चंद्रपूर,
irai-dam : जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून, महानगरात गुरूवारी दुपारपासून जोरदार पाऊस बरसला. सततच्या पावसामुळे इरई धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गुरूवार, 11 सप्टेंबर रोजी या धरणाचे चार दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले असून, प्रशासनाने आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाऊस सतत सुरू असल्याने इरई धरणाच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. गुरूवार, 11 सप्टेंबर रोजी सकाळी धरणाची पातळी 207.300 मीटर इतकी होती. त्यामुळे सकाळी 7.30 वाजता धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले होते. त्यानंतर जल पातळीत पुन्हा वाढत होऊन ती 207.350 मीटर इतकी झाल्याने दुपारी 2.40 वाजताच्या सुमारास पुन्हा दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहे.
चार दारं उघडल्याने पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणार्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आठ धरणे ‘ओव्हर फ्लो’
जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे नलेश्वर, असोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरवार ही सात धरणे 100 टक्के भरले आहेत. तर, घोडाझरी धरणात 99.01 टक्के आणि इरई धरणात 96.18 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. एव्हाना जिल्ह्यातील 10 धरणांमध्ये एकूण 98.16 टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यात 24 तासात 28.6 टक्के पाऊस
जिल्ह्यात मागील 24 तासात 28.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस वरोडा व बल्लारपूर तालुक्यात प्रत्येकी 48.8 मिमी पडला आहे. तर, चंद्रपूर 43.8 मिमी, सिंदेवाही 38.1 मिमी, पोंभुर्णा 32.3 मिमी, कोरपना 31.6 मिमी, भद्रावती 29.0 मिमी, मूल 25.6 मिमी, नागभीड 25.4 मिमी, राजूरा 23.4 मिमी, चिमूर 23.2 मिमी, सावली 13.7 मिमी, ब्रम्हपुरी 12.2 मिमी, तर जिवती तालुक्यात 11.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.