पुणे
Ashish Kapoor टीव्ही अभिनेता आशीष कपूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे येथे एका कथित बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आशीष कपूर यांना दिल्लीच्या तिस हजारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अटक झाल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते.
१० सप्टेंबर रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश भूपिंदर सिंग यांनी १ लाख रुपयांच्या वैयक्तिक हमीवर त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज, नोंदी आणि वकिलांच्या युक्तिवादांच्या आधारे असे मत नोंदवले की, पुढील तपासासाठी आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नाही.
या प्रकरणात पोलिसांनी पाच दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती, मात्र त्यात चार दिवसांचीच परवानगी मिळाली. दरम्यान, तीन दिवसांतच सर्व संबंधित पुरावे पोलिसांनी सादर केले होते. न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, आरोपीचा गुन्हेगारी इतिहास नाही, तसेच समाजातील त्यांची स्थिती लक्षात घेता, पोलिस रिमांड योग्य ठरणारी नव्हती. आरोपीने सहकार्य न करण्याची कोणतीही शक्यता दिसून आली नाही.आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद होता की, आशीष कपूर यांच्याविरुद्धचे आरोप पूर्णपणे खोटे असून, तक्रारदार महिला केवळ पैसे उकळण्यासाठी हा खटला दाखल करत आहे. तसेच यापूर्वीही तिने जनकपुरी पोलिस ठाण्यात स्वतःच्या घरमालकाविरोधात तक्रार दाखल केली होती.
हा गुन्हा एका पार्टीदरम्यान घडल्याचा आरोप आहे, जिथे पीडित महिला आणि आशीष कपूर यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. तक्रारीनुसार, पीडितेला पार्टीत काही प्यायचे दिले गेले, त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि तिच्यावर कथितरित्या शौचालयात सामूहिक बलात्कार करण्यात आला. यावरून ११ ऑगस्ट २०२५ रोजी बलात्कार, सामूहिक बलात्कार, दुखापत आणि इतर कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला.आता या प्रकरणातील तपास सुरू असून, न्यायालयाने आशीष कपूर यांना जामीन देत त्यांची पोलिस कोठडी अनावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.