Narali Purnima 2025 श्रावण महिन्यात येणारी नारळी पौर्णिमा म्हणजे कोकणातील लोकांसाठी आणि समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या समाजांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याचे आभार मानले जातात, त्याची कृपा राहो, असे प्रार्थित केले जाते. मासेमारी करणाऱ्या कोळी समाजासाठी हा दिवस नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात करणारा असतो. म्हणूनच समुद्राला नारळ अर्पण करून त्याची मदत मागितली जाते.
ही पौर्णिमा म्हणजे नुसताच धार्मिक विधी नाही, तर समुद्र आणि मानवी जीवन यामधील नात्याची जाणीव करून देणारा एक भावनिक क्षण आहे. या दिवशी समुद्राला शांत, स्थिर राहण्यासाठी विनंती केली जाते. हे नुसते कर्मकांड नाही, तर निसर्गाशी असलेली आपली नाळ मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा, आजच्या काळातही निसर्गाच्या संवर्धनाची एक साक्ष बनून उभी राहते.
या दिवशी रक्षाबंधनाचा देखील महत्त्वाचा योग येतो. बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते, आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भावासोबत तिचे नाते नुसते भावनिक नाही, तर एक विश्वासाचं आणि आधाराचं प्रतीक असतं. राखीच्या या नाजूक दोऱ्यांत आपुलकीची शक्ती असते, जे संकटातही भाऊ-बहिणीचं नातं जपते.अशा या दिवशी, “लाडकी बहीण” हाच शब्द किती जिव्हाळ्याचा वाटतो. घरामध्ये तिच्या अस्तित्वाने उत्सवाला एक वेगळीच उभारी मिळते. ती राखी बांधताना डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू, तिच्या ओठांवरील हसू आणि भावासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना – या साऱ्या गोष्टी नारळी पौर्णिमेला आणखी भावनिक आणि मंगल बनवतात.घरात नारळ फोडून प्रसाद दिला जातो, आरत्या म्हणल्या जातात, आणि सगळं वातावरण एक धार्मिक, पण हर्षोल्हासमय रंग घेतं. बहिणीच्या ओवाळणीसाठी भावाकडून दिला गेलेला छोटासा पण प्रेमाचा गिफ्ट तिच्या हसऱ्या चेहऱ्याचं कारण बनतो.आजच्या धकाधकीच्या जीवनात हे सण आपल्याला थांबून विचार करायला शिकवतात – नात्यांची जपणूक, निसर्गाशी एकरूप होण्याची आवश्यकता आणि आपल्याला घडवणाऱ्या संस्कृतीचा अभिमान.नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या दोन्ही सणांचा एकत्रित अनुभव म्हणजे निसर्ग आणि नात्यांचं एक सुंदर संमेलन. समुद्राप्रमाणेच खोल आणि स्थिर असावं, असं हे भाऊ-बहिणीचं नातं – आणि त्याला साजेसा उत्सव म्हणजेच नारळी पौर्णिमा.
लाडकी बहीण आणि महाराष्ट्र सरकारच्या स्त्रीसशक्तीकरणाच्या दिशा
राखीच्या धाग्यात गुंफलेलं भावंडांचं नातं म्हणजे केवळ परंपरा नाही, तर काळाच्या ओघात अधिकाधिक समृद्ध झालेला एक स्नेहबंधनाचा भावनिक प्रवास आहे. यात "लाडकी बहीण" हा शब्द केवळ कौटुंबिक प्रेमाचं प्रतिबिंब नाही, तर एका सशक्त, स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर स्त्रीचं प्रतीकही आहे. आजच्या काळात सरकारदेखील या लाडक्या बहिणीच्या हातात ताकद देण्यासाठी पावले उचलत आहे. महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या विविध योजनांमध्ये “माझी लाडकी बहीण” ही योजना केवळ नावानेच नव्हे, तर हेतूनेही भावनिक आणि महत्त्वपूर्ण ठरते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या “माझी लाडकी बहीण” या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला. स्त्रीच्या सन्मानासाठी, तिच्या आर्थिक गरजांकरता आणि स्वावलंबनासाठी उचललेले हे पाऊल रक्षाबंधनाच्या आधी आलेलं एक सरकारकडून दिलेलं राखीचं उत्तरच जणू. ही योजना केवळ एका भाऊच्या मनापासून आलेल्या भावनेचा विस्तार वाटतो – “तू माझ्यासाठी लाडकी आहेस, आणि मी तुझी जबाबदारी उचलतो.”या योजनेअंतर्गत निवडक महिलांना मासिक ₹1,500 इतकी रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा केली जाते. ही रक्कम कमी वाटू शकते, पण अनेक महिलांसाठी ती आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी असते. बहीण केवळ भावाची जबाबदारी राहू नये, तर ती स्वतःच्या पायावर उभी राहावी, या भावनेतून ही योजना साकार झाली आहे. तिच्या हातात आलेली ही रक्कम तिच्या निर्णयक्षमतेला नवी दिशा देते.
त्यानंतर येते
“लेक लाडकी योजना” – जिच्या माध्यमातून मुलींच्या जन्माला सामाजिक मान्यता आणि आर्थिक सुरक्षा दोन्ही देण्याचा प्रयत्न केला जातो. वयाच्या अठराव्या वर्षी या योजनेंतर्गत लाभार्थी मुलीला ₹75,000 इतकी मदत दिली जाते. ही रक्कम तिच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी किंवा विवाहासाठी उपयोगात आणता येते. ही योजना म्हणजे समाजाने दिलेल्या आशीर्वादांचं आर्थिक रूपच जणू.
स्त्रियांच्या आर्थिक प्रगतीसाठी “महिला समृद्धी कर्ज योजना” हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. या योजनेद्वारे महिला उद्योजकांना व्यवसायासाठी अल्प व्याजदरात (फक्त ४%) कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. कुणी शिवणकाम, कुणी खाद्यपदार्थांचं उत्पादन, तर कुणी हस्तकला अशा छोट्या-छोट्या उद्योगांद्वारे आपलं जग घडवताना दिसतात.
या सर्व योजनांपलीकडेही राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी, गरजूंना निवारा मिळावा यासाठी आणि ग्रामीण महिलांसाठी रोजगार संधी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. ‘वन स्टॉप सेंटर’, ‘महिला हेल्पलाइन’, ‘स्वाधार गृह’, ‘माविम’सारख्या उपक्रमांद्वारे हजारो महिलांचे आयुष्य दिशा बदलताना दिसतं. कोरडीत सुरू होणारे महिला रोजगार हब, जिथे महिलांना ट्रेनिंग, उत्पादन आणि बाजारपेठेचा आधार दिला जातो – हे सर्व मिळून स्त्रीच्या सशक्तीकरणाची पायाभरणी करत आहेत .या सर्व योजनांची गाभा एकच – स्त्रीला “लाडकी” म्हणून ओळखून केवळ भावना व्यक्त करणे नव्हे, तर तिच्या आत्मनिर्भरतेसाठी आधारभूत पायऱ्या उभ्या करणं.रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडं एकमेकांना मिठी मारतात, राखी बांधतात आणि कायम साथ देण्याचं वचन देतात. हे वचन आज सरकारने एक जबाबदारी म्हणून स्वीकारलं आहे. “लाडकी बहीण” केवळ घरातली कोमल व्यक्ती राहू नये, तर ती समाजात आत्मविश्वासाने चालणारी, निर्णय घेणारी आणि स्वाभिमानाने जगणारी व्यक्ती व्हावी, हीच या साऱ्या योजनांमागची खरी प्रेरणा आहे.