमेरिकेच्या लहरीपणामुळे भारताला आरसा दाखवण्याची भूमिका घ्यावी लागली. अमेरिकेने हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारताची अर्थव्यवस्था आता दोन दशकांपूर्वी होती तेवढी निर्यातीवर अवलंबून राहिलेली नाही. देशांतर्गत बाजारपेठ वेगाने वाढली आहे. जगातील पर्यायी बाजारपेठा भारतासाठी आज पूर्वीपेक्षा जास्त सुलभ आहेत. भारत आता तसा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अमेरिकेवर फारसा अवलंबून नाही. तरीही स्वायत्त राष्ट्र म्हणून एक भूमिका घेतल्याबद्दल भारताला दंडित करण्याची धमकी देण्याची आगळिक अमेरिकेने केलेली आहे. भारत आज टॅरिफच्या दबावामुळे झुकला तर अमेरिका हा मुद्दा दीर्घकाळ वापरेल. भविष्यातील कोणत्याही व्यापारी भागीदाराला नाव ठेवण्यासाठी अमेरिका हा मुद्दा वापरू शकेल. त्यामुळेच स्वतःच्या भूमिकेबद्दल ठाम राहण्याची भूमिका भारताने घेतली, हे योग्यच. यातला दुसरा मुद्दा असा की, व्यापारी वादांच्या स्थितीत सॉफ्ट पॉवरची भूमिका दुर्लक्षित केली जाते.International diplomacy सॉफ्ट पॉवर म्हणून भारताची जागतिक प्रतिमा फारच उज्ज्वल आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही, संस्कृती, तंत्रज्ञान आणि बौद्धिक भांडवलाचे केंद्र म्हणून भारताला मिळणारी सद्भावना अमेरिकेहून फार मोठी आहे. संगीत, चित्रपट, योग, पाककला, क्रिकेट, संशोधन, आयटी यासह बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय क्रीडापटूंनी दाखविलेले कौशल्य जगाला भुरळ पाडणारे आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय वाटाघाटीत भारताचे एक सूत्र आहेः परस्पर आदर, परस्पर हित, परस्पर संवेदनशीलता. या सूत्रावर भारत भागीदारी करतो. तशी भागीदारी अमेरिका करीत नाही. भारत ते करतो म्हणून अमेरिकेचा त्रागा सुरू झालाय. अमेरिकेला भारताशी मैत्री कायम ठेवायची असेल तर त्याला समान दर्जा देण्याची दिलदारी दाखविली पाहिजे. भारताला प्यादा म्हणून वापरायचे असे अमेरिकेने ठरविले असेल तर ते कधीही शक्य होणार नाही. ट्रम्प यांनी कितीही डबल ढोलकी वाजविली तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही.