मुंबई,
Replacement of Tukaram Munde मोठी प्रशासकीय हालचाल घडवून आणत राज्य सरकारने आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली केली आहे. असंघटित कामगार विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले मुंढे आता अपंग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या सोबतच इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे गेल्या दोन दशकांत २३ वेळा बदलले गेले असून, त्यांच्या या वारंवार बदलांचा विक्रमच झाला आहे. नियमांनुसार किमान तीन वर्षांचा कार्यकाळ अपेक्षित असताना, मुंढे यांना बहुतांश ठिकाणी वर्षभरापेक्षाही कमी कालावधी काम करावे लागले आहे. याचे कारण त्यांची कार्यपद्धती स्पष्ट मानली जाते. ते कुठेही गेल्यावर कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्यावर भर देतात. कार्यालयात उशिरा येणाऱ्यांवर कारवाई, लालफितीला आळा आणि कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करण्याची त्यांची शैली प्रशासनात चर्चेचा विषय ठरते.
मुंढे यांचा कारभार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी ठरला, मात्र काही राजकीय व्यक्तींना आणि काही प्रशासनातील घटकांना तो रुचला नाही. त्यामुळे त्यांना वारंवार बदलीला सामोरे जावे लागते. अपंग कल्याण विभाग हा आतापर्यंत तुलनेने दुर्लक्षित मानला गेला असला तरी, मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे या विभागातील अपंगांसाठीची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्रालयात वारंवार चकरा मारणाऱ्या अपंगांना यामुळे मोठा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.
दरम्यान, या बदलीत इतर अधिकारीदेखील बदलले गेले आहेत. नितीन काशीनाथ पाटील यांची राज्य कर विभागात विशेष आयुक्त म्हणून, अभय महाजन यांची कापूस उत्पादक महासंघाचे प्रशासकीय संचालक म्हणून, ओंकार पवार यांची नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी Replacement of Tukaram Munde म्हणून तर आशा अफजल खान पठाण यांची नागपूर येथील वनमतीच्या महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांचे नाव चर्चेत आले असून, त्यांच्या नव्या जबाबदारीकडे राज्यातील प्रशासन व नागरिकांच्या अपेक्षेने पाहिले जात आहे.