मुंबई,
hot drinks आपल्यातील अनेकांना गरम चहा, कॉफी किंवा दूध पिण्याची आवड असते. वाफाळतं पेय हातात घेतल्यावर ते तात्काळ गिळण्याची सवय अनेकांना असते. मात्र, ही सवय आपल्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. वैद्यकीय संशोधनातून स्पष्ट झालं आहे की, अतिगरम पेय पिण्याने अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
कॅन्सरचा धोका का वाढतो?
अतिशय गरम पेय गिळल्यावर अन्ननलिकेच्या आतील त्वचेला वारंवार इजा होते. हे जखमेसारखे परिणाम निर्माण करतात. वेळोवेळी होणाऱ्या या जखमांमुळे पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि कॅन्सरची शक्यता वाढते. संशोधनानुसार, ७०°C पेक्षा जास्त तापमानाचे पेय अन्ननलिकेच्या कॅन्सरसाठी जबाबदार ठरू शकतात.२०१६ मध्ये International Agency for Research on Cancer (IARC) ने ६५°C पेक्षा गरम पेय “कॅन्सरचं संभाव्य कारण” (Probably Carcinogenic) असं घोषित केलं होतं. दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेतील अभ्यासांमध्ये गरम पेय घेणाऱ्या लोकांमध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर अधिक आढळल्याचं स्पष्ट झालं आहे.यूकेमध्ये पाच लाख लोकांवर करण्यात आलेल्या एका विस्तृत अभ्यासात असं दिसून आलं की, दररोज ८ कपांपेक्षा जास्त गरम चहा-कॉफी घेणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत ६ पट अधिक कॅन्सरचा धोका होता.तज्ज्ञ सांगतात की, चहा किंवा कॉफी ही घातक नाही, तर त्याचं तापमान हा मुख्य धोका आहे. पेयाचे तापमान ५७–५८°C असणे सुरक्षित मानले जाते.
सावधगिरीचे उपाय:
पेय उकळल्यानंतर तात्काळ न पित, ३–५ मिनिटं थांबा
दिवसातून ३–४ कपांपेक्षा जास्त गरम पेय टाळा
गरम पेयात थंड पाणी किंवा दूध मिसळा
झाकण न ठेवता थोडं थंड होऊ द्या
फुंकर घालून किंवा कप मोकळा ठेवून पेय थंड करा
गरम पेय पिण्याची सवय तात्पुरता आनंद देणारी असली, तरी दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टिकोनातून ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चहा, कॉफी प्यायचीच असल्यास, ती थोडी थंड झाल्यावरच प्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.