मुंबई,
Kader Khan बॉलीवूड चित्रपटसृष्टी ही केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरातील एक आघाडीची फिल्म इंडस्ट्री मानली जाते. या इंडस्ट्रीमध्ये मुख्यतः हिंदी भाषेत चित्रपट, गाणी आणि संवाद तयार होतात. हिंदी भाषेमुळेच बॉलीवूडला जागतिक पातळीवर ओळख मिळाली आहे. मात्र ही ओळख एखाद्या एकट्या व्यक्तीमुळे नाही, तर गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळात अनेक कलाकारांच्या अथक प्रयत्नांमुळे आहे. या कलाकारांमध्ये अभिनेते, संवादलेखक, गीतकार तसेच साहित्यिकांचाही समावेश आहे.
हिंदी दिनाच्या निमित्ताने आपण अशाच एका बहुआयामी कलाकाराची आठवण काढत आहोत, ज्यांनी केवळ हिंदी भाषेला समृद्ध केलं नाही, तर तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्नही केला. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेते आणि संवादलेखक कादर खान.कादर खान यांनी चार दशकांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्य केले. या काळात त्यांनी विविध भूमिका साकारल्या – खलनायक, विनोदी पात्रे आणि कधी कधी गंभीर भूमिका सुद्धा. मात्र अभिनयासोबतच त्यांची खरी ताकद होती संवादलेखनात आणि पटकथालेखनात. त्यांच्या तोंडची भाषा, उच्चार, आणि शब्दांवरील पकड इतकी प्रभावी होती की प्रेक्षक त्यांच्या संवादांनी भारावून जायचे.
कादर खान Kader Khan यांचा खरा वाटा केवळ अभिनयापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी भाषेच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये एक नवा मानदंड तयार केला. त्यांनी उर्दू आणि हिंदीचं सुरेख मिश्रण करून एक ‘हिंदुस्तानी’ भाषा तयार केली, जी प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी होती. त्यांच्या संवादांत भावना आणि प्रवाह होता – त्यामुळे ते सहज लक्षात राहायचे. ‘अमर अकबर अँथनी’सारख्या चित्रपटातील त्यांचे संवाद आजही लोकांच्या ओठांवर आहेत.फक्त भारतापुरतेच नव्हे, तर त्यांनी दुबई, टोरांटो अशा परदेशांमध्येही हिंदी, उर्दू आणि अरेबिक भाषांचे शिक्षण देणारे केंद्र सुरू केली होती. त्यांचा उद्देश होता की परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी त्यांच्या मूळ भाषेशी नातं टिकवून ठेवावं. 2012 च्या सुमारास त्यांनी ‘के. के. इन्स्टिट्यूट ऑफ अरेबिक लँग्वेज अँड इस्लामिक कल्चर’ नावाचं एक संस्थान सुरू करण्याचा विचार केला होता. काही अंशी त्यांनी त्याची तयारीही केली होती.
त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र आरोग्याने साथ सोडली. एका समारंभात ते व्हीलचेअरवर आले होते. तिथे त्यांनी स्वतःचं मन मोकळं करत सांगितलं की, आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी टपोरी भाषेला खूप प्रसिद्धी दिली आणि त्याचा समाजावर वाईट परिणाम झाला, याबद्दल त्यांना खंत वाटते. म्हणूनच ते नंतर भाषेच्या शुद्धतेसाठी काम करू लागले.कादर खान यांचं भाषेवरचं प्रेम आणि त्यांची तळमळ आजच्या सोशल मीडियाच्या युगात फारच दुर्मिळ आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भाषेची सेवा करण्यासाठी अर्पण केलं. अभिनयाच्या मागे लपलेली त्यांची ही भाषिक जाण आणि सामाजिक बांधिलकी आजही प्रेरणादायी आहे.