मोरेश्वर बडगे
thackeray brothers गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले. मराठा समाजाच्या आंदोलनाचा विषयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला. आता साऱ्यांचे डोळे लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे. या निवडणुकांना अजून मुहूर्त लागलेला नाही. दसरा-दिवाळीनंतरच या निवडणुका होतील. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष आहे. मुंबईची निवडणूक बहुधा नववर्षातच लागेल. निवडणुकांना वेळ असला, तरी साऱ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंची राजकीय युती होते का? हा मराठी माणसांच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय आहे. दसरा मेळाव्याला शिवसेनेत विशेष महत्त्व आहे. या मेळाव्यात युतीची घोषणा होणार का? याची उत्सुकता आहे. जुलैमध्ये हे दोघे भाऊ ‘वरळी डोम’मध्ये एकत्र आले होते. मराठीचा मुद्दा हे त्यावेळी निमित्त होते. तेव्हापासून या दोघांच्या युतीची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी या चर्चेला वेगळीच फोडणी दिली. या मेळाव्याला राज ठाकरेंना निमंत्रण असू शकतं, असे सचिन अहिर यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. एवढी मोठी गोष्ट सचिन अहिर स्वतःहून जाहीर करणार नाहीत. उद्धव ठाकरेंशी त्यांचे बोलणं झालं असेल. खासदार संजय राऊत यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत. मग नेमकं ठरलं काय? की, काहीच ठरलं नाही?
20 वर्षांपूर्वी राज ठाकरे वेगळे झाले होते. त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला. तेव्हापासून दोन्ही भावांचे मेळावे वेगवेगळे होतात. राज ठाकरेंचा मेळावा गुढीपाडव्याला होतो. उद्धव ठाकरेंचा दसऱ्याला. उद्धव किंवा राज स्पष्ट बोलणार नाहीत तोपर्यंत उद्धवसेनेच्या मेळाव्याला राज हजेरी लावणार का? हे कोडेच राहणार आहे. मनसेकडून कुणी बोललेले नाही. निवडणुका समोर आहेत. त्यामुळे दोन्ही भावांनी एकत्र आले पाहिजे असे मराठी माणसाला वाटते. वरळीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी तसे बोलूनही दाखवले होते. ‘एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत’ असे उद्धव म्हणाले होते. मात्र, राज यांनी या मुद्याला स्पर्शही केला नाही. गेल्या दोन महिन्यात दोन भावांमध्ये जवळीक वाढली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ‘मातोश्री’वर गेले होते. राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला उद्धव सहकुटुंब गेले होते. गाठीभेटी नक्कीच वाढल्या आहेत. 20 वर्षांत एकमेकाला न भेटणारे चुलत भाऊ वारंवार भेटतात याचा अर्थ काहीतरी सुरू आहे. पण दुसरीकडे राज यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणाऱ्या भेटीही थांबायला तयार नाहीत. मग नक्की काय सुरू आहे? कारण राज ठाकरे मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. नेमका हिशोब सांगायचं तर दोनदा भेटले. मुंबईच्या वाहतुकीची समस्या सांगण्याच्या बहाण्याने राज ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत फक्त वाहतुकीची चर्चा झाली, हे मानायला राजकारणी तयार नाहीत. फडणवीस यांच्या घरी बसलेल्या गणपतीच्या दर्शनालाही राज गेले होते. दोन्ही भावांनी एकत्र काम करायचं ठरवलं आहे, असे खासदार संजय राऊत म्हणतात. तसं ठरलं असेल तर मग जाहीर का करीत नाहीत?
जाहीर केलं तर दोघांच्या संबंधात स्पष्टपणा येईल. कार्यकर्त्यांनाही जुळवून घ्यायला सोपे जाईल. निवडणुकीचं नियोजन करायला बसता येईल. उद्धव युतीच्या बाजूने आहेत. त्यांनी तसे अनेक वेळा बोलूनही दाखवले आहे. मात्र राज ठाकरेंनी तसे काहीही सांगितलेले नाही. मराठीच्या मुद्यावर, महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो, अशीच त्यांची भूमिका दिसते. योग्य वेळी आपण आपली भूमिका जाहीर करू, असेच राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आले आहेत. अशी कुठली गोष्ट आहे की, राज ठाकरे भावासोबत जायला अजून मन बनवू शकले नाहीत? ज्या कारणाने आपण वेगळे झालो ती कारणं आजही शिल्लक आहेत, असे राज ठाकरेंना वाटते. युतीत गेलो तर निर्णयाचे अधिकार कोणाचे हा विषयही आहे. सत्तेची गॅरंटी नाही हाही भाग आहेच. त्यापेक्षा स्वतंत्र लढू असा विचार राज यांच्या मनात जोर मारत असावा. उद्धवपेक्षा फडणवीस यांची सांगत फायद्याची ठरेल, असेही त्यांना एक मन सांगत असावे. मतभेदाच्या मुद्यांवर दोघा भावांमध्ये चर्चा नक्कीच झाली असणार. हा काही इस्टेटीचा मामला नाही. एकत्र बसले तर मार्ग निघू शकतो. दसरा मेळावा हे त्यासाठी चांगले व्यासपीठ होऊ शकते. राज ठाकरे भावाच्या शिवसेनेच्या मेळाव्याला गेले तर एक सकारात्मक संदेश मराठी माणसात जाईल. राहिला युतीचा प्रश्न, ती नंतरही जाहीर करता येईल. पण हे सारे लवकरात लवकर होणे जरूरी आहे. तिकडे भाजपा केव्हाच तयारीला लागला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. मुंबईचा पुढचा महापौर भाजपाचा असेल, असे त्यांनी म्हटले आहे. 2017 सालीही भाजपाने मुंबई जिंकायचा प्रयत्न केला होता. मात्र उडी थोडी कमी पडली. शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या तर भाजपा 82 जागांवर थांबला होता. अवघ्या दोन जागा कमी पडल्या होत्या. तरीही भट्टी जमवता आली असती. त्या काळात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार होते. आजच्यासारखे कटू संबंध नव्हते. शिवसेना तेव्हा फुटायची होती. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला संधी दिली. आताची समीकरणं खूप बदलली आहेत. भाजपा आणि खासकरून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई जिंकायची या जिद्दीने फडणवीस फार आधीपासून भिडले आहेत. भाजपाची सारी मदार अमराठी मतांवर आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठी मराठी व्होट बँक तयार होते. तसे झाले तर ही व्होट बँक कशी फोडता येईल ते पाहण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मराठी मतं फोडायची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिली जाईल. शिंदे त्या मोहिमेवर फार आधीपासून लागले होते. 50 माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांनी खेचल्याची चर्चा होती. सध्या ही मोहीम थंडावलेली दिसते. शिवसेना फुटली असली, तरी मुंबईमध्ये शाखा पातळीवर उद्धव सेनेची अजूनही पकड आहे. ‘ठाकरे ब्रँड’ अजूनही भक्कम आहे. पण त्या जोडीला मैदानावर काम असावं लागतं. तिथे उद्धव सेना कमी पडते आहे. मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात दोन्ही भावांनी मुंबईत आलेल्या मराठी माणसांना मदत करण्याची भूमिका घेतली, हे चांगले झाले. मात्र आता निर्णयाची घडी आली आहे. दोन्ही भावांना निर्णय करावा लागेल. दसरा मेळावा ही त्यासाठी योग्य जागा आहे. राज ठाकरे कशासाठी थांबले आहेत ते कळायला मार्ग नाही. मात्र, आता फार थांबले तर उशीर झालेला असेल.