तभा वृत्तसेवा
मारेगाव,
maregaon-earthquake-tremors : तालुक्यात गुरुवार, 7 ऑगस्टला दुपारी साडेतीन-चारच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अधिकृतपणे भूकंपाचे धक्के कुठेही जाणवले नसल्याचे सरकारी सूत्रांनी कळविले आहे.
काही महिन्यांपूर्वी मारेगाव तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यावेळी घरातल्या भिंती हलल्या होत्या. तसेच कपाटातील भांडेसुद्धा खाली पडल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले होते. तसाच काहीसा अनुभव गुरुवार, 7 ऑगस्टला दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान आला.
तालुक्यातील वनोजा देवी येथील उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितले की, दुपारच्या सुमारास घरी बसून असताना घराच्या भिंती हलल्या होत्या. असाच अनुभव मार्डी येथील व्यवसायी अतुल बोबडे यांनीही घराची भिंत हलल्याचे सांगितले.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकर यांनीही भूकंपाच्या धक्क्याची पुष्टी केली. त्यांनीही मी बसून होतो त्या ठिकाणची भिंत हलल्याचे सांगितले. तसेच कानडा येथील प्रसाद ढवस यांनीही भूकंपासारखे धक्के कानडा येथेही जाणवल्याचे सांगितले.
चोपण येथील सतीश जोगी हे धडकन आवाज आल्यामुळे कशाचा आवाज आहे म्हणून घराबाहेर निघाले. नंतर त्यांनाही हा भूकंपाचा धक्का असावा असे वाटले.
तालुक्याच्या वर्धा नदीच्या काठाने कोळसा खाण आहे. कदाचित कोळसा खाणीमध्ये ब्लास्टिंग करीत असतानाचा हा धक्का असावा असेही काही जाणकार म्हणत असले तरी हा धक्का त्या खाणीचा नसून भूकंपाचा असावा असेही अनेकांचे म्हणणे आहे.
नेमके काय..?
धक्का नेमका ब्लास्टिंगचा की भूकंपाचा याची अजूनही पुष्टी झालेली नसली तरी नागरिकांच्या मनामध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारले असता त्यांनी भूकंपाची कुठेही नोंद झालेली नाही असे सांगितले. त्यामुळे ढग जोराने गडगडले असावे त्यामुळे कदाचित गडगडण्याच्या आवाजाने भिंती हलल्या असाव्यात.
उत्तम निलावाड
मारेगाव तहसीलदार