नेपाळी उद्रेकाचा अन्वयार्थ

11 Sep 2025 11:09:31
अग्रलेख...
nepali outbreak ‘प्रजा सुखे सुखं राज्ञः प्रजानांच हिते हितम्।
                             नात्मप्रियं प्रियं राज्ञः प्रजानां तु प्रियं प्रियम्।।’
अर्थात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख आहे आणि प्रजेच्या हितातच राजाचे हित आहे. राजाला त्याचे स्वतःचे असे काहीच प्रिय नाही, प्रजेला जे प्रिय तेच त्यालाही प्रिय आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांना कदाचित या तत्त्वाचे विस्मरण झाले असावे. आता नेपाळात राजेशाही नाही; पण तेथील राजसत्तेची मुळं अद्यापही सैल झालेली नाही. अगदीच अलिकडच्या काळापर्यंत तिकडे राजेशाही होती. ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परत यावी असे सर्व नेपाळी नागरिकांना वाटत असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. मात्र, तसे असेल आणि नसेल तरी सध्या जे काही नेपाळात सुरू आहे, ते तेथील लोकशाही यंत्रणेचे मोठे अपयशच म्हटले पाहिजे. ‘राजा आऊ, देश बचाऊ’ या तेथील जनतेच्या आक्रमक भूमिकेने नव्याने स्थापित लोकतंत्राचे अक्षरशः वाभाडे काढले. कारण लोकनेते सम्राटांसारखे वागू लागले आणि त्यातून प्रचंड भ्रष्टाचाराचे दर्शन जनतेला होऊ लागले. हळूहळू जनक्षोभ वाढत होताच. समाजमाध्यमांवर बंदी हे केवळ तेथील जनांदोलन पेटण्याचे तात्कालिक कारण होते. खरा क्रोधाग्नी नेपाळात फार आधीपासून धगधगत होता. आताचा उद्रेक इतका भीषण होता की, थेट संसदेला आग लावली गेली. राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जाळली गेली. मंत्र्यांना सामान्य लोकांनी धावून-धावून मारले. एका माजी पंतप्रधानांच्या घराला लावलेल्या आगीत त्यांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला.
 
 

नेपाल  
 
 
नेपाळचा इतिहास जेवढा समृद्ध तितकाच तो गुंतागुंतीचाही. त्यात विविध राजवंश, साम्राज्यशाही आणि लोकशाही चळवळींचा प्रभाव दिसून येतो. आधुनिक नेपाळचा उदय हा शाह राजवंशाच्या माध्यमातून होत गेला. पृथ्वी नारायण शाह या काळातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती. त्यांनी 1768 मध्ये काठमांडू खोèयातील मल्ल राजांना पराभूत करून नेपाळचे एकीकरण केले आणि शाह राजवंशाची स्थापना केली. त्यांनीच नेपाळला मजबूत आणि एकात्म राष्ट्र म्हणून स्थापित केले. पुढे जंग बहादूर राणांनी बंड करून सत्ता हस्तगत केली आणि वंशपरंपरागत पंतप्रधान व्यवस्थेची रुजुवात केली. या काळात राजा नाममात्र शासक बनला आणि खरी सत्ता राणा पंतप्रधानांच्या हाती आली. खरे तर ही हुकूमशाहीच होती. ती 1951 पर्यंत चालली. भारताच्या स्वातंत्र्यामुळे आणि जगभरातील लोकशाहीच्या उदयाने प्रभावित होऊन, नेपाळच्या जनतेनेही राणा राजवटीविरुद्ध बंड पुकारले. राजा त्रिभुवन यांनी त्या राजवटीचा अंत केला आणि संसदीय लोकशाही आणि संवैधानिक राजेशाही असा प्रवास सुरू झाला. मात्र, 1960 मध्ये राजा महेंद्र यांनी लोकशाही सरकार बरखास्त केले आणि पंचायती शासन व्यवस्था सुरू केली. त्याच्या निषेधार्थ 1990 मध्ये मोठे जनांदोलन झाले. बहुपक्षीय लोकशाही आली. तरीही राजेशाही काही संपली नव्हती. 2005 मध्ये राजा ज्ञानेंद्र यांनी सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. त्यामुळे जनतेचा रोष वाढला. राजकीय पक्ष आणि माओवाद्यांच्या सहकार्याने मोठे जनांदोलन पुन्हा उभे झाले आणि राजा ज्ञानेंद्र यांना संसद बहाल करावी लागली. अखेर 2008 मध्ये नेपाळच्या संविधान सभेने सुमारे अडीचशे वर्षे जुनी राजेशाही संपवण्याचा निर्धार केला आणि नेपाळला संघीय लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले. राजा ज्ञानेंद्र राजवाडा सोडून गेले.
ही पृष्ठभूमी लक्षात घेऊन वर्तमान समजून घ्यावे लागते आणि या घटिताचे अन्वयार्थ काढावे लागतात. इतक्या लहान देशात कळीचा मुद्दा असतो विकासाचा. तो होत नसेल, राज्यकर्ते भ्रष्ट असतील, नागरिकांचे शोषण करून आपले घर भरत असतील तर जनतेच्या मनात रोष उफाळतो. तो आजकाल प्रामुख्याने समाजमाध्यमांतून बाहेर पडतो आणि तोही मार्ग बंद झाला की, मग आक्रोशाचा बांध जोरात फुटतो आणि नेपाळात जे झाले ते घडते. आंदोलन रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेने गोळीबार केला. त्यात 22 तरुणांचा बळी गेला आणि जनतेच्या रागाने परमोच्च बिंदू गाठला. गेल्या पाच-सात वर्षांत भारताच्या शेजारी असलेल्या अनेक राष्ट्रांमध्ये विविध प्रकारच्या आंदोलनांनी तिथल्या सत्तेचे अगदी तीन तेरा वाजवले. पाकिस्तान-अफगाणिस्तानपासून ही मालिका सुरू होते. मग म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश आणि आता नेपाळ. बांगलादेशप्रमाणे नेपाळात निर्माण झालेल्या अराजकासाठीही बाहेरील महाशक्ती कारणीभूत आहे, असा युक्तिवाद होत आहे. तो खरा असो-नसो, पण या उद्रेकाची पृष्ठभूमी व निमित्त दृष्टिआड करता येत नाही. तिथल्या राज्यकर्त्यांबद्दल पराकोटीची घृणा लोकांमध्ये, विशेषतः तरुणाईच्या मनात आहे. त्याचेच दृश्य रूप या उद्रेकात दिसले. कोणतेच राज्यकर्ते 100 टक्के जनतेला समाधानी करू शकत नाहीत. त्यामुळे सरकारवर टीका-टिप्पणी होणे स्वाभाविकच. अशाही स्थितीत शांतपणे मार्ग काढायचा असतो. लोकांच्या मनातील असमाधानाची-रागाची वाफ कोणत्या तरी माध्यमातून निघू द्यायची असते. नेपाळी सरकारने सोशल मीडियावर निर्बंध लादल्यामुळे त्या रागाचा थेट अराजकाच्या स्वरूपात विस्फोट झाला. नेपाळात जे काही घडले, त्यात प्रामुख्याने दोष आहे तो तिथल्या सत्ताधाèयांचा. परकीय शक्ती तेव्हाच हस्तक्षेप करू शकतात, जेव्हा त्यांना कुठे तरी फट सापडते. ती त्यांना नेपाळात सापडली असावी. भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये असे सगळे घडत असताना आपल्या देशाचे वेगळेपण ठळकपणे नजरेत भरते. राष्ट्र म्हणून आपण सारे एक असल्याचा भाव आणि संवैधानिक माध्यमातूनच आपले म्हणणे मांडले पाहिजे, ही समज हे भारतीय समाजाचे व्यवच्छेदक लक्षण. भारत नेहमी एक राष्ट्र म्हणूनच जगला आहे. कोणत्याही देशात अराजकता निर्माण होण्याचे मुख्य कारण त्या देशातील विकासाची कुंठितावस्था हे असते. दीडशे कोटींचा भारत हा वैविध्यात एकता शोधणाऱ्यांचा देश.nepali outbreak  तो अंतर्गत मतभेदांसह जागतिक स्तरावरील दादा लोकांना पुरून उरलेला आहे. विकासाच्या मार्गावर भारताची घोडदौड अवघ्या जगाला आश्चर्यचकित करणारी आहे. तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल या देशाच्या समृद्धीची साक्ष देत आहे. भारतातील जनतेला, गरजूंना त्या समृद्धीचा वाटा मिळत आहे. परंतु, लोकक्षोभ कसा निर्माण होतो आणि त्याचा स्फोट झाला की काय घडते, हे सर्व पक्षांतील पुढाèयांनी-मंत्र्यांनी-लोकप्रतिनिधींनी व बड्या अधिकाऱ्यांनी नेपाळच्या निमित्ताने अभ्यासलेच पाहिजे. नेपाळी लोकांचा राग सत्ताधाèयांच्या भ्रष्टाचारावर, बव्हंशी लोक गरिबीत जीवन कंठत असताना चाललेल्या सत्ताधीशांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या छानछोकीवर, रोजगाराबद्दलच्या उदासीनतेवर आहे. त्या रागाचा उद्रेक झाला. आपल्या बाबतीत लोकांची अशी काही नाराजी आहे काय, याचा अंदाज सर्व पक्षांतील पुढारी-मंत्री-लोकप्रतिनिधी, सरकारचे बडे अधिकारी अशा सर्वांनी घेतला पाहिजे आणि तसे काही असेल तर सुधारले पाहिजे. सामाजिक असमाधानाची नोंद घेणाऱ्या व्यवस्थेबद्दल फारसा आक्रोश नसतो. सुदैवाने भारतात जनभावनांचा आदर करणारे, जनकल्याणाचे ब्रीद घेतलेले सरकार सत्तेत आहे. गेल्या दशकभरात भारताने विविध क्षेत्रांत जी काही मजल मारली, त्यामुळे देशाची मोठी प्रगती झाली. अर्थकारण मजबूत झाले. महिला, युवक, बालके, गरीब, मजूर, उद्यमशील युवा अशा विविध वर्गांना दिलासा देणाऱ्या योजना सुरू आहेत. दिव्यांगांचा विशेष विचार होतोय. त्यांना मदत केली जाते आहे. देशाच्या विकासात लक्ष घालतानाच जागतिक दादांना आव्हान देण्याची ताकद भारताने कमावली आणि तरीही अंतर्गत व आंतरराष्ट्रीय शांततेलाच प्राधान्य दिले. भारतातील शांतता व स्थैर्य हेच त्याच्या प्रगतीचे खरे रहस्य होय. भारताच्या या घोडदौडीला नख लावण्यासाठी काही प्रवृत्ती टपलेल्या आहेतच, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या देशातील शांतता व स्थैर्य हेच आपल्या प्रगतीचे खरे भांडवल आहे, याची खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे. शांततेच्या विरोधात वागणाèयाला शत्रू मानले पाहिजे. सारांश, साèया भारतीयांनी काळाच्या पुढल्या हाका ऐकत सदैव सावध राहिले पाहिजे!
---
Powered By Sangraha 9.0