Kainaat Arora बॉलिवूडमधील सर्वाधिक टॅलेंटेड आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक दिव्या भारती यांचं नाव आजही लोकांच्या मनात आहे. अल्प काळात प्रेक्षकांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या दिव्याची आठवण अनेकांच्या मनात आजही ताजी आहे. मात्र सध्या चर्चेत आहे तिची चुलत बहीण – अभिनेत्री कायनात अरोरा.

कायनात अरोराने बॉलिवूडमध्ये मोठ्या अपेक्षांसह २०१० साली पदार्पण केलं. तिनं अक्षय कुमारसोबत ‘खट्टा मीठा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली आणि नंतर २०१३ मधील ‘ग्रँड मस्ती’मधील ग्लॅमरस भूमिकेमुळे ती चर्चेत आली. मात्र, दिव्या भारतीची नातेवाईक असल्याचं तिला फायदेशीर न ठरता उलटं ओझं वाटायला लागलं.एका मुलाखतीत कायनात म्हणाली, "जर दिव्या माझी कजिन नसती, तर कदाचित माझं करिअर वेगळं आणि कदाचित यशस्वी झालं असतं. तरीसुद्धा मी तिची सर्वात मोठी फॅन आहे."दिव्याशी नातं असल्यामुळे जिथं लाभ व्हायला हवा होता, तिथं उलट तिच्यावर सतत तुलना आणि अपेक्षांचं दडपण होतं. मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही तिला तितकं यश मिळालं नाही.तिनं याच संघर्षाचा उल्लेख करत सांगितलं की, खुद्द अभिनेता अजित कुमार आणि संजय दत्त यांनी तिला सिनेइंडस्ट्री सोडण्याचा सल्ला दिला होता. कायनात ‘मनकथा’ या तामिळ चित्रपटात अजितसोबत झळकली होती.
ती म्हणाली, Kainaat Arora "अजित यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं – कायनात, तू खूप साधी आहेस, या इंडस्ट्रीसाठी तुला पूर्ण तयार असावं लागेल. हा प्रवास सोपा नाही."संजय दत्त यांनीही सुरुवातीच्या काळात तिच्या भाबड्या स्वभावामुळे तिला इंडस्ट्री योग्य नसल्याचं सुचवलं होतं. कायनातच्या म्हणण्यानुसार, तिच्या पालकांनीही तिला चित्रपटसृष्टीत येण्याच्या निर्णयावर सहमती दिलेली नव्हती.दिल्लीमध्ये निफ्टमधून मर्चेंडायझिंगचं शिक्षण घेत असताना तिला मॉडलिंगची संधी मिळाली. सुरुवातीला PG हॉस्टेलमध्ये राहणं, आर्थिक अडचणी, वडिलांच्या व्यवसायातील अडचणी – या सर्व संघर्षातून तिनं स्वतःचा मार्ग शोधला.कायनात म्हणाली, "माझं प्लॅनिंग नव्हतं की मी अभिनयक्षेत्रात येईन. सगळं अगदी अचानक घडत गेलं आणि मी प्रवाहासोबत वाहत गेले."तिनं अक्षय कुमारसोबतच्या कामाचा अनुभव शेअर करत म्हटलं की, "अक्षय नेहमीच प्रेरणा देणारा आणि सेटवर खूपच सपोर्टिव्ह होता." तसेच तिनं विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, मोहनलाल आणि गिप्पी ग्रेवाल यांच्यासोबत काम करताना बऱ्याच गोष्टी शिकल्याचंही नमूद केलं.
उत्तर प्रदेशच्या छोट्या गावातून दिल्लीमार्गे मुंबई आणि मग तामिळ, पंजाबी, हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये कायनातने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आजही ती अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःसाठी स्थान निर्माण करत आहे, जरी ती दिव्या भारतीसारखं यश मिळवू शकली नसली तरी तिचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.