ब्रॅड पिट यांच्या आई जेन एटा पिट यांचे निधन

    दिनांक :07-Aug-2025
Total Views |
Brad Pitt mother death हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट यांच्या आई जेन एटा पिट यांचे निधन झाले असून त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची माहिती टीएमझीने पिट कुटुंबातील जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला.
 

Brad Pitt mother death 
ब्रॅड पिट यांच्या भाचीनं आणि डग पिट यांच्या मुलीनं – सिडनी पिटनं ६ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या आजीला श्रद्धांजली अर्पण केली. तिनं लिहिलं, "माझी प्रिय ग्रॅमी, जेन एटा, आम्ही अजून तुमच्या जाण्यासाठी तयार नव्हतो. पण आता तुम्ही गाणी गाऊ शकता, नाचू शकता, पेंटिंग करू शकता, या विचाराने काहीसं सुसह्य वाटतं." या पोस्टमध्ये तिनं आजीसोबतचे अनेक फोटो शेअर केले.सिडनीनं पुढे लिहिलं की, "आम्ही १४ नातवंडं, प्रत्येकाशी त्या सहज मिसळून जात. त्यांचं प्रेम अमर्याद होतं आणि जो कोणी त्यांना भेटायचा त्याला त्याची प्रचिती यायची. त्यांच्याशिवाय पुढं कसं जायचं हेच कळत नाही."
 
 
शिक्षणक्षेत्रात दिली सेवा
जेन एटा पिट निवृत्त शालेय समुपदेशक होत्या. त्यांचा जन्म आणि वास्तव मिसुरीच्या स्प्रिंगफिल्ड इथे झाला. त्यांनी पती विल्यम यांच्यासोबत तीन मुलं – ब्रॅड, डग आणि जुली यांचं संगोपन केलं. विल्यम हे पूर्वी ट्रकिंग कंपनीचे मालक होते. जेन आणि त्यांचे पती सामान्य जीवन जगत होते, मात्र काही ठिकाणी ते ब्रॅडसोबत कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. २०१२ च्या ऑस्कर पुरस्कार समारंभात आणि २०१४ च्या 'अनब्रोकन' चित्रपटाच्या प्रीमिअरला ते दिसले होते. याशिवाय, १९९७ मध्ये 'द डेविल्स ओन' या चित्रपटाच्या प्रीमिअरला देखील जेन सहभागी झाल्या होत्या.ब्रॅड पिटने एकदा सार्वजनिकरित्या म्हटलं होतं, "मला माझ्या आईला नमस्कार करायचा आहे कारण त्या दररोज तुम्हाला पाहतात. आई, मी तुझ्यावर प्रेम करतो." त्यानंतर त्यांनी कॅमेऱ्याकडे पाहत फ्लाइंग किस दिला होता.
 
 
 
कुटुंबातील दुरावा
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, ब्रॅड पिट आणि त्यांच्या आईमध्ये नेहमीच घनिष्ठ संबंध राहिले, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ब्रॅड आणि त्यांची माजी पत्नी अँजेलिना जोली यांच्या घटस्फोटामुळे जेन आपल्या नातवंडांपासून काहीशा दूर राहिल्या होत्या.२०२० मध्ये जेन आणि पिट कुटुंबातील काही सदस्य ब्रॅडच्या ८०व्या वाढदिवसाला त्यांच्या घरी गेले होते. मात्र, अँजेलिनासोबत असलेल्या मुलांचा तिथे काहीही उल्लेख नव्हता. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले होते की, "हे दु:खद आहे की जेन आणि बिल आपल्या दुसऱ्या नातवंडांपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर होते, पण तरीही त्यांना भेटू शकले नाहीत."२००९ मध्ये ब्रॅड पिट आणि त्यांच्या भावंडांनी मिसुरीमध्ये ‘जेन पिट पीडियाट्रिक कॅन्सर सेंटर’ उभारण्यासाठी १० लाख डॉलर्सचा निधी दिला होता. या केंद्रामुळे त्या भागातला पहिला बाल कर्करोग तज्ज्ञ आणि रक्तविकार तज्ज्ञ उपलब्ध झाला. जेनच्या निधनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
त्यांच्या जाण्याने पिट कुटुंबावर शोककळा पसरली असून अनेक चाहत्यांनीही सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.