उत्तर प्रदेश,
Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील निगोही पोलीस ठाणे हद्दीत एक अजबप्रकार घडला आहे. रामनगर गावातील मनोज नावाच्या पतीने स्वतःच्या पत्नीचे लग्न तिच्याच प्रियकराशी लावून दिले आणि विधिवत तिला त्याच्यासोबत पाठवूनही दिले. या अनोख्या घटनेने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मनोज Uttar Pradesh याचा विवाह सुमारे 15 वर्षांपूर्वी पीलीभीत जिल्ह्यातील रूबीशी झाला होता. दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी रूबीची ओळख शेजारच्या गावातील कौशल नावाच्या तरुणाशी झाली आणि ती प्रेमसंबंधात बदलली. ही बाब मनोजच्या लक्षात आल्यावर त्याने पत्नीला समजावले, घर आणि मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले. काही दिवस परिस्थिती सुरळीत राहिली, मात्र एकदा मनोज बाहेर असताना रूबीने कौशलला घरी बोलावले. त्याच वेळी अचानक मनोज परत आला आणि त्याने दोघांना आपत्तिजनक अवस्थेत पाहिले.
मनोजने तत्काळ रूबीच्या माहेरच्यांना बोलावले आणि स्पष्ट केले की पत्नीचा तिच्या प्रियकराशी विवाह करून द्यावा, अन्यथा ती एखाद्या दिवशी त्याचा जीव घेईल. माहेरच्यांनी सुरुवातीला विरोध केला आणि रूबीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कौशलसोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. अखेरीस सर्वांच्या सहमतीने मनोजने पत्नीचे लग्न कौशलशी लावून दिले. त्यानंतर रूबीला विधिवत तिच्या प्रियकरासोबत पाठवण्यात आले.
या प्रकरणात मनोज आणि रूबी यांनी एक लिखित करार करून त्यावर नातेवाईकांच्या सही घेतल्या, ज्यात दोघेही परस्पर संमतीने वेगळे राहत असल्याचे नमूद करण्यात आले. एक प्रत दोघांनीही स्वतःकडे ठेवली तर एक प्रत पोलिसांकडे जमा करण्यात आली. निगोही पोलिसांच्या मते हा परस्पर संमतीचा मामला असल्याने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.