तभा वृत्तसेवा यवतमाळ,
cotton crop गेल्या काही दिवसांत सातत्याने पाऊस असल्यामुळे कापूस पिकावर मर रोग येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकèयांनी या रोगावर नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अतिवृष्टीमुळे कापूस पिकात पाणी साचल्यामुळे कपाशीच्या मुळ्या सडून व त्यामुळे प्रामुख्याने मर आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काळ्या भारी जमिनीत घेतलेल्या कापूस पिकात निचरा कमी असल्यामुळे मुळांचा कार्यक्षेत्रात वाफसा नसल्यामुळे मुळांना व पर्यायाने झाडाला अन्नद्रवे मिळत नाहीत. त्यामुळे झाडे सुकू लागतात. मुलुल होतात त्यालाच आकस्मिक मर रोग असे म्हणतात व अशा प्रकारचा मर रोगाचा प्रादुर्भाव हा काही भागात दिसून येत आहे.
कपाशीच्या आकस्मिक मरमध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक कपाशीची झाडे हिरवी असतानाच क्षीण होऊन खालच्या बाजूने झुकतात व झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात यालाच ‘आकस्मिक मर’ असे म्हणतात.
पाऊस पडल्यानंतर 36 ते 48 तासांत आकस्मिक मरची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात. या रोगास कोणत्याही बुरशी, जीवाणू किंवा विषाणू जवाबदार नाहीत. दीर्घ पावसाचा खंड व त्यानंतर भरपूर पाऊस आणि जमिनीत अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे या रोगाची लक्षणे दिसतात. कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कपाशीच्या रोगग्रस्त झाडांवरील पाने क्षीण व निस्तेज होऊन खालच्या बाजूने वाकतात. पाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास थोडाफार वाफसा आल्यास झुकलेली झाडे झुकलेल्या बाजूकडून मातीचा थर भर देऊन सरळ करावीत व दोन पायाच्यामध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.
तसेच कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम अधिक 150 ग्रॅम युरिया अधिक 100 ग्रॅम पांढरा पोटॅश 10 लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंध्याशी पाठीवरच्या पंपाच्या सहाय्याने अंबवणी करावी व झाडालगत साधारण 100 मिली द्रावण पडेल याप्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे किंवा 1 किलो 13:00:45 अधिक 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड 200 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रती झाड 100 मिली आंबवणी ड्रेचिंग करावी.
द्रावणाची आंबवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर 24 ते 48 तासाच्या आत कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.