नोकरीच्या नावाखाली ७.५० लाखांची फसवणूक

काका-पुतण्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :07-Aug-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-news : नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. एवढेच नव्हे तर शैक्षणिक कागदपत्रेही परत करण्यात आली नाहीत. या प्रकरणात पुलगाव पोलिसांनी काका-पुतण्यासह ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
jlk
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव पोलिस स्टेशन परिसरातील शेकापूर (झोपडी) येथील नीलेश वागदे (३४) हा सूरज घोरपडे आणि त्याचे काका दिलीप घोरपडे यांना ओळखत होता. नीलेश आणि सूरज एकाच शाळेत शिकत होते. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलीप घोरपडे यांची कवठा येथे निलेशसोबत भेट झाली. त्यावेळी नागपूर येथील ऑर्डनन्स फॅटरीमध्ये स्टोअर कीपरची पदे रित आहेत. आपला पुतण्या सूरज अंबाझरी कारखान्यात नोकरीला आहे. आपण तुलाही नोकरी लावून देतो. पण, त्यासाठी ७ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे आधी ३ लाख ५० हजार रुपये आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे सांगितले. निलेशने त्याच्यावर विश्वास ठेवला. नंतर, निलेशचा मित्र आशिष झोटिंग याला चार्जमन म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासनही देत निलेश आणि आशिषची राजीव हिरस्वामी रेड्डी नावाच्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली.
 
 
सूरजने ऑर्डनन्स फॅटरी अंबाझरीमधील नियुक्तीचे ओळखपत्र दाखवले. यामुळे दोघांचाही आत्मविश्वास आणखी दृढ झाला. निलेश आणि आशिष यांनी मिळून त्याला ७ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन आणि चेकद्वारे दिले. नंतर, ते नागपूरला गेले आणि पुन्हा राजीव रेड्डींना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यांना लवकरच ऑर्डर मिळेल असे सांगण्यात आले. राजीव रेड्डी आणि वसीम मिर्झा बेग यांनी त्यांची २०१९ मध्ये नागपूरच्या रेनबो हॉस्पिटलमध्ये दोघांची वैद्यकीय तपासणी केली. सर्व शैक्षणिक कागदपत्रे घेण्यात आली. सूरज आणि दिलीप घोरपडे ऑर्डर मिळेल असे आश्वासन देत होते. नंतर, कोरोना काळात लॉकडाऊन लागला. बरेच दिवस उलटूनही जेव्हा त्यांना आदेश मिळाला नाही तेव्हा निलेश आणि आशिष यांनी संबंधित लोकांशी संपर्क साधला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. ते राजीव रेड्डी यांच्यासाठी काम करत होते. नितेश कोठारी सांगत होते की तुमचे काम सुरू झाले आहे. पाच वर्षांनंतरही कोणताही आदेश मिळाला नाही. अखेर या प्रकरणातील तक्रारीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी कवठा झोपडी येथील दिलीप घोरपडे, सूरज घोरपडे, नागपूर येथील राजीव हिरस्वामी रेड्डी, नितेश कोठारी तर पांढरकवडा येथील वसीम मिर्झा बेग रशीद बेग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.