वेध...
Tarun Bharat Bhandara Vedha छंदातून ज्ञानवृद्धी होते. छंद माणसाला नवनवीन शिकायला देते. म्हणजेच काय तर छंद माणसाला जगायला शिकविते. पण छंद जोपासताना काही गोष्टींची पथ्ये पाळली जाणे गरजेचे आहे. आपल्या छंदाच्या नावाखाली होणारा अतिरेक बरेचदा अनेकांसाठी मनस्ताप ठरतो. त्रास होतो, पण बरेचदा बोलले जात नाही आणि मग छंदाच्या नावाखाली अवडंबर होतो. आज छंदाचा ‘छांदिष्टवाडा’ झाला आहे, असे म्हटले जाऊ शकते. छंद या विषयावर लिहिण्याचे कारण एवढ्यासाठीच की, चार दिवसांपूर्वी एक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आणि सर्वच अवाक् झाले. मी शासकीय अधिकारी आहे. माझ्या कार्यक्षेत्रात येणा-या शासकीय वास्तूत मी काहीही करू शकतो, असा समज करून कदाचित जोपासलेला छंद आज एका अधिका-यासाठी चर्चेचा विषय झाला आहे. छंदातून ज्ञानवृत्ती होते.

नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सर्जनशीलता छंद जोपासण्यातून वाढते. सामाजिक संबंध वृद्धिंगत होण्यास छंदच पोषक ठरतात. स्वतःच्या आनंदासाठी नियमित करायला आवडणारे काम म्हणून छंदाची साधी सोपी व्याख्या केली जाऊ शकते. पण यासाठी काही बंधनंसुद्धा आहेत. छंद जोपासताना पुरेसा वेळ असणे, हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता ज्या महाशयांच्या निमित्ताने छंद प्रपंच लिहावासा वाटला, ते एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांनी केलं काय तर, आरोग्य केंद्र परिसरात कुक्कटपालन सुरू केलं. कोंबड्या पाळल्या, अंडी उबवण केंद्र उभारलं आणि हाच त्या महाशयांचा छंद आहे. आता मान्यच आहे, त्यांना यातून आनंद मिळत असेल. पण छंद जोपासण्यासाठी पुरेसा वेळ असावा, या नियमाचे काय? आरोग्य क्षेत्रात काम करताना कायम सतर्क राहावे लागणाèया या महाशयांना कोंबड्या पाळायला वेळ मिळत असेल तर रुग्णांची सेवा ते कधी करीत असावे? हा प्रश्नच आहे. कोंबड्यांचे संगोपन आणि रुग्णांकडे दुर्लक्ष हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हा माझा छंद आहे, असे ते ठामपणे सांगतात. पण छंद जोपासायचा कुठे? याचे तारतम्य त्यांना आहे का? हा प्रश्न या निमित्ताने होतो.
कोंबड्यांमुळे पसरणारी अस्वच्छता रुग्णांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरणार नाही, याची खात्री कोण देणार? कोरोनापासून हा उपद्व्याप सुरू होता, जो आज उघड झाला. मग त्यांच्या वरिष्ठांना याची माहिती का नसावी? हेही मोठे कोडेच आहे. माहिती नसेल तर इतके वर्षांत त्यांनी कधीच या रुग्णालयाला भेट दिली नाही का? हाही प्रश्न निर्माण होते. असे नसेल तर या छंदात वरिष्ठांनाही आनंद मिळतो, असे म्हणायचे का? कुणाचे दुर्लक्ष, पाठिंबा कुणाचा हा विषय वेगळा ठेवला तरी खरंच शासकीय वास्तूत हे करण्याची परवानगी आहे का? प्रशासकीय व्यवस्थेच्या नियमावलीत हे सर्व बसते का? याचा विचार होणे गरजेचे आहे. या महाशयांचा हा छंद आज उजागर झाला म्हणूून पण असे अनेक जण असतील जे आपले अनेक छंद जोपासत असतील, ज्याचे दुष्परिणाम प्रशासकीय यंत्रणेला भोगावे लागतात. अशांवर कदाचित कारवाई होईलही, पण कारवाईने मानसिकता बदलेल का हा प्रश्न आहे. जोपर्यंत मी करीत असलेले काम म्हणजे माझे कर्तव्य आहे. याची जाणीव होणार नाही, तोपर्यंत असे विचित्र छंद जोपासण्याची वृत्ती संपणार नाही? छंद जोपासलेच पाहिजे, पण ते सकारात्मक आणि तेही वास्तविकतेचा सारासार विचार करूनच! नाही तर छंद माझा वेगळा म्हणतात, कधी हेच छंद अंगलट येतील याचा नेम नाही? विशेषकरून प्रशासकीय व्यवस्थेत वावरताना हे पथ्य पाळलेच गेले पाहिजे.
आज प्रचंड मोठ्या आवाजात गाणे वाजवत रस्त्याने मिरवणुका काढण्याचाही लोकांना छंदच जडला आहे. आपल्या छंदामुळे कुणाला त्रास होतो, याचा विचार करण्याची क्षमता लोप पावली आहे. नियम आहेत. पण छंदापुढे नियमांचा विसर पडतो. छंद आनंद देतात, जीवनात सकारात्मकता आणतात, असे म्हणतात; मात्र अशा कृतींमधून केवळ तिरस्कार आणि द्वेषभावच निर्माण होऊ शकतो. छंदाला आपल्यापुरतेच मर्यादित ठेवा. ते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा ही मानसिकता आमची होईल, तेव्हा शासकीय रुग्णालय परिसरात कोंबड्यांचे संगोपन करण्याची हिंमत होणार नाही!
विजय निचकवडे
9763713417